बुद्धीवादी भित्रे आणि संधीसाधू; भाजपच्या दिलीप घोष यांची टीका

22

सामना ऑनलाईन । कोलकाता

बुद्धीवादी हे भित्रे आणि संधीसाधू असल्याचा आरोप पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे. या बुद्धीवाद्यांना सरकारकडून मिळणारे फायदे मिळवण्यातच समाधान वाटते असेही ते म्हणाले. जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जी यांच्या 66 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात घोष बोलत होते. तृणमूल काँग्रेसने घोष यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पश्चिम बंगाल हिंसाचाराने धमुसत आहे. तृणमूलच्या गुंडाकडून विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात येत आहेत. तृणमूलचे गुंड राज्यात हैदोस घालत असताना समाजातील बुध्दीवादी मूग गिळून गप्प आहेत. त्यांना राज्य सरकारचा रोष ओढवून घेण्याची इच्छा नाही. सरकारकडून फायदे मिळवण्यातच त्यांचे समाधन असल्याने ते गप्प आहेत, असे घोष म्हणाले. बुध्दीवादी गप्प बसल्याने तृणमूलही त्यांना पाठिंबा देत असून त्यांना फायदे देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. घोष यांच्या वक्तव्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तृणमूल काँग्रेसने आणि समाजातील काही संस्थानी घोष यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. घोष यांनी या वक्तव्याबाबत माफी मागावी अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे नेते फिर्याद हकीम यांनी केली आहे. या वक्तव्यातून समाजातील प्रतिष्ठीत बुध्दीवाद्यांबाबतची भाजपची मानसीकता स्पष्ट होते असे ते म्हणाले. भाजपची संकुचित मनोवृत्ती जनतेला समजली आहे, असेही ते म्हणाले.

घोष यांच्या या वक्तव्याने भाजपची संकुचित मानसीकता दिसून येत आहे. पश्चिम बंगालची संस्कृती आणि इतिहासाचा आदर नसल्यानेच अशी वक्तवे करण्यात येत आहेत, असे प्रसिद्ध कवी आणि साहित्यिक सुबोध सरकार यांनी सांगत या वक्तव्याचा निषेध केला आहे. घोष यांनी पुन्हा एकदा बुद्धीवाद्यांवर टीका केल्याने पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. काही वर्षापूर्वी घोष यांनी नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांच्यावरही टीका केली होती. त्यावेळीही वाद उफाळला होता. मात्र, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून बुद्धीवाद्यांपर्यंत पोहचून पश्चिम बंगालमध्ये जनमत मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तरीही घोष यांच्या या वक्तव्यामुळे वाद उफाळण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या