अंगावर खाजखुजली टाकून लुटणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

57

सामना प्रतिनिधी । पुणे

खाजखुजलीची पावडर अंगावर टाकून, तसेच अंगावर घाण-कचरा पडल्याचे सांगून नागरिकांना लुटणाऱ्या १४ जणांच्या आंतरराज्य टोळीला मुंढवा पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असताना अटक केली. त्यांच्याकडून सात दुचाकी, १४ मोबाईल फोन, कोयते, सुरा, चॉपर, कटावणी, लोखंडी धातूच्या गोळ्या, मिरची, खाज सुटणारी पावडर असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

चला सनी येलिया सल्ला (वय २६), राजेश जेमीस गोगुला (वय २३), संतोष देवरकोंडा रामलूर (वय ३६), राकेश दावित आवला (वय १९),येशेबू जानू गोगला (वय ५२), शिवकुमार रविबाबू पिटला (वय ३६), उतजल सुबलू आवला (वय ४०), सुभाष रवि वानाळू (वय २९), व्हिक्टर रविबाबू पिटला (वय ३०), आमुस तिपुय्या आवला (वय ३२), माधव सुंदरम गोगला (वय ३७), चित्रा बाबू कुनचाल्ला (वय २९), विजयकुमार शेखर रेड्डी (वय २६) आणि सॅम्युल राज तिमोती राज (वय २५, सर्व रा. बिटरगुंटा, ता. कवली, जि.नेल्लूर, आंध्र प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

रविवारी रात्री केशवनगर येथे बंगल्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी मुंढवा, हडपसर, वानवडी, कोंढवा, चंदननगर, विमाननगर, भोसरी, एमआयडीसी, पुणे ग्रामीण, ठाणे शहर व ठाणे ग्रामीण, तसेच तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी ठिकाणी गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. या दोन टोळया असून, चिन्ना कुनचाल्ला आणि माधव गोगला असे दोघे त्यांचे म्होरके आहेत. शहरात मागील काही महिन्यांत बँकांतून रोकड काढून घरी जाणाऱ्या नागरिकांना लुटण्याच्या घटना वाढल्या होत्या. या वाढत्या घटना लक्षात घेऊन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी गुन्हे रोखण्याचा आदेश दिला होता. यासाठी वानवडी विभागाअंतर्गत एक पथक तयार केले होते. हे पथक मागील दीड महिन्यापासून या टोळीचा शोध घेत होते. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पात्रुडकर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गवळी, पोलीस कर्मचारी सोनवणे, चव्हाण, जगताप, गायकवाड, शिंदे, विभुते, काकडे, भापकर यांच्या पथकाने केली.

रोकड लांबविण्यासाठी ही टोळी वेगवेगळी पद्धत वापरत होती. बँकेतून मोठी रक्कम काढून पायी जाणारे, दुचाकीवरून डिकीत किंवा हॅण्डलला बॅग लटकवून जाणाऱ्या नागरिकांना ते लक्ष्य करीत होते. त्यांच्या अंगावर खाजखुजलीची पावडर टाकून रक्कम पळविणे, पायी रोकड घेऊन जाणाऱ्याच्या अंगावर चघळलेले पारले बिस्कीट थुंकणे, अंगावर घाण पडल्याचे सांगून रोकड लांबविणे, मोटारीत कॅश घेऊन जाणाऱ्याची गाडी टोचण मारून पंक्चर करणे आणि गाडी पंक्चर झाल्याचे सांगून गाडीतील बॅग लांबविणे, मोटारीची काच लगोरमधून लोखंडी गोळ्या मारून फोडणे आणि बॅग लांबविणे, तसेच पैसे पडल्याचे सांगून रोकड लांबवत होते.

आपली प्रतिक्रिया द्या