बजेटमध्ये मनाजोगते घर सजवा

>> सुनील देशपांडे, इंटिरिअर डिझायनर

फक्त छोटय़ा छोटय़ा गोष्टींकडे आपण लक्ष दिले तर आपले स्वप्नातले घर आपल्या बजेटमध्ये सत्यात सुंदररीत्या उतरू शकते.

आपण नवीन घर घेतो तेव्हा बरेच वेळा कर्ज वगैरेमध्ये सर्व पैसे संपलेले असतात. आपले घर छान सजवावे असे प्रत्येकाला वाटत असते, पण बजेट आडवे येते आणि मग आपण जे मिळेल ते फर्निचर आणून ठेवतो. इथे तिथे पाहून मिळेल ते लाइट्स, रंग मारतो व त्यानंतर लक्षात येते की, मनासारखे घर काही सजले नाही. कारण ते घर व घरातील गोष्टी एकमेकांशी बोलत नाहीत म्हणजेच त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध लागत नाही. मग आपण बरेच पैसे खर्च करूनसुद्धा मनाजोगते घर सजवल्याचा आनंद घेऊ शकत नाही.

घरातील वस्तूंचीच नुसती सांगड घालणे गरजेचे नाही, तर ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत असणेसुद्धा महत्त्वाचे आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसे करायचे तर सोपे आहे. इंटिरियर करायचे तर खूप पैसे लागतात. स्काय इज द लिमिट, कराल तेवढे थोडेच वगैरे सगळे खरे असले तरी तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला हवे तसे इंटिरियर नक्कीच करता येते.

त्यासाठी सगळय़ात पहिल्यांदा तर तुमच्या घराबद्दलच्या कल्पना एका कागदावर उतरावा व त्या आपल्या इंटिरियर डिझाइनरला द्या. मार्पेटमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत, पण ते तुमच्या गरजेनुसार बजेटमध्ये कसे बसेल ते पहा आणि त्याप्रमाणे करा असे इंटिरियर डिझायनरला सांगा. यासाठी नीट मार्पेट सर्व्हे करावा.

बजेटमध्ये बसवताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा बेसिक मटेरियलमध्ये कुठेही तडजोड करू नका. नियोजनाला (प्लॅनिंग स्टेज) थोडा वेळ लागला तरी चालेल, पण घाईघाईत निर्णय घेऊ नका. आपले पूर्ण घर कागदावर पहा. छोटय़ा छोटय़ा गोष्टी कुठे कशा असणार हे जाणून घ्या. थ्रीडीमध्ये तुम्ही निवडलेल्या लहानसहान गोष्टी पाहता येतात. त्यामुळे सगळे घर डोळय़ांसमोर येते. तुमच्या आवडी-निवडी घरातील फर्निचर, लाइट्स, कलर, आर्टिफॅक्टस, पडदे सगळे एकमेकांशी बोलायला लागतील व कुठे तरी ते सर्व तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी झलक दाखवतील आणि तेही तुमच्या बजेटमध्ये झाल्याचा आनंद तुम्हाला देऊन जातील.

पाहिलात फक्त छोटय़ा छोटय़ा गोष्टींकडे आपण लक्ष दिले, तर आपले स्वप्नातले घर आपल्या बजेटमध्ये सत्यात सुंदररीत्या उतरू शकते. त्यासाठी वरील लहानसहान गोष्टी आपल्या इंटिरियर डिझायनरबरोबर शेअर करा व आपले स्वप्न साकार करा.