अशोक चव्हाण यांच्यावर ‘शाई फेक’,कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सतीश चतुर्वेदी यांच्यावर कारवाई होणार

35

सामना ऑनलाईन । नागपूर

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यावर प्रचारसभेत “शाई फेक’ केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यावर कारवाई करण्याचा अहवाल केला असून निवडणुकीनंतर कारवाईची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.

शनिवारी रात्री पूर्व नागपुरातील हसनबाग परिसरात प्रचार सभेत भाषण करण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अंगावर ललित बघेल या कार्यकर्त्याने शाई फेकली. हा कार्यकर्ता कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सतीश चतुर्वेदी यांचा कार्यकर्ता असून चतुर्वेदी प्रणित हनुमान सेनेचा हा सक्रिया कार्यकर्ता आहे. चतुर्वेदी यांनी पूर्व नागपूर या विधानसभा क्षेत्राचे १९८० ते २००९ पर्यंत प्रतिनिधीत्व केले आहे. पूर्व नागपुरात सभा असतानाही चतुर्वेदी यांनी मात्र सभेला येणे टाळले.

गेल्या काही महिन्यांपासून माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व नितीन राऊत यांनी शहराध्यक्ष विकास ठाकरे व माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्याविरोधात मोहिम उघडली आहे. कॉंग्रेसच्या सर्व कार्यक्रमांवरही या नेत्यांनी बहिष्कार टाकला आहे. केवळ आपल्या उमेदवारांना कॉंग्रेसची उमेदवारी मागण्यासाठी या नेत्यांनी कॉंग्रेसच्या देवडीया भवनात हजेरी लावली होती. उमेदवार जाहीर झाल्यानंतरही चतुर्वेदी अपक्ष उमेदवारांचा उघडपणे प्रचार करीत आहेत तसेच अपक्षांच्या प्रचार साहित्यांवर चतुर्वेदी यांचे फोटे झळकत आहेत.

या सर्व बाबींचा उल्लेख करून नागपूर शहर कॉंग्रेस समितीने अहवाल तयार केला आहे. या अहवालाला आज रात्री अंतिम रुप दिले जाणार आहे. हा अहवाल महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीकडे पाठविला जाणार आहे. निवडणुकीपर्यंत मात्र कोणतीही कारवाई होणार नाही. चतुर्वेदी यांच्यावर निवडणुकीनंतर कारवाई होण्याची शक्‍यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या