नाशिक शस्त्रसाठा प्रकरण: मुंबईतील तीन पोलिसांची गंभीर चूक, केले निलंबित

सामना ऑनलाईन । मुंबई

नाशिकमध्ये सापडलेल्या शस्त्रसाठा प्रकरणी मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व दोन पोलीस उपनिरीक्षकांना निलंबीत करण्यात आले आहे. या प्रकरणात वापरण्यात आलेल्या बोलेरो गाडीच्या चोरीची तक्रार नोंदविण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या गुरुवारी नाशिक जवळील चांदवड येथे बोलेरो गाडीत पोलिसांना मोठा शस्त्रसाठा सापडला होता. याप्रकरणाचा तपास केला असता गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली बोलेरो गाडी मुंबईतील आंबोली भागातील असल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी या गाडीचा मालक फिरोज खान याची चौकशी केली असता त्याने आपण ६ डिसेंबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला गेलो होतो, मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याचे त्याने सांगितले.

“फिरोज खान तक्रार नोंदवायला गेले असता पोलीस उपनिरीक्षक गणेश देवकाते यांनी तक्रार दाखल करून घेण्याऐवजी त्यांना परिसरातच शोधाशोध करायला सांगितली व त्यांना दोन दिवसांनी येण्यास सांगितले. दोन दिवसांनी जेव्हा फिरोज पुन्हा पोलीस ठाण्यात गेले तेव्हा पोलीस उपनिरीक्षक काथे ड्युटीवर होते. त्यांनी त्यांनी देवकाते यांना भेटण्यास सांगितले. या दोघांनीही फिरोज यांची तक्रार नोंदवून न घेता त्यांना ताटकळत ठेवले. तसेच पोलीस निरीक्षक गजानंद सरगार यांच्या पोलीस ठाण्यात हा प्रकार घडल्याने या तिघांना निलंबीत करण्यात आले आहे”, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

मास्टरमाईंडच्या घरातून सापडली बनावट कागदपत्रं

या प्रकरणातील मास्टरमाईंड बडिउझामन पाशा उर्फ सुका याच्या शिवडी येथील घरावर पोलिसांनी धाड टाकली असता त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रं सापडली आहेत. त्यात बनावट स्टॅम्प पेपर, इन्श्युरन्स कंपन्यांची कोरी कागदपत्रं, रबर स्टॅम्प्स, बनावट ओळख पत्रं, बँकांच्या चेकबुकचा समावेश आहे. याप्रकरणी पाशा विरोधात फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुंब्रा येथील करिम नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. करिम व पाशा हे दोघे मिळून बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकांकडून लोन घ्यायचे असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आणखी चौघांना अटक

बोलेरो कार चोरी करण्यासाठी पाशा याची मदत करणाऱ्या आणखी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मेहताब खान, मोहम्मद सिद्दीकी आणि शाहबाझ अझगर अली अशी त्या तिघांची नावे असून त्यांनी बोलेरोमध्ये शस्त्रे लपविण्यासाठी छुपे कप्पे देखील तयार केले होते. तसेच संजय साळुंखे या गॅरेज मालकाला देखील अटक करण्यात आली आहे.