दुखापतींचे ग्रहण सुटेना! आफ्रिका, पाक, ऑस्ट्रेलिया, लंका चिंतेत

हिंदुस्थानात होणाऱया वन डे क्रिकेट वर्ल्ड कपच्या ‘रनो’त्सवाला केवळ दोन आठवडय़ांचा अवधी उरलाय. मात्र क्रिकेटविश्वातील या सर्वात प्रतिष्ठsच्या स्पर्धेपूर्वी काही संघांना दुखापतींचे लागलेले ग्रहण काही सुटण्याचे नावच घेत नाहीय. दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका तसेच बांगलादेश, न्यूझीलंड या संघांच्या गोटात दुखापतीमुळे काहीसे चिंतेचे वातावरण पसरलेय तर यजमान टीम इंडियालाही अक्षर पटेलच्या दुखापतीने टेन्शन वाढवलेय.

नॉर्किया आणि मगाला बाहेर

5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कपचा श्रीगणेशा होणार असल्याने संघांची मोर्चेबांधणी जोरात सुरू आहे. त्यातच प्रत्येक संघांना एकामागोमाग दुखापतींचे धक्के बसत आहेत. अनेक खेळाडू अनफिट असतानाही अनेक संघांनी त्यांचा अनुभव पाहता त्यांना संघात कायम ठेवण्याचे धाडस दाखवलेय. पण आज दक्षिण आफ्रिकेला एकाच वेळी दोन धक्के बसलेत. त्यांचा वेगवान गोलंदाज एन्रीक नॉर्किया आणि सिसांदा मगाला हे दोघेही वर्ल्ड कपमधून बाहेर फेकले गेले आहेत. हा आफ्रिकेसाठी खूप मोठा धक्का आहे. आता त्यांच्या जागी अंडिले पेहलूकवायो आणि लिझाड विलियम्स यांची वर्णी लावण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध जोरदार विजय मिळविणाऱया पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रव्हिस हेड, श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज महीश तीक्षणा व हिंदुस्थानचा अष्टपैलू फिरकी गोलंदाज अक्षर पटेल यांना दुखापत झालेली आहे. टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरही अद्याप पूर्णतः फिट नसल्याचे वृत्त आहे. किवी कर्णधार केन विल्यमसनही पूर्ण फिट नसला तरी संघात आहे. मात्र लंकेचा वनींदु हसरंगा, दुष्मंथा चमिरा हेसुद्धा अनफिट आहेत.

नसीम शाह वर्ल्ड कपला मुकण्याची शक्यता!

आशिया चषक स्पर्धेत नसीम शाहच्या खांद्याला दुखापत झाली. तो संपूर्ण वर्ल्ड कपला मुकण्याची शक्यता आहे. दुबईत खांद्याचे स्कॅन केल्यानंतर नसीमची दुखापत गंभीर असल्याचे समोर आले आहे. त्याला जवळपास वर्षभर मैदानापासून दूर राहावे लागू शकते. नसीमला ऑस्ट्रेलिया दौऱयापासूनही वंचित राहावे लागणार आहे.

हेड दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला जायबंदी

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या ट्रव्हिस हेडच्या डाव्या हाताला दुखापत झालीय. या दुखापतीमुळे तो यंदाच्या वर्ल्ड कपला मुकण्याची शक्यता बळावली आहे. त्याला गेराल्ड कोएत्जेचा चेंडू हाताच्या ग्लोव्हजवर लागला. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले.

अक्षरची करंगळी मोडली, अय्यरही अनफिट

टीम इंडियाचा अष्टपैलू फिरकी गोलंदाज अक्षर पटेल हा रवींद्र जाडेजाला बॅकअप म्हणून असतो. फलंदाजीत अनेक वेळा त्याने तळाला संकटमोचकाची भूमिका बजावलेली आहे. मात्र आशिया चषकात बांगलादेशविरुद्ध अखेरच्या सुपर-4 लढतीत फलंदाजी करताना स्वतःला धावबाद होण्यापासून वाचविण्याच्या नादात करंगळी मोडून बसला. श्रेयस अय्यरही दुखापतीतून अद्याप सावरला नाहीये. त्यामुळे टीम इंडियाच्या मोर्चेबांधणीतही थोडा अडथळा आला आहे.