पालखी मार्गावर यंदा उन्हाचे टेन्शन, वारी लवकर आल्याने उपाययोजना; वारकऱ्यांना सावलीसाठी तंबू, मंडप उभारणार

यंदा देहू, आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळा लवकर असल्याने प्रशासनाने ऊन आणि उष्माघात यांचे टेन्शन घेतले आहे. पालखीमार्गावर ठिकठिकाणी तंबू, मंडप उभारून सावलीची सोय करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या. रस्तारुंदीकरणात पालखीमार्गावरील झाडे नष्ट झाल्याने मार्गावर झाडे लावण्यासाठी विशेष नियोजन करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.

पालखी सोहळा तयारीसाठी आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत पालखी सोहळय़ातील प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दोन समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यांतील एक समिती पालखी सोहळा पूर्ण होईपर्यंत दरआठवडय़ाला नियोजन करेल. तसेच पुढील वर्षभरात करण्यात येणाऱया उपाययोजनांसंदर्भात दुसरी समिती नियोजन करणार आहे. बैठकीत संस्थानांनी पालखी सोहळय़ादरम्यान येत असलेल्या समस्यांचा पाढाच वाचून दाखविला.

जूनमध्ये पंढरपूरजवळ टोल नको
पंढरपूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर टोल सुरू करण्याचे नियोजन पुढील महिन्यात अर्थात जूनमध्ये होणार आहे. याबाबत सर्व संस्थानप्रमुखांनी हा टोल जूनऐवजी जुलैमध्ये सुरू करावा, अशी आग्रही मागणी केली. त्यावर ‘एनएचएआय’ प्रकल्प व्यवस्थापकांनी सांगितले, यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केल्यास हा टोल जुलैमध्ये सुरू करता येईल, मात्र पाटील यांनी तातडीने यावर हस्तक्षेप करीत हा टोल जूनमध्ये सुरू झाला तरी वारकऱयांच्या सर्व वाहनांना मोफत पास देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश प्रकल्प संचालकांना दिले.