आंतरराष्ट्रीय मराठी पदार्थ

शेफ मिलिंद सोवनी

मराठी पदार्थांनी सातासमुद्रापार स्वतःची मोहर उमटवली आहे. पाहूया त्यांचे आगळेवेगळे स्वरूप.

परदेशात बनवण्यात येणाऱया हिंदुस्थानी पदार्थांमध्ये पंजाबी पदार्थ सगळ्यात जास्त खाल्ले जातात. त्यामानाने महाराष्ट्रीयन पदार्थ परदेशी नागरिक कमी प्रमाणात खातात. याचे मुख्य कारण म्हणजे मराठी अन्नपदार्थ परदेशात पोहोचवणाऱया व्यावसायिकांचं प्रमाण खूप कमी आहे. तरीही सागुती, कोल्हापुरी पदार्थ, मालवणी पदार्थ, मांसाहारी पदार्थ परदेशात आवडीने खाल्ले जातात. परदेशातील नागरिकांसाठी जेव्हा महाराष्ट्रातील चमचमीत पदार्थ बनवण्यात येतात तेव्हा त्यांच्या चवीत थोडाफार बदल करणे गरजेचे ठरते.

पदार्थांची नावे गमतीशीर…एखादा मराठी पदार्थ प्रसिद्ध करण्यासाठी त्याचे नावही आपल्या हिंदुस्थानी नावाप्रमाणेच परदेशात ठेवून चालत नाही, तर त्या पदार्थाच्या नावात बदल करणे गरजेचे असते. उदा. कोथिंबीर वडी ‘चिझमी कोटेड कोरिएंडर स्क्वेअर’ या नावाने परदेशात प्रसिद्ध आहे. विशेषतः जपानी लोकांना ही चिझमी लोकांचा हा विशेष आवडीचा पदार्थ आहे. पदार्थाचे नाव वेगळे ठेवले जाते तसेच त्याची मांडणीही आकर्षक असावी लागते. उदा. आपल्याकडे जो वडापाव मिळतो तसा वडापाव परदेशातील नागरिकांसाठी तयार करायचा असेल तर तो कॅनपेप्रमाणे तयार करावा लागतो. यासाठी ब्रेड गोल करून त्यावर एक छोटा बटाटा ठेवला जातो. हा पदार्थ तिथे स्टार्टर म्हणूनही खाल्ला जातो.

मालवणी फ्राईड प्रॉन्स

 साहित्य– ८ मोठी कोलंबी, आलं- लसूण पेस्ट १५  ग्रॅम, २ चमचे तिखट, अर्धा चमचा हळद, लिंबाचा रस २ चमचे, २ अंडी, तांदळाचे पीठ १ चमचा, पाव कप रवा, तेल.

कृती प्रथम कोळंबी सोलून स्वच्छ धुऊन घ्या. तिचा शेपटीकडचा भाग अखंड ठेवा. त्यानंतर लाल तिखट, हळद, आलं-लसूण पेस्ट, लिंबाचा रस,अंडी, पीठ आणि मीठ यांचं एकजीव मिश्रण तयार करा. साफ केलेल्या कोलंबीला हा तयार केलेला मसाला लावून ठेवा. ५ ते १० मिनिटे या कोलंबी मसाल्यात तशाच ठेवाव्यात. नंतर रव्यात कालवून गरम तेलात गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्याव्यात. एखाद्या मसालेदार चटणीबरोबर गरमागरम सर्व्ह कराव्यात.

कोलंबी आणि खेकडय़ाचे भरीत

साहित्य पापलेट मासा ३२०  ग्रॅम, आले-लसूण पेस्ट ३० ग्रॅम, १ चमचा लाल तिखट, हळद पाव चमचा, लिंबाचा रस १ चमचा, कोकम, १ अंडे, पीठ २ चमचे, जपानी ब्रेडक्रम्प १ कप, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल

टॉपिंगकरिता साहित्य  ६ कोलंबी चिरलेल्या, एका खेकडय़ाचे मांस, बारीक चिरलेला कांदा १ चमचा, १ चमचा चिरलेला टोमॅटो, १ चमचा आलं-लसूण पेस्ट, अर्धा चमचा जिरे, लाल तिखट पाव चमचा, अर्धा चमचा हऴद पावडर, अर्धा चमचा हिरवी चिरलेली मिरची, चिरलेली कोथिंबीर दीड चमचा, मीठ चवीनुसार, तेल १५ मिली.

कृती पापलेट स्वच्छ करून त्याचे ३.५ इंच आकाराचे पातळ काप करा. किंचितसं मीठ आणि अर्धा चमचा लिंबाचा रस ५ ते १० मिनिटांकरिता या माशाच्या तुकडय़ांना लावून ठेवा. त्यानंतर अंडी, आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, मीठ, पीठ, कोकम यांचे मिश्रण तयार करा. हा तयार केलेला मसाला सर्व माशाच्या तुकडय़ांना लावून ठेवावा. या मसाल्यामध्ये मासे चांगले मुरल्यावर त्यांना वरून जपानी ब्रेड क्रम्प लावून गरम तेलात गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्या.

टॉपिंगकरिता गॅसवर एका भांडय़ात तेल तापवा. तापलेल्या तेलात जिरे घाला. जिरे कडकडीत झाले की त्यावर कांदा घाला. त्यावर टोमॅटो, चिरलेली हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट घालून तेलात परतवा. यामध्ये चिरलेली कोलंबी आणि खेकडय़ाचे मांस घालून मिनिटभर परतावे. वरून लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ घालून काही सेकंद पुन्हा परतवून घ्या.

आपली प्रतिक्रिया द्या