वडिलांचं छत्र हरपलं; आईनं मजुरी करून शिकवलं, पोरानं पथकर नाक्यावर काम करत पोलीस निरीक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण केलं

>> वसंत पवार

‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ या उक्तीप्रमाणे कठोर मेहनत आणि जिद्द असेल तर कोणतेही काम साध्य होते हे पोलीस उपनिरीक्ष पदाला गवसणी घालणाऱ्या नागेश रोडेवाड या तरुणाने सिद्ध करून दाखवले. मनात जिद्द होती, स्वत:ला सिद्ध करायचे होते. आई-बहिणीचे स्वप्न पूर्ण करायचे होते. वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले. आई पार्वतीबाई रोडेवाड हिने मोजमजुरी करून शिकवले. तिच्या विश्वासाला तडा न जाऊ देता नागेशने पथकर नाक्यावर काम करून जिद्द व चिकाटीच्या बळावर पोलीस निरीक्षक पद मिळवले.

मुखेड येथील रहिवासी पार्वतीबाई लक्ष्मण रोडेवाड यांना एक मुलगा व दोन मुली असा परिवार. मजुरी करून त्या आपल्या कुटुंबाचा गाडा हाकायच्या. मुलांसाठी दिवस रात्र मेहनत करुन कष्ट घेणाऱ्या आणि मुलगा मोठा अधिकारी झाला पाहिजे हे आईचे स्वप्न नागेशने पोलीस उपनिरीक्षकपद मिळवत पूर्ण केले. याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.

पार्वतीबाई रोडेवाड यांचे पती लक्ष्मण रोडेवाड हे गवंडी काम करून आपली उपजिविका भागवत होते. एक मुलगा व दोन मुली असा त्यांचा परिवार. लक्ष्मण रोडवाड यांचे अपघाती निधन झाले. त्यावेळी नागेश 13 वर्षाचा होता. नवऱ्याच्या पश्चात मुलाच्या शिक्षणासाठी पार्वतीबाई शेतमजुरी, डोक्यावर वाळू वाहने, धुणी-भांडी करणे, विवाह सोहळ्यात चपात्या लाटून देणे आदी कामे करून उपजिविका भागवत होत्या. मुलांच्या शिक्षणात कमतरता भासू नये असे पार्वतीबाई यांना वाटायचे.

हलाखीच्या परिस्थितीमुळे दोन्ही मुलीचे शिक्षण पाचवीतच बंद झाले. शिक्षण बंद झाल्यामुळे दोन्ही मुली आई सोबत मजुरी करू लागल्या. त्यामुळे आईला नागेशच्या शिक्षणासाठी बहिणींचा खारीचा वाटा व हातभार मिळू लागला. महागाईमुळे संसारात कमतरता जाणवतच होती. त्यामूळे शिक्षणासोबतच दोन बहिणी व आईची जबाबदारी नागेश वर होतीच. अठारा विश्व घरात दारिद्रय असलेल्या नागेशने मोठा अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. यासाठी अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथील पथकर नाक्यावर रात्र पाळीचे काम पत्करले.

दिवसभर कॉलेज, क्लास करायचे आणि राञी 12 ते सकाळी 8 या वेळेत पथकर नाक्यावर काम कराये. रोजचा येऊन जाऊन 80 किलोमटीर प्रवास व्हायचा. पथकर नाक्यावर काम करत पदवीपर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले. त्यामुळे दोन्ही बहिणींच्या लग्नकार्यात त्याचाही हातभार लागला. पुढे श्रीराम कंधारे या मित्राने शिक्षणासाठी नागेशला पुणे विद्यापिठात बोलावले. हा निर्णय नागेशसाठी महत्वपूर्ण ठरला. नागेशने विद्यापिठात प्रवेश घेतला व तिथे ‘कमवा व शिका’ योजनेत आपल्या नावाची नोंद केली. यामुळे नागेशचा थोडा फार खर्च भागायचा. आई सुद्धा घरखर्च भागवत पैसे पाठवायची. या सोबतच मित्राचीही थोडीफार आर्थिक मदत मिळाली.

नागेशने ‘दै. सामना’शी बोलताना सांगितले की, मित्र मला भावी पी.एस.आय म्हणून बोलायचे. त्यातील भावी ‘शब्द’ वगळण्यात मी यशस्वी झालो. परिस्थीती कशीही असो आपण आपले ध्येय ठरवून अभ्यास केला तर यश निश्चित मिळते. ध्येय निश्चित करा यश तुमचेच असा सल्ला त्याने दिला.