बीडमध्ये शेर-सव्वाशेरच्या लढाईत राज्याचे राजकारण वेटिंगवर

39

उदय जोशी । बीड

बीड शहरातील काकू-नाना आघाडी म्हणजे राष्ट्रवादीतील तरुणांनी बंडाचे निशाण फडकवत एकत्र येऊन बांधलेली मोट सध्या भलतीच फॉर्मात आहे. काकू-नाना आघाडीची सगळीकडून कोंडी करण्याचा प्रयत्न झाला, मात्र शेर कोण अन् सव्वा शेर कोण? या लढाईत संपूर्ण राजकारण वेटिंगवर ठेवले गेले आहे. विधानपरिषदेचा निकाल लागला, मात्र अत्यंत चुरशीच्या या लढाईचा निकाल ज्या काकू-नाना आघाडीच्या न्यायालयीन लढाईमुळे लांबला, त्या आघाडीची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे. त्यानंतर हे प्रकरण नेमकं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न सुरू झाला.

बीड शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सगळीकडे दुर्गंधीमुळे शहराचे आरोग्य धोक्यात आले आहे. या कारणामुळे विरोधी बाकावर असणाऱ्या काकू-नाना आघाडीने नगर पालिकेत कचरा फेको आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे नगर विकास राज्यमंत्री यांनी विधानपरिषदेच्या अगदी तोंडावर काकू-नाना आघाडीच्या दहा सदस्यांना अपात्र ठरवले होते. मात्र ही दहा मते वेगळी ठेवण्यात यावी आणि गरज भासली तरच या मताची मोजणी केली जाईल असा आदेश आल्यानंतर आघाडीने न्यायालयात धाव घेतली. आमच्या मताच्या गोपनियतेचा हा भंग असल्याचे त्यांनी म्हटले.

संपूर्ण प्रकरण गुंतागुंतीचे असल्यामुळे न्यायालयाने विधानपरिषदेचा निकाल लांबणीवर टाकला. या दहा मतांचा प्रश्न निकाली लागत नाही, तो पर्यंत विधानपरिषदेचा निकाल लागणार नाही, हे स्पष्ट केले. काकू-नाना आघाडीला गोत्यात आणणाऱ्या भाजपाच्या पथ्यावर हे प्रकरण पडले आहे. निकाल लांबणीवर पडल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले. बीड जिल्ह्यापूर्ती मर्यादित असलेली काकू-नाना आघाडी सध्या राज्यभर गाजत आहे. याशिवाय विधानपरिषद निवडणूक लढवणारे भाजपा उमेदवार सुरेश धस, आणि राष्ट्रवादी पुरस्कृत अशोक जगदाळे या दोघांनाही आता निकालासाठी वाट पाहावी लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या