80 देशांतील डॉक्टर गिरवणार हिंदुस्थानात उपचाराचे धडे

सामना ऑनलाईन, नवी मुंबई

कर्करोग असेल वा हृदयासंबंधातील आजार, अनेक जण परदेशात जाऊन महागडे उपचार घेतात. मात्र जगभरातील तज्ञ डॉक्टर हिंदुस्थानी उपचार पद्धतीचे धडे गिरवणार आहेत.  नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात सर्वात मोठी वैद्यकीय शिखर परिषद उद्यापासून सुरू होत असून 80 देशांतील चारशे डॉक्टर तसेच वैद्यकीय क्षेत्रातील दहा हजार प्राध्यापक सहभागी होणार आहेत. त्यामुळे या परिषदेकडे वैद्यकीय जगाचे लक्ष लागले आहे.

वैद्यकीय उपचार पद्धतीमध्ये आधुनिक बदल घडवून आणण्यासाठी नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठामध्ये मेडइन्स्पायर 2019 या देशातील सर्वात मोठय़ा वैद्यकीय शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 14 ते 17 फेब्रुवारीदरम्यान चालणाऱ्या या परिषदेत जगभरातील 80 देशांतील तज्ञ डॉक्टर सहभागी होणार असून आधुनिक उपचाराचे धडे गिरवणार आहेत.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय पाटील यांच्या पुढाकारातून या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विदेशी तज्ञ डॉक्टरांबरोबर आपल्या देशातील 400 तज्ञ डॉक्टर आणि दहा हजार वैद्यकीय क्षेत्रातील प्राध्यापकही या परिषदेत सहभागी होणार आहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील विदेशी आणि देशी तंत्रज्ञानाची या शिखर परिषदेमध्ये देवाण-घेवाण होणार असल्याने नवीन उपचार पद्धती उदयाला येणार आहे. या परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल के. विद्यासागर राव यांच्या हस्ते होईल.

वैद्यकीय क्षेत्रातील 31 विभागांचे चर्चासत्र

या शिखर परिषदेमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील 31 विभागांचे चर्चासत्र पार पडणार आहे. सध्याच्या उपचार पद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी सुमारे 25 कार्यशाळाही या कालावधीत होणार असून चर्चासत्रात आणि कार्यशाळांमध्ये देश-विदेशातील तज्ञ डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. वैद्यकीय उपचार पद्धत आधुनिक बनवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे डॉ. विजय पाटील यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या