महिलांकडून पैसे उकळणार ठग गजाआड

इन्स्टाग्रामवर विविध राजवाडय़ांतील फोटो अपलोड करून महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळय़ात अडकवून त्याच्याकडून पैसे उकळणाऱ्या ठगाला गोरेगाव पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. फुकराज देवासी असे त्याचे नाव असून त्याने आतापर्यंत अनेक महिलांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. गेल्या वर्षी जुहू पोलिसांनी देवासीला एका गुह्यात अटक केली होती. नुकताच तो तुरुंगातून सुटल्यावर त्याने महिलांकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली.

तक्रारदार या महिला व्यावसायिक आहेत. त्यांचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट आहे. काही महिन्यांपूर्वी फुकराजने महिलेला रिक्वेस्ट पाठवली होती. ती रिक्वेस्ट महिलेने स्वीकारली. फुकराजने इन्स्टाग्रामवर अनेक राजवाडय़ांतील फोटो अपलोड केले होते. त्याने आपली राजस्थानातील काही राजासोबत ओळख असल्याच्या भूलथापा मारल्या. फुकराजने महिलेला प्रेमाच्या जाळय़ात ओढले. त्याने तिचे नकोसे फोटो काढल्याचे सांगून महिलेकडून चार लाख रुपये उकळले. बदनामी होऊ नये म्हणून महिलेने पैसे फुकराजला दिले.   पैशासाठी फुकराज हा महिलेला त्रास देत असायचा. अखेर महिलेने गोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी फुकराजविरोधात गुन्हा दाखल केला. परिमंडळ 11 चे पोलीस उपायुक्त अजयकुमार बन्सल यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय थोपटे यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक अतुल सानप, उगले, राठोड आदी पथकाने तपास सुरू केला. फुकराज हा विरार परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अखेर पोलिसांनी फुकराजला ताब्यात घेऊन अटक केली. फुकराजविरोधात गेल्या वर्षी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्या गुह्यात तो वर्षभर तुरुंगात होता. तुरुंगातून तो नुकताच बाहेर आला होता. बाहेर आल्यावर त्याने महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली होती. फसवणुकीच्या पैशातून फुकराज मौजमजा करत असायचा. त्याने आतापर्यंत किती महिलांकडे पैसे मागितले आहेत, याचा तपास गोरेगाव पोलीस करत आहेत. फुकराजला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.