सतर्क जागरुक

873

>> वरद चव्हाण

अमृता पवार. आपल्या फिटनेसबाबत अत्यंत जागरुक. व्यायाम आणि आहार दोन्हींचा उत्तम ताळमेळ.

आज महाराष्ट्रावर जे गंभीर संकट आलंय त्या संकटाला सामोरे जाण्यासाठी अनेक हात मदतीसाठी पुढे येत आहेत. आपल्याच भावा-बहिणींच्या मदतीसाठी तुम्हीही एका क्षणाचासुद्धा विलंब न करता, तुम्हाला जितकं शक्य होईल तेवढी मदत कराल यात काही शंकाच नाही. कारण रक्ताचं नातं नसले तरी या महाराष्ट्राच्या मातीशी आपण नक्कीच जोडलेलो आहोत. लवकरात लवकर त्याचं जीवन सुरळीत होवो अशी देवाकडे प्रार्थना करतो आणि आजच्या लेखाला सुरुवात करतो तर आजची आपली फिट सेलिब्रिटी आहे अमृता पवार.

अमृताबरोबर मी ‘ललित 205’ या मालिकेत काम केलं. काम करताना एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली ती म्हणजेच अमृता कामाच्या बाबतीत जेवढी प्रामाणिक आहे तेवढी प्रामाणिक व्यायामाच्या बाबतीतदेखील आहे. म्हणजे व्यायामशाळेत जाऊन वजन उचलणं किंवा फक्त 10 मिनिटं ट्रेडमील करून व्यायामशाळेतल्या मोठ मोठय़ा आरशांसमोर स्वतःचे सेल्फी काढत बसणाऱया मुलींपैकी ती अजिबात नाही. पण व्यस्त शूट चालू असतानासुद्धा दोन सीनमध्ये गॅप असेल तर विथ मेकअप आणि शूटचे कॉस्च्युम घालून तासभर सेटवर वॉक करताना मी रोज पाहत असे. तर चालण्याबरोबरच तिला सूर्यनमस्कार करायचीसुद्धा खूप आवड आहे. कुठल्याही मालिकेमध्ये प्रमुख भूमिका करणे म्हणजे स्वतःचं खासगी आयुष्य विसरण्यासारखंच आहे अहो. व्यायाम तर सोडाच साधी पाच तासांची झोपसुद्धा दुर्मिळ होऊन जाते. अशावेळी शूटमध्ये संधी मिळाली की भले भले लोक जरा पाच मिनिटांची डुलकी काढतो असं म्हणत चांगले तासभर झोपतात, पण अमृता त्यातली नाही. आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करणं आणि ती संधी अजिबात गृहित न धरणाऱयांपैकी अमृता आहे. शाळेपासूनच अमृता स्पोर्टस्मध्ये खूप ऑक्टिव्ह होती. शाळेच्या खो-खोच्या टीममधली ती एक महत्त्वाची सदस्य त्यामुळे ज्या वाढत्या वयात आपण मैदानी खेळ खेळणं गरजेचं असतं ते अमृताच्या बाबतीत झालं.

आताच्या शाळेत जाणाऱ्या मुलांची तीच भीती वाटते मला. अहो, बघावं तेव्हा मोबाईल, लॅपटॉपवर बसलेली असतात. या मुलांचा जाडेपणाकडे कल जाऊन अंगात अतिरिक्त चरबीमुळे समोर जावं लागणाऱया समस्या यांना आता नाही तर वयाच्या चाळिशीत त्रास देऊ लागतील. हल्ली शहरांमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदानेच नाहीत म्हणा. असो, तर लहानपणी भरपूर खेळल्यामुळे अमृताचा मेटॅबोलिझम-रेट आपसूक चांगला झाला. नंतर कॉलेज आणि क्लास या धावपळीत अमृताचं या खेळांकडे जरा दुर्लक्ष झालं आणि त्याचा परिणाम म्हणजेच अमृताचं वजन वाढलं. पण इकडेच तुमचा चांगला मेटॅबोलिझम-रेट तुमच्या कामी येतो.

जेव्हा तुम्ही वजन कमी करायचं ठरवता तेव्हा तुम्ही आधी तुमच्या शरीराला लावलेल्या चांगल्या सवयी तुमच्या कामी येतात. अमृताचा मेटॅबोलिझम-रेट चांगला असल्याकारणाने तिला इतरांपेक्षा बारीक होण्यासाठी कमी वेळ लागला. अमृताने आजपर्यंत एकदाही व्यायामशाळेच्या दारात पाऊल ठेवलं नाही, ना कुठल्या डायटिशियनचा सल्ला घेतला. नियमितपणे जॉगिंग किमान 45 मिनिटस् रोज आणि सूर्यनमस्कार हा तिचा फिटनेस फंडा आहे. आहाराचं म्हणाल तर अमृताला गोड पदार्थ प्रचंड प्रिय आहेत. आठवडय़ातून एकदा तरी चीट डे असतो. या दिवशी ती तिला हवं ते खाण्याची सूट देते. पण दुसऱया दिवशी मात्र ती डब्बल मेहनत घेऊन स्वतःच्या कॅलरीज बर्न करते. मी मागच्याच लेखात लिहिल्याप्रमाणे नुसतं खाणं नव्हे व ते खाणं पचवण्याची क्षमता असायला हवी.

व्यायाम कधीही आणि कुठल्याही वयात करा त्याचा फायदा होतोच होतो.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या