वीज बिल भरल्यानंतर संगणकीकृत पावतीचा आग्रह धरा!

सामना ऑनलाईन, मुंबई

‘महावितरण’च्या वीज बिलाची रक्कम भरण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी वीज बिल भरणा केंद्रे उपलब्ध आहेत. तसेच जिल्हा बँका, पतसंस्थांबरोबरच खासगी संस्थांनाही वीज बिल भरणा केंद्र चालवण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार ग्राहकांनी वीज बिल भरल्यानंतर शिक्का मारलेली साधी पावती न घेता संगणकीकृत पावतीचाच आग्रह धरावा असे आवाहन माहवितरणने केले आहे. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

ऑनलाइन किंवा मोबाईल ऍपने   बिल भरावे

सदर बिल भरल्याची सिस्टममध्ये ऑनलाइन नोंद न झाल्यास संबंधित ग्राहकाची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे पोस्ट ऑफिस वगळता इतर ठिकाणी वीज बिल भरल्यानंतर ग्राहकाने संगणकीकृत पावतीचा आग्राह धरावा. तसेच एखाद्या ठिकाणी साधी पावती दिल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ महावितरणच्या नजीकच्या कार्यालयात तक्रार करावी, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे. दरम्यान ग्राहकांनी वीज बिल भरणा केंद्रावर न जाता महावितरणच्या www. mahadiscom.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने किंवा मोबाईल ऍपच्या माध्यमातून भरण्याचे आवाहन केले आहे.

महावितरणचे राज्यात दोन कोटी वीज ग्राहक आहेत. त्यांनी वापरलेल्या विजेचे बिल प्रत्येक महिन्याला पाठवले जाते. त्यानुसार ग्राहकाने वीज बिल भरणा केंद्रावर बिलाची रक्कम भरल्यानंतर त्यांना संगणकीकृत पावती देणे बंधनकारक आहे. मात्र अनेक ठिकाणी वीज बिलावरच पैसे भरल्याचा शिक्का मारला जात आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या