‘योग’दान करणारे हठयोगी!

145

>>ज्योत्स्ना गाडगीळ

बाबा रामदेवांचे ‘योग’पर्व सुरू झाल्यापासून गल्लीबोळात `योगा’वर्गाचे पेव फुटले. ‘पॉवर योगा’, ‘मॉडर्न योगा’ अशा अनेकविध नावांखाली योगविद्येचा चक्क बाजार भरू लागला. मात्र, लोकांना तना-मनाची शांतता मिळावी, ह्या उद्देशाने ५० वर्षांपूर्वी एका हठयोग्याने, विनामूल्य योगप्रशिक्षण देणारी ‘अंबिका योग कुटिर’ नावाची संस्था सुरू केली. देश-विदेशातून लाखो लोक ह्या उपक्रमाशी जोडले गेले. योगविद्येत `योगदान’ देणारे ते हठयोगी होते, पुंडलिक रामचंद्र निकम. यंदाचे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. अशातच, ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’निमित्त त्यांचे कार्य उद्धृत करण्याची ही संधी म्हणजे `योगायोग’च म्हटला पाहिजे…

‘राष्ट्र बलवान करायचे असेल, तर समाज बलवान झाला पाहिजे’ ह्या समर्थ विचारांनी प्रेरित झालेले निकम गुरुजी बालपणापासूनच व्यायामाचे उपासक होते. तरुणपणी त्यांनी व्यायामशाळेतून अनेकांना व्यायामाची गोडी लावली. पोलिस दलात नोकरी पत्करल्यावर तिथेही त्यांनी व्यायामाचे लोण पसरवले, तसेच सहकाऱ्यांनाही व्यायामासाठी उद्युक्त केले. महाराष्ट्र पोलिस दलात सीआयडी शाखेत पोलिस उपनिरीक्षक पदावर ३७ वर्षांची नोकरी पूर्ण करून ते निवृत्त झाले.

‘बालयोगी’ ह्या हठयोग्याची योगविद्या पाहून स्तिमित झालेल्या निकम गुरुजींनी योगविद्येची संथा घेतली आणि रीतसर प्रशिक्षण पूर्ण केल्यावर गिरगाव येथील आपल्या राहत्या घरीच वैयक्तिक विनामुल्य शिकवणी सुरू केली. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शक्तीदेवतेच्या प्रेरणेने `अंबिका योग कुटिर’ असे योगवर्गाचे नामकरण करण्यात आले. गुरुजींची शिकवण्याची हातोटी पाहता हळू हळू त्यांचा शिष्य परिवार वाढू लागला. नोकरीतून निवृत्त झाल्यावर निकम गुरुजी ठाण्याच्या श्रीरंग सोसायटीत राहू लागले. त्यांचा बंगला योगवर्ग होऊ लागला. लोकांचा वाढता सहभाग पाहता १९८२ मध्ये त्यांनी संस्थेचा `पब्लिक ट्रस्ट’ तयार केला आणि योगसाधनेत रुची व ज्ञान असणाऱ्या योगशिक्षकांना योगप्रशिक्षणासाठी नियुक्त केले. १९९१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत त्यांच्या घराचे फार नुकसान झाले. घराच्या पुनर्विकासाचे काम सुरू असताना योगप्रचाराचे काम थांबू नये, म्हणून पुढल्याच वर्षी त्यांनी बी.के.मिल कंपाऊंड येथे जागा घेऊन ‘अंबिका योग कुटिर’ची इमारत बांधली.

nikam-guruji-yoga1व्यक्तिगत शिकवणीपासून सुरू केलेल्या योगवर्गाच्या ९० शाखा आता देशभरातच नाही, तर देशाबाहेरही जाऊन पोहोचल्या आहेत. २५०० प्रशिक्षक, प्रत्येक शाखेचे स्वतंत्र संचालक, खजिनदार व इतर पदाधिकारी तसेच लाखो साधक निकम गुरुजींनी उभारलेल्या कार्याचा डोलारा समर्थपणे सांभाळत आहेत. ह्या ९० शाखांमध्ये दर रविवारी दोन तास योगवर्गाचे आयोजन केले जाते. म्हणून २१ तारखेला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ असला, तरी समस्त ‘अंबिका योग कुटिर’ परिवार कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, दुबई, मॉरिशस येथील शाखांसह २५ तारखेला म्हणजे रविवारी योगदिवस साजरा करणार आहे.

संस्थेतर्फे योगप्रशिक्षणाचे तीन, सहा, नऊ, दोन वर्षे कालावधींचे अभ्यासक्रम आखले आहेत. तेदेखील विनामूल्य आहेत. योगप्रशिक्षक घडावेत यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम आहे. तो अभ्यासक्रम पूर्ण केलेली व्यक्ती `योगप्रशिक्षक’ म्हणून कुठेही योगप्रचार करू शकते, एवढी मान्यता ‘अंबिका योग कुटिर’ला आहे. धौती, नेती, कपालभाती, त्राटक, बस्ती, सूर्यनमस्कार, योगासने, ॐकार, गायत्री, यम-नियम इ. गोष्टींचा साधकांकडून सराव करून घेतला जातो. चांगले अभ्यासक घडावेत म्हणून लेखी माहिती पुरवून त्यावर आधारित परीक्षाही घेतली जाते.

कुटिरात येणाऱ्या साधकांपर्यंत योगसाधना मर्यादित राहू नये, म्हणून निकम गुरुजींच्या शिष्यांनी कुटिराबाहेर पडून समाजातील वेगवेगळ्या स्तरांवर जाऊन योगप्रचाराला सुरुवात केली. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, पोलीस, हवाई दलातील कर्मचारी, तसेच कॉर्पोरेट ऑफिसमधील लोकांसाठी `तणाव नियंत्रण योग शिबिरां’चे आयोजन करण्यात येऊ लागले. एवढेच नाही, तर मागील अनेक वर्षांपासून ह्या संस्थेतर्फे अलिबाग आणि ठाणे येथील तुरुंगातील कैद्यांनाही योग प्रशिक्षण दिले जात आहे, ज्यामुळे कैद्यांच्या वागणुकीत सकारात्मक बदल झाल्याची पावती संस्थेला मिळू लागली. ज्येष्ठ नागरिक, अल्झायमरचे रुग्ण, पाठीच्या मणक्यांचे आजार, उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा तसेच दुर्धर आजारांनी त्रस्त झालेल्या अनेक रुग्णांना योगविद्येचा लाभ होऊ लागला. योगासनांमुळे रोगप्रतिबंधच नाही, तर रोगनिवारणही होते, ह्याचा अनुभव अनेक साधकांनी घेतला. आज अनेक देशी-विदेशी संस्था योगसाधनेसाठी `अंबिका योग कुटिरशी’ संपर्कात आहेत.

२००५ पासून अंबिका योग कुटीरतर्फे `योगप्रसाद’ नावाचे त्रैमासिक चालवले जात आहे. ज्यात `योग’ विषयावर आधारित लेख आणि साधकांचे अनुभव दिले जातात. योगसाधनेशी संबंधित अनेक पुस्तके त्यांनी स्वत:च्या प्रकाशन संस्थेतून प्रकाशित केली. कुटिरतर्फे आजवर केलेल्या कामाचा गौरव म्हणून अनेक सामाजिक संस्थांनी त्यांना पुरस्कृत केले आहे. संपूर्ण जगभरातून त्यांच्या योगप्रचार कार्याला मान्यता मिळाली आहे.

nikam-guruji-yogaअंबिका कुटिरतर्फे काही वार्षिक उत्सवही साजरे केले जातात. गुढीपाडव्याला वर्धापन दिन असतो. तर, १८ जुलै रोजी गुरुजींच्या पुण्यतिथीनिमित्त `योगदिन’ आणि १५ ऑगस्ट रोजी गुरुजींचा जन्मदिन `स्वास्थ्य दिन’ मानला जातो. तसेच गुरुपौर्णिमा आणि नवरात्रीला विविध उपक्रमांचेही आयोजन केले जाते. अशा वार्षिक उत्सवाला जास्तीत जास्त साधक एकत्र येऊन सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात.

१९९२ मध्ये अंबिका कुटिरतर्फे पालघर येथील रोठेगाव, केळवे माहीम येथे ग्रामीण आणि आदिवासी जनतेसाठी योगवर्ग सुरू करण्यात आले. निकम गुरुजींना आयुर्वेदाचे चांगले ज्ञान असल्यामुळे १९९९ मध्ये वाशी येथील सीबीडी बेलापुर येथे सिडकोच्या मदतीने २ एकर जमिनीवर वनौषधी केंद्र सुरू केले. साधकांना आयुर्वेदाचा परिचय होऊ लागला आणि दैनंदिन जीवनात त्याचा उपयोगही होऊ लागला. आपल्या पारंपरिक ठेव्याचे जतन व्हावे म्हणून अहमदनगर येथील राजूर येथे `निसर्गोपचार केंद्र’ सुरू करण्याच्या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. त्यासाठी ठाण्याच्या अंबिका योग कुटिर शाखेचे अध्यक्ष अॅड. मनोहर देशमुख ह्यांनी स्वत:च्या मालकीची ८ एकर जागा संस्थेला दान केली आहे. लवकरच त्यावर कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती देशमुख ह्यांनी दिली.

nikam-guruji
योग मुद्रा करताना निकम गुरुजी

अंबिका योग कुटिर ही संस्था आजही विनामूल्य योगसेवा देत आहे. इथे प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी स्वयंप्रेरणेने संस्थेसाठी कार्यकर्ता, प्रशिक्षक, मदतनीस म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. अनेक दात्यांनी मुक्तहस्ताने संस्थेला निधी दिला आहे, त्यामुळे ह्या अमूल्य कार्याचा प्रचार-प्रसार करणे शक्य झाले आहे. गुरुजींनी लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. संस्थेच्या निर्मितीची मूळ प्रेरणा कायम ठेवून त्या दृष्टीने काम सुरू ठेवल्यामुळे हे कार्य अखंडितपणे सुरू आहे.

निकम गुरुजींनी आपल्या शिष्यांकडे नेहमी एकच गुरुदक्षिणा मागितली, ती म्हणजे, `तुम्हाला जसा योगसाधनेचा उपयोग झाला, तसा तो इतरांनाही होऊ देत. यासाठी कोणतेही शुल्क आकारू नका. तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, तर शारीरिक, मानसिक, आर्थिक स्वरूपाच्या अडचणी तुमच्या मार्गात येणार नाहीत. आपल्या परंपरेचा वारसा आपण जतन करा आणि पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करा.’

आपली प्रतिक्रिया द्या