मिटमिटयातील पोलिसी अत्याचारांची उपायुक्तांकडून चौकशी

63

कारभारी भुजबळ । पडेगाव

शहरातील कचरा मिटमिट्यातील मोकळ्या जागेवर टाकण्यावरून झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आंदोलक पळून गेल्यानंतर पोलिसांनी गावकऱ्यांची आंदोलनाची खुमखुमी कायमची नष्ट करण्यासाठी मिटमिट्यात ज्यांचा आंदोलनाशी काहीही संबंध नाही अशा वयोवृध्द गावकऱ्यांना, घरात घरकाम करीत असलेल्या महिलांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. पोलिसांनी केलेल्या वाहनांच्या व दुकानांच्या नासधुशीनंतर आणि मारहाणीनंतर शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांना घटनेची चौकशी करायला लावली. त्यानुसार  पोलीस उपायुक्त दीपाली घाडगे यांनी मिटमिट्यात जाऊन चौकशी केली.

विशेष म्हणजे ज्यांच्याकडे मिटमिट्याचा बंदोबस्त होता आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस मिटमिट्यात पोहोचले होते त्या उपायुक्त दीपाली घाडगे यांच्याकडेच पोलिसांनी केलेल्या या मारहाणीची आणि नासधुशीची चौकशी करण्याची जवाबदारी सोपवण्यात आली. त्यानुसार दीपाली घाडगे या मिटमिट्यात पोहोचल्या. त्यांनी चौकशी सुरु केली. घटनेच्या दिवशी पोलिसांनीच वाहनांची मोडतोड केली होती, घरात घुसून महिलांना मारहाण केली होती, हॉटेल आणि दुकानांमधून सामानाची नासधूस आणि लूटमार केली होती. यापैकी शक्य त्या सर्व गोष्टींचे पुरावेच रहिवाशांनी घाडगे यांना दाखवून दिले.

महिलांनी अंगावरील वळ दाखवले

महिलांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण केल्यानंतर अंगावर मोठ्या प्रमाणात जखमा झालेल्या असल्या तरी केवळ पोलिसांच्या रेकॉर्डवर येण्याच्या भीतीने या महिलांनी दवाखान्यात जाऊन उपचारच घेतलेला नव्हता. खासदार खैरे यांनी पुढाकार घेऊन या महिलांना उपचार उपलब्ध करून दिले तेव्हाही अनेकांनी आपण पडल्याचे, अपघातानेच मार लागल्याचे मुद्दाम सांगून मिटमिट्यातील घटनेशी आपला संबंध येऊ नये याची काळजी घेतली. दीपाली घाडगे यांना मात्र याच महिलांनी आपल्या शरीरावरची वस्त्रे बाजूला करून अंगावरील जखमा दाखवल्या. यावेळी महिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ‘आमची चूक नसताना, घरात बसलेलो असताना आम्हाला विनाकारण मारहाण केली, घराचे नुकसान केले. आता खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांविरुध्द कारवाई करा आणि आम्हाला न्याय द्या,’ अशी भावनिक आर्त हाकही महिलांनी महिला पोलीस अधिकाऱ्यांना घातली.

मिटमिट्यातील जखमींवर घाटीत उपचार

मिटमिट्यातील दंगलीत असंख्य महिला गंभीर जखमी झाल्या. मात्र पोलिसांच्या कारवाईच्या धाकाने महिलांनी उपचार करणे टाळले व वेदना असह्य होत असूनसुद्धा सहन केल्याशिवाय पर्याय नव्हता. ही खंत खासदार खैरे यांना समजताच त्यांनी एक बस उपलब्ध करून ५० महिलांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. यावेळी नगरसेवक रावसाहेब आम्ले, शिवाजी गायकवाड, नवनाथ मुळे, घाटी समितीचे अशासकीय सदस्य नारायण कानकाटे यांनी सहकार्य केले.

पोलिसांच्या धास्तीने लग्नसोहळा स्थलांतरित

मिटमिट्यातील रहिवाशांनी पोलिसांची एवढी धास्ती घेतली आहे की, गावातील एक लग्नसोहळाच स्थलांतरित करण्यात आला. १२ मार्च रोजी मिटमिट्यातील एका तरुणाचा विवाह आहे. लग्नाच्या पत्रिकाही वाटल्या गेल्या. मात्र पोलिसांच्या मारहाणीत या कुटुंबातील सदस्य गंभीर जखमी झाले, त्यांना टाकेही घालावे लागले. त्यानंतर पोलिसांच्या दहशतीने घरातील पुरुष मंडळी आसपासच्या गावातील नातेवाईकांकडे मुक्कामी गेले. गावातच वराला हळद लागायची होती, गावातून वऱ्हाड जायचे होते, पण पोलीस ऐन कार्यक्रमात येऊन धडकले तर? या भीतीपोटी ना गावात हळद लागली, ना गावातून वऱ्हाड निघाले. सर्वांना मोबाईलवर निरोप गेले की, शेजारच्या पाहुण्याच्या गावातून वऱ्हाड जाईल आणि हळदही तिकडेच लागेल. त्यानुसार सारी फेरव्यवस्था करण्यात आली.

त्या पोलिसांवर कारवाई करू – घाडगे

दरम्यान, मिटमिट्यातील प्रकरणात चौकशीअंती जे पोलीस कर्मचारी दोषी आढळतील त्यांच्याविरोधात कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन उपायुक्त डॉ. दीपाली घाडगे यांनी दिले.

मनपा शाळेतून विद्यार्थीही गायब

ह पोलिसांच्या मारहाणीच्या चौकशीसाठी उपायुक्त दीपाली घाडगे या गावभर पायी फिरल्या. यावेळी त्यांना आढळून आले की, पोलिसांच्या धाकाने गावात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले असून, गावातील पुरुष मंडळी गायब झाली आहेत. त्यांनी मनपा शाळेत भेट दिली असता शाळेच्या मुख्याध्यापिकेने त्यांना सांगितले की, आंदोलक आणि पोलिसांतील दंगलीनंतर गावची घडीच विस्कटून गेलेली असून गेल्या दोन दिवसांपासून एकही मुलगा शाळेत आलेला नाही. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक रावसाहेब आम्ले, वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डी.सी. शेवगण, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा शेडगे, उपनिरीक्षक शेख, पोलीस निरीक्षक समुद्रे, माळाळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

पोलिसी अत्याचार सीसीटीव्हीत कैद

पोलिसांनी मिटमिट्यात जी लूटमार केली, त्याचे अनेक व्हिडिओ सध्या व्हाटस् अप, फेसबूक आणि इतर सोशल मीडियावरून व्हायरल झालेले आहेत. रहिवाशांनी त्यांच्या घरात आणि घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील पोलिसांपासून लपवून ठेवलेल्या अनेक चित्रफिती घाडगे यांना दाखवल्या, ज्यात पोलीस मारहाण आणि नासधूस करीत असताना दिसून येतात. पोलिसांनी सीसीटीव्ही फोडण्याचेही प्रयत्न केले, परंतु एका बाजूचे सीसीटीव्ही फोडले तरी दुसऱ्या बाजूच्या सीसीटीव्हीत त्यांची कृती कैद झालेली असल्याने त्याचे पुरावे दाखवता आले. मारहाण आणि लूटपाट करणारे पोलीस नव्हतेच, अशी भूमिका घेणाऱ्या पोलीस मात्र व्हायरल झालेल्या या पुराव्यांनी तोंडघशी पडले.

आपली प्रतिक्रिया द्या