चहापानावर बहिष्कार हा देशद्रोह कसा? अंबादास दानवे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

औचित्याचा मुद्दा उपस्थित करत चहापानावर बहिष्कार टाकणे हा देशद्रोह कसा होतो, ते सत्ताधारी महाराष्ट्रद्रोही सरकारने, मुख्यमंत्र्यांनी सिद्ध करावे, असा हल्लाबोल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत केला. त्यावर संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री सभागृहात येऊन यावर उत्तर देतील, अशी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. उपसभापती नीलम गोऱहे यांनीही मुख्यमंत्रीच यावर स्पष्टीकरण देतील, अशी भूमिका मांडल्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी वेलमध्ये उतरत घोषणाबाजी केली. ‘विरोधकांना देशद्रोही म्हणणाऱया सरकारचा धिक्कार असो,’ ‘नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी’ अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. या गदारोळातच पुरवणी मागण्या, शोकप्रस्ताव आणि तालिका सदस्यांची नियुक्ती जाहीर करत सभागृहाचे कामकाज उद्यासाठी तहकूब करण्यात आले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी विरोधी पक्षांसाठी आयोजित करण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘बरे झाले, देशद्रोही लोकांबरोबर चहापान टळले’, असे विधान केले. आज विधान परिषदेचे कामकाज वंदे मातरम आणि महाराष्ट्र गीतानंतर सुरू झाल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आक्रमकपणे विरोधकांची भूमिका मांडली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सदस्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. मुख्यमंत्र्यांनी या विधानाबाबत स्वतः उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विरोधकांनी केली. विधान परिषदेचे सदस्य अनिल परब, सचिन अहिर, मनीषा कायंदे, विलास पोतनीस, सुनील शिंदे, एकनाथ खडसे, विक्रम काळे, अनिकेत तटकरे, भाई जगताप यांनी वेलमध्ये उतरत सरकारचा निषेध केला आणि विरोधकांना देशद्रोही म्हणणाऱया सरकारचा धिक्कार असो, अशी जोरदार घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले.

गदारोळात कामकाज संपले  

संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील आणि नीलम गोऱहे यांनी मुख्यमंत्री सभागृहात उपस्थित नाहीत. ते स्वतः सभागृहात उपस्थित राहून याबाबत स्पष्टीकरण देतील, असे सांगितले. मात्र, यावर समाधान न झाल्यामुळे विरोधक अधिक संतप्त झाले आणि त्यांनी वेलमध्ये उतरत सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली. 15 ते 20 मिनिटे सुरू असलेल्या गोंधळातच उपसभापती नीलम गोऱहे यांनी पुरवण्या मागण्या, शोकप्रस्ताव मांडला आणि तालिका सदस्यांची नावे जाहीर करत सभागृहाचे कामकाज उद्यासाठी तहकूब केले.

 मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य आक्षेपार्ह   

मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाला दिलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली. तसे पत्र आम्ही मुख्यमंत्र्यांना दिले होते. असे असतानाही मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाच्या या भूमिकेबद्दल बोलताना ‘बरे झाले, देशद्रोही लोकांनी चहापानावर बहिष्कार घातला’. असे आक्षेपार्ह वक्तव्य केले. देशद्रोही कोण हे मुख्यमंत्र्यांनी सिद्ध करावे. चहापानावर बहिष्कार टाकणे हा देशद्रोह कसा होतो, ते महाराष्ट्रद्रोही असलेल्या मुख्यमंत्र्यांनी सिद्ध करावे. आम्हाला देशद्रोही म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सरकार महाराष्ट्रद्रोही असल्याची कबुली दिली आहे. हे सरकार महाराष्ट्रद्रोही आहे, मुख्यमंत्र्यांनी तत्काळ सभागृहात याबाबत भूमिका स्पष्ट करावी, असा हल्लाबोल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.