जयललिता यांच्या मृत्युची चौकशी

सामना ऑनलाईन । चेन्नई

तामीळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्युची चौकशी करण्यात येणार आहे. ५ डिसेंबर २०१६ रोजी चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण, त्यांच्या मृत्युनंतर अण्णा द्रमुक या पक्षाने त्यांच्या मृत्युची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता तामीळनाडूच्या सरकारने या प्रकरणी एक चौकशी आयोग स्थापन केला आहे.

माजी न्यायाधीश ए. अरूमुगासामी यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग जयललिता यांच्या मृत्युचा न्यायालयीन तपास करणार आहे. जयललिता यांच्या मृत्युपूर्वी त्यांना भेटण्याची परवानगी कोणालाही दिली गेली नव्हती. तसेच जयललिता यांच्या सहकारी शशिकला याच केवळ त्यांच्यासोबत होत्या. त्यामुळे जयललिता यांचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यामागे काहीतरी संशयास्पद असल्याबाबतचे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते.

मद्रास (चेन्नई) हायकोर्टानेही २९ डिसेंबर २०१६ रोजी जयललिता यांच्या मृत्युबाबत संशय व्यक्त केला होता. कोर्टाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा जयललिता यांना रुग्णालयात दाखल केले गेले. तेव्हा जयललिता या नियमित स्वरूपात जेवण करत होत्या. तब्बल दीड महिन्यानंतर जेव्हा त्यांचे निधन झालं त्या आधीही काही दिवस त्यांची तब्येत सुधारत असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या मृत्युची चौकशी करणे कोर्टाला आवश्यक वाटत आहे.

५ डिसेंबर रोजी जयललिता यांच्या निधनानंतर अपोलो रुग्णालयाने त्यांच्या मृत्युची कारणं स्पष्ट केली होती. रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी जयललिता यांना एका विशिष्ट संसर्गाने ग्रासले होते. याखेरीज त्यांना तीव्र स्वरूपाचा मधुमेह होता. त्यामुळे त्यांच्या शरीराच्या अंतर्गत अवयवांना गंभीर नुकसान झाले होते. त्यांनी सुरुवातीला उपचारांना प्रतिसादही दिला होता. पण हळूहळू हा संसर्ग वाढला आणि त्यांच्या शरीराचे प्रमुख अवयव निकामी झाले. त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.