टीम इंडियाला दुसरा धक्का, आणखी एका खेळाडूला झाली दुखापत

998
virat-kohli

न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या मागची शुक्लकाष्ठ संपताना दिसत नाहीये. एक दिवसीय मालिकेनंतर कसोटीतील पराभवाने हादरलेल्या टीम इंडियाला आता दुखापतीने ग्रासले आहे. फलंदाज पृथ्वी शॉ दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे समोर आल्यानंतर आता फॉर्मात असलेला इशांत शर्मा याला देखील दुखापतीमुळे हा सामना खेळता येणार नसल्याचे समजते. Cricbuzzने दिलेल्या टीम इंडियाच्या संघात इशांत शर्माचा समावेश नाही.

दिल्लीकडून रणजी क्रिकेट स्पर्धेत खेळत असताना इशांतच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो न्यूझीलंड दौऱ्यातील टी-20 व एकदिवसीय सामन्यांना मुकला होता. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दोन दिवस आधी तो फिट असल्याचे ष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या फिजीओंनी जाहिर केल्यानंतर इशांत 48 तासांचा प्रवास करून न्यूझीलंडमध्ये दाखल झाला. एवढा मोठा प्रवास करूनही तो काही तासानंतर मैदानावर दाखल झाला व त्याने चांगली गोलंदाजीही केली.

एकिकडे बुमराह, शमी व अश्वीन ही तिकडी अपयशी ठरत असताना हिंदुस्थानच्या गोलंदाजीची मदार इशांतवर होती. मात्र आता इशांतचे पायाच्या घोट्याचे दुखणे परत सुरू झाले असून त्यामुळे त्याला दुसरा कसोटी सामना खेळता येणार नाही. गुरुवारी इशांतने संघासोबत सराव देखील केला. त्यावेळी त्याने 20 मिनिटे गोलंदाजी केली. मात्र त्यानंतर पुन्हा त्रास होऊ लागल्याने तो तंबूत परतला.

पृथ्वीच्या पायाला सूज
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, सरावादरम्यान पृथ्वी शॉ याच्या पायाला सूज आली आहे. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असून पायाच्या दुखापतीमुळे बुधवारी तो सरावही करू शकला नाही. जर पृथ्वी शॉ याच्या तपासणीचा अहवाल गंभीर आला तर त्याला दुसऱ्या लढतीत आराम देण्यात येईल. त्यामुळे शुभमन गिलला संधी मिळू शकते.

इशांतने पहिल्या कसोटीत घेतल्या 6 विकेट

इशांत शर्माने पहिल्या कसोटीच्या पहिल्या सत्रात 22 षटकात 68 धावा देत न्यूझीलंडचा निम्मा संघ गारद केला. रविचंद्रन अश्विनने 99 धावा देत तीन फलंदाज बाद केले. 48 तासांचा प्रवास करून आल्यानंतरही इशांतने जबरदस्त कामगिरी केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या