
निवडणुकीपूर्वी पंजाबमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेबाबत गुप्तचर यंत्रणांनी इशारा दिला आहे. या संदर्भात, राज्य पोलिसांना संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा अधिक कडक करण्यास सांगण्यात आले आहे. त्यासोबतच सोशल मीडियावर बारीक नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवादी कारवायांच्या शक्यतेबाबत राज्य पोलिसांना यापूर्वीच अनेक सुरक्षा सूचना देण्यात आल्या आहेत. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. केंद्रीय गुप्तचर संस्था या संदर्भात राज्य पोलीस आणि स्थानिक गुप्तचर संस्था यांच्याशी समन्वय साधत आहे.
एनडीटिव्हीने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. या संदर्भात राज्याच्या गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आम्ही दहशतवादी कारवायांचा इशारा दिल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही सोशल मीडियावर बारीक लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. ते म्हणाले की, सध्या कश्मीरपेक्षा पंजाबमधील परिस्थिती अधिक गंभीर आहे.
ते म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी सीमेवरील भागात ड्रोनच्या हालचाली दिसल्या होत्या, जिथे हिंदुस्थानच्या हद्दीत स्फोटके आणि शस्त्रे टाकली गेली होती. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी त्यांचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. नुकतेच लुधियानामध्ये बॉम्बस्फोटाची घटना समोर आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने पंजाबमधील लुधियाना येथील जिल्हा न्यायालय संकुलात गुरुवारी झालेल्या स्फोटाचा सविस्तर अहवाल मागवला आहे, ज्यात एकाचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले.
गुरदासपूर सेक्टरमधील हिंदुस्थान-पाक सीमेवर बीएसएफने हिंदुस्थानच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत असताना एका घुसखोराला गोळ्या घालून ठार केले. अमृतसर आणि गुरुदासपूरमध्ये ठार झालेल्या तरुणांची ओळख पटलेली नाही. 20 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पंजाबच्या गुरुदासपूर सेक्टरमध्ये एक ड्रोन दिसला. बीएसएफच्या जवानांनी पाच राऊंड फायर केले पण तो परत पाकिस्तानच्या हद्दीत गेला.