297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश

2721

पनवेल महानगरपालिका हद्दीतील 297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महानगरपालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी  मंगळवार, दि. 20 रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत नगरविकास विभागाला दिले.

योगेश सागर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे समायोजन पनवेल महानगरपालिकेत करण्याबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची बाजू मांडली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी बैठकीत बोलताना सांगितले की, दिनांक 22 जानेवारी 2019 रोजी कोकण विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या शासन नियुक्त समितीने सदर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा प्रस्ताव सर्वानुमते मान्य केलेला आहे, तसेच महानगरपालिकेच्या प्रस्तावित आकृतीबंधामध्ये या कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी महानगरपालिकेले पदनियुक्तीसाठी प्रस्तावित केलेली असून या संदर्भात लवकरात लवकर कार्यवाही व्हावी, अशी मागणी केली.

नगरविकास विभागाचे उपसचिव जाधव यांनी यावेळी सांगितले कि, सर्व कागदपत्रे तपासण्याचे काम आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्याकडे सुरु आहे. यावर आयुक्त तथा संचालकांचे प्रतिनिधी व उपसंचालक पाटणकर यांनी तपासणी पूर्ण झाल्याचे बैठकीत नमूद केले. तपासणी नुसार 320 पैकी 01 कर्मचारी सेवानिवृत्त झाला असून, 22 कर्मचाऱ्यांच्या वेतन खात्यांचा मेळ लागत नाही. उर्वरित 297 कर्मचाऱ्यांना समायोजित करण्यास सकारात्मक अहवाल नगरविकास विभागाला सादर केल्याचे पाटणकर यांनी यावेळी सांगितले.

यावर योगेश सागर यांनी सदर 297 कर्मचाऱ्यांना तात्काळ महानगरपालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश नगरविकास विभागाचे उपसचिव जाधव यांना दिले. या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ.कविता चौतमोल, पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या