सखेसोबती .. बापाविना पोरं…

15

<< योगेश नगरदेवळेकर >>   << [email protected] >>

जोडीदार नसताना स्वतःच्या शरीरात योग्य ते बदल करून घेऊन पिल्लू जन्माला घालण्याची किमया एका लेपर्ड शार्कच्या बाबतीत बघायला मिळाली.

स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करता येणे हे सजिवांचे प्रमुख लक्षण मानले जाते. प्राणी, पक्षी, वनस्पती यांना ते सारखेच लागू पडते. आपला वंश टिकून राहावा यासाठी ही सोय असते.

अगदी खडतर परिस्थितीतही आपल्या पिलांचे संरक्षण करणे ही निसर्गात टिकून राहण्यासाठीची आवश्यक गोष्ट असते. नवीन जीव जन्माला येण्यासाठी मातापित्यांची गरज असते ही गोष्ट नैसर्गिक आहे. परंतु नर जोडीदार नसताना स्वतःच्या शरीरात योग्य ते बदल करून घेऊन पिल्लू जन्माला घालण्याची किमया एका लेपर्ड शार्कच्या बाबतीत बघायला मिळाली.

ऑस्ट्रेलियातील ‘रीफ एचक्यू मत्स्यालयात’ लिओनी नावाची लेपर्ड शार्क तिच्या जोडीदाराबरोबर २०१३ पर्यंत एकत्र होती. त्यांना पिल्लं पण झाली होती. जागेअभावी या जोडीला विभक्त करण्यात आलं.

२०१६ मध्ये आश्चर्यकारकरीत्या ‘लिओनी’ने दिलेल्या तीन अंडय़ातून पिल्लं बाहेर आली. सर्वांनाच या गोष्टीचे कुतूहल वाटले. सलग तीन वर्षे नर शार्क नसताना तिने दिलेल्या पिलाचे आश्चर्य वाटले.

या पिलांचे डीएनए टेस्टिंग केले असता त्यांच्यामध्ये फक्त मातेचेच डीएनए आढळून आले. अशारीतीने फक्त मातेचे गुणधर्म असलेले शार्कच्या बाबतीत हे पहिलेच उदाहरण नोंदवले गेले.

यावर अधिक संशोधन करताना असे आढळून आले की भवतालची परिस्थिती जगण्यासाठी प्रतिकूल होत असल्यास वंशसातत्य राखण्यासाठी अशा प्रकारचा बदल सजिवांमध्ये आढळून येतो. काही वनस्पती, माश्या, विंचू, पाली यामध्ये अशा प्रकारचे वर्तन आढळून येते.

हे पूर्णपणे लिंगबदल नसून अलैंगिक प्रजननाचा प्रकार आहे.

आता वैज्ञानिक या तीन पिलांच्या मोठे होण्याकडे डोळे लावून बसले आहेत. ही पिले मोठी झाल्यावर अशाच प्रकारचे अलैंगिक प्रजनन करू शकतात का याबाबतचे कुतूहल वाढले आहे.

निसर्गाचे हेच वैशिष्टय़ आहे. आपल्याला वाटतं आपल्याला खूप समजलंय; पण अशा घटनांतून आपण निसर्गाबद्दल अजूनही खूप कमी जाणतो हे समजून येतं.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या