आता हेडफोन लावून खेळा गरबा!

सामना ऑनलाईन, मुंबई

कोणताही सण, उत्सव म्हटलं की सर्वात आधी चर्चा होते ती ध्वनिप्रदूषणाची. मात्र ध्वनिप्रदूषणाच्या किंवा अन्य कोणत्याही नियमांचे उल्लंघन न करता मध्यरात्री २ वाजेपर्यंत गरबा खेळण्याची मजा लुटता आली तर ? अशक्यप्राय वाटणारी ही गोष्ट शक्य झालीय ती ‘सायलेंट गरबा’ या आगळय़ावेगळय़ा थीममुळे.  मालाड येथील राजमहाल बँक्वेट हॉलमध्ये २१ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत हा सायलेंट गरबा रंगणार असून चक्क हेडफोन लावून गरब्याचा आनंद लुटता येणार आहे.

नवरात्रीदरम्यान राजमहाल बँक्वेट हॉलमध्ये दररोज सायंकाळी ७ ते १० या वेळेत लाइव्ह परफॉर्मन्स होणार आहे. त्यानंतर  रात्री १० नंतर ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत सायलेंट गरबा पार पडणार आहे. गरबाप्रेमींना आयोजकांतर्फेच विशिष्ट हेडफोन पुरवले जाणार असून या हेडफोनवर बॉलीवूड गाणी, पारंपरिक गुजराती गाणी आणि फ्युजन ट्रक असे तीन वेगळे ट्रक असणार आहे. आपला आवडता ट्रक निवडून करून रसिकांना गरब्याचा आनंद लुटता येणार आहे.

या आगळय़ावेगळय़ा थीमबाबत आयोजक अबोली अंबर्डेकर म्हणाल्या की, नवरात्रोत्सवादरम्यान वेळेच्या आणि आवाजाच्या बंधनामुळे उत्सव साजरा करण्यात अनेक अडचणी येतात.  त्यामुळे गरब्याचा रसिकांना मनमुराद आनंद लुटता यावा याकरिता ही आगळीवेगळी थीम राबविण्यात आली आहे. कानात हेडफोन लावून गरबा खेळल्यामुळे ध्वनिप्रदूषणापासूनदेखील सुटका होणार आहे.