विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्षाच्या स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांचा कल जाणून घेण्यासाठी मंगळवारी मतदान घेतले. या मतदान प्रक्रियेत विद्यमान आमदार आणि इच्छुक यांच्यात चांगलेच वाक्युध्द झाल्याचे पाहायला मिळाले. इच्छुकांना पक्षातंर्गत कल चाचणीतही दुय्यम वागणूक दिल्याने भाजपमधील धुसफूस आता बाहेर पडू लागली आहे. त्यामुळे पुढील काळात भाजपमधील अंतर्गत राजकारण उफाळणार असल्याचे दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष उमेदवारांची विविध पध्दतीने चाचपणी करत आहेत. मध्य प्रदेशमध्ये झालेल्या मागील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये उमेदवार निवडण्यासाठी पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांसाठी मतदान प्रक्रियेचा अवलंब भाजपने केला होता. ही प्रक्रिया महाराष्ट्रातदेखील राबवण्याचा प्रयत्न भाजपने केला; मात्र या प्रक्रियेचा बॅण्ड वाजवण्याचं काम भाजपच्या इच्छुकांनी केला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
मंगळवारी भाजपकडून खडकवासला, कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, कसबा, कॅन्टोन्मेंट मतदारसंघासाठी हे मतदान घेतले गेले. मात्र, पक्षांतर्गत मतदान मंगळवारी होणार असल्याची माहिती शहर पदाधिकाऱ्यांना सोमवारी दुपारी पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आली. मात्र, या बैठकीस दांडी मारलेल्या अनेक इच्छुकांना याबाबत कल्पनाच नव्हती. त्यामुळे याचे पडसाद निवडणूक प्रक्रियेत उमटले.
गेल्या दोन महिन्यांपासूनच शहरात विधानसभेचे चांगलेच वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांतील इच्छुक उमेदवार आपण अमुक मतदारसंघातून इच्छुक असल्याचे जाहिरातींद्वारे दाखवून देत आहेत. मात्र, भाजपमध्ये विधानसभेला इच्छुक झाल्यापासून काही मतदारसंघांत विद्यमान आमदारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तिकीट कोणाला मिळणार यापेक्षा इच्छुकांच्या दगाफटक्याने जागा जाणार की काय, अशी परिस्थिती सध्या भाजपमध्ये आहे. शहरातील सर्वच विधानसभा मतदारसंघांत प्रमुख पदाधिकाऱ्यांनीच उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
एका मतदारसंघात तर मोठी स्पर्धा सुरू असून, यातून धार्मिकस्थळीदेखील मानपाननंतर गुन्हे दाखल अशा अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या, तर शहरातील इतर मतदारसंघातदेखील पालिकेत एकत्र काम केलेल्या नगरसेवकांनी जाहिरातीतून स्पर्धाच सुरू केली आहे. उमेदवारी कोणाला मिळणार, याचा निर्णय पक्ष घेणार असला तरी सध्या विद्यमान आमदार आणि इच्छुकांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. अगदी एकमेकांची मने दुखविण्यापर्यंत कारस्थाने सुरू असल्याने ऐन विधानसभा निवडणुकीत भाजपचे अंतर्गत राजकारण चांगलेच तापणार आहे.