अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ला; ६ लहान मुले ठार

17

सामना ऑनलाईन । गजनी

अफगाणिस्तानातील गजनी शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ६ लहान मुले ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबान दहशतवादी संघटनेने शुक्रवारी हा हल्ला केला. लहान मुले घराबाहेर खेळत असताना हा हल्ला झाला. अफगाणिस्तानातील हवाई सैन्यदलामार्फत हा हल्ला करण्यात आला असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

अफगाणिस्तानचे सरंक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद रदमानिश यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हा हल्ला तालिबान या दहशतवादी संघटनेने केला आहे. अफगाणिस्तानच्या जवानांनी हल्लेखोर दहशतवाद्यांना गोळीबारात ठार केले असून त्यांनी हल्लासाठी आणलेले रॉकेट जप्त करण्यात आले आहे, असाही दावा सरंक्षण मंत्रालयाने केला आहे’. दरम्यान अफगाणिस्तानाची राजधानी काबूल शहरातील सरंक्षण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘गजनी शहराजवळ झालेल्या आणखी एका हल्ल्यात ३ स्थानिक नागरीक ठार झाले असून या हल्ल्यात लहान मुलांचाही समावेश असण्याची शक्यता आहे’.

तालिबान या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची अद्याप जबाबदारी स्वीकारलेली नाही. संयुक्त राष्ट्रने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात जानेवारी ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या हल्ल्यात जवळपास २६४० ठार झाले असून ५३७९ लोक जखमी झाले आहेत. दरम्यान शस्त्रसंघर्षाद्वारे ६८९ लहान मुले ठार झाले असून १७९१ लोक गंभीर जखमी झाले असल्याचेही सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या