गणपतीच्या पूजेचे साहित्य थेट देवघरात, शिवसेनेचा विलेपार्लेत अभिनव उपक्रम

राज्यात यंदा गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. गणरायाचे भक्तिभावाने स्वागत करण्यासाठी शिवसेनेने विलेपार्ले येथे अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत गणरायाच्या पूजनासाठी लागणारे 21 प्रकारचे साहित्य भाविकांना घरोघरी पोहोचविण्यात येत आहे.  राज्याचे माजी परिवहन मंत्री आमदार ऍड. अनिल परब यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या उपक्रमाची सुरुवात करताना शिवसेना विलेपार्ले विधानसभा समन्वयक व आयोजक नितीन डिचोलकर, विधानसभा संघटक सुभाषकांता सावंत, महिला विधानसभा संघटक रूपाली शिंदे, उपशाखाप्रमुख नीतेश गुरव, कार्यालय प्रमुख अमित जोशी आदी उपस्थित होते. या उपक्रमासाठी शिवसेना शाखा क्र. 84 ने पुढाकार घेतला असून विलेपार्ले परिसरात घरोघरी श्रीगणेश पूजनाच्या साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. मागील वर्षी कोरोनाच्या काळात नागरिकांना घरच्या घरी गणेश पूजनाचे साहित्य उपलब्ध व्हावे म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला होता.