Intel lay off news : इंटेल 18 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार; खर्चात 20 अब्ज डॉलरची कपात करणार

अमेरिकन चिप निर्माता कंपनी इंटेलने गुरुवारी कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. इंटेल कंपनी 15 टक्के कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे. या कंपनीमध्ये सध्या 1 लाख 24 हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत असून जवळपास 18 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात येणार आहे. त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.

यंदाच्या वर्षी खर्चात 20 अब्ज डॉलरची कपात करण्याची इंटेलची योजना आहे. नुकताच कंपनीला 1.6 अब्ज डॉलरचे नुकसान झाले होते. त्यामुळे कंपनीने खर्चात कपात करण्यासाठी कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर कंपनीच्या शेअर 1 टक्क्यांनी वधारला. तत्पूर्वी शेअरमध्ये 40 टक्क्यांहून अधिक घसरण पहायला मिळाली होती.

अमेरिकेमध्ये हिंदुस्थानमध्ये इंटेलचे सर्वात मोठे डिझाईन आणि इंजिनिअर सेंटर आहे. बंगळुरू आणि हैदराबाद येथे याचे कार्यालय आहे. येथे 13 हजारांहून अधिक कर्मचारी काम करतात. आता इंटेलने घेतलेल्या कर्मचारी कपातीच्या निर्णयाचा फटका या कर्मचाऱ्यांनाही बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गेल्यावर्षीही इंटेल कंपनीने मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली होती. इंटेलने 2023 मध्ये 5 टक्के कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. यामुळे 2025 पर्यंत 1 हजार कोटी डॉलरचा खर्च वाचेल असे स्पष्टीकरण त्यावेळी कंपनीने दिले होते.