वैवाहिक नात्यात समंजसपणा महत्त्वाचा

  • भक्ती चपळगावकर

अॅडव्होकेट मृणालिनी देशमुख यांना घरी कायद्याचा वारसा मिळाला, त्यांचा खरा रस घटनेसंबंधातल्या कायद्यांमध्ये, पण मुलांकडे लक्ष देता यावे म्हणून घराजवळच्या फॅमिली कोर्टात त्यांनी काम सुरू केले. घटस्फोटासारखा बाका प्रसंग ओढवल्यानंतर त्याला सामोरे जाताना त्यांनी त्यांच्या क्लायंटस्ना भरभक्कम पाठिंबा दिला. आदित्य चोप्रा, आमीर खान, हृतिक रोशन यांच्यासारख्या सिनेसृष्टीतल्या दिग्गजांचे घटस्फोटाचे खटले अॅडव्होकेट मृणालिनी देशमुख यांनी चालवले. आज हिंदुस्थानातल्या सगळ्या मोठ्या डिव्होर्स लॉयर्समध्ये त्यांचे नाव घेतले जाते.

सिनेमात किंवा एखाद्या कथेत शोभावेत असे नाट्यमय प्रसंग घटस्फोटासारख्या प्रसंगी घडतात. एकमेकांबद्दलचा विरोध पराकोटीला गेलेला असतो त्यावेळी तुमची भूमिका काय असते?

– truth is stranger than fiction अशी एक म्हण इंग्रजीत आहे. या म्हणीचा प्रत्यय माझ्या व्यवसायात मला रोज येतो. मानवी स्वभावाचे वेगवेगळे कंगोरे आहेत, अनेक भावभावना अशावेळी दाटून येतात. जवळपास ९० टक्के लोकांच्या भावना खूप नकारात्मक असतात. नातं तुटत असतं, घटस्फोटाची वेळ आलेली असते, कित्येक वेळा मानसिक, शारीरिक त्रास झालेला असतो. त्यामुळे स्वाभाविकरीत्या घटस्फोटाचा निर्णय घेणारी व्यक्ती मानसिकरीत्या कोलमडलेली असते. काही जोडपी अशीही असतात की घटस्फोट घेत असली तरी त्यांच्यातली मैत्री टिकून असते. त्यांना सौहार्दाचं नातं तोडायचं नसतं. अशा दोन्ही प्रकारचे लोक या प्रसंगी भेटतात. माझ्यासमोर बसून जेव्हा हे लोक त्यांची बाजू सांगतात, तेव्हा मला रोज नव्याने आयुष्याचे दर्शन घडते.

आपल्या समाजात घटस्फोटाला सामाजिक मान्यता सहजासहजी मिळत नाही, लग्न न टिकणं हे त्या व्यक्तीचं अपयश मानलं जातं.

– जेव्हा मी पंधरा-सोळा वर्षांपूर्वी प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळी एकटी मुलगी सल्ला घ्यायला यायची, तिच्याबरोबर तिची एखादी मैत्रीण असायची. पण आई-वडील नसायचे. याचं कारण म्हणजे तिला कितीही त्रास झाला तरी आईवडिलांचे म्हणणे असायचं की अॅडजस्ट कर. तोडण्याची भाषाच नको, आपण जोडलंच माहिजे. घटस्फोटाचं नावही घेतलं जायचं नाही. जेव्हा तिला तडजोड अशक्य वाटायची तेव्हा ती मुलगी मग एखाद्या मैत्रिणीला, बहिणीला घेऊन निदान आपल्यासमोर कोणते कायदेशीर पर्याय आहेत याचा शोध घेण्यासाठी यायची. आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आता मुलीबरोबर तिचे आईवडील पण येतात. त्या मुलीपेक्षा तेच हिरीरीने तिला घटस्फोट का आवश्यक आहे हे मला सांगू लागतात. असा बदल गेल्या काही वर्षांपासून दिसतोय. मुलगा काय किंवा मुलगी काय, घटस्फोटाच्या प्रसंगी त्यांचे आईवडीलही त्यांच्या बरोबर असतात. कुटुंबाकडून मिळणारा पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा लग्नसंबंध सुरळीत नसतात, काही गंभीर प्रश्न निर्माण झालेले असतात, त्यावेळी मुलीला सतत परत नवऱ्याच्या घरी जा असे म्हटल्याने परिस्थिती अजून गंभीर होऊ शकते.
असं असलं तरी मला सगळ्यात प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे people have lost the art of tolerance. नात्यांतला समंजसपणा फार झपाट्यानं कमी होतोय. तडजोडीच्या पायावरच नातं बांधलं जातं. जेव्हा वैवाहिक नात्यात एखादा कठीण प्रसंग निर्माण झाला तर सगळ्यात आधी विचार व्हायला हवा की खरंच परिस्थिती इतकी टोकाला का गेली आहे? असं म्हणतात की, नातं प्रेमावर आणि रोमान्सच्या बळावर घट्ट होतं, मी म्हणीन नातं ज्या दोन गोष्टींच्या बळावर घट्ट होतं त्या गोष्टी आहेत, परस्परांवरचा विश्वास आणि एकमेकांबद्दलचा आदर. लग्नाच्या नात्यात बांधलं गेलेलं असताना दुसऱयाच्या प्रेमात पडलात तर तो विश्वास संपतो. कित्येकदा बायको कुठे बाहेर जात असली की एवढा नट्टापट्टा करून कुठे निघाली आहेस, कुणासाठी एवढी तयार झाली आहेस, अशा प्रकारची विधानं करून तुम्ही बायकोचा अनादर करता. त्याचबरोबर नवऱ्यावर संशय घेऊन बायकाही नात्याची वीण सैल करतात. टाकून बोलणं, चारचौघात अपमान करणं अशा गोष्टींनी हे नातं अजूनच बिघडतं.

पण कधी कधी हे नातं परत जुळू शकतं का?

– मी तुला सांगत होते ना की आजकाल आई-वडील आपल्या मुलामुलीला पाठिंबा देत आहेत. कधी कधी मला त्यांना सांगावंसं वाटतं की तुम्ही थोडे शांत व्हा आणि तिला किंवा त्याला विचार करू द्या की खरंच घटस्फोटापर्यंत जाण्याची गरज आहे का? नवरा किंवा बायको त्यांना होणाऱ्या त्रासाचे वर्णन करत असतात तेव्हा मला याचा निश्चित अंदाज येतो की खरंच परिस्थिती इतक्या थराला पोहोचली आहे किंवा अजूनही यात सुधारणा होऊ शकते. जर मला असं वाटलं की ते over react करीत आहेत आणि परिस्थिती सुधारू शकते, तर मी त्यांना समुपदेशकाकडे किंवा काऊन्सिलरकडे जाण्याचा सल्ला देते. मी त्यांना सांगते. मी इथेच आहे, तुम्हीही इथेच आहात. तुम्ही काऊन्सिलरला भेटा. जर त्यांनी तुम्हाला सहा महिने एकमेकांबरोबर जुळवून घेण्याचा सल्ला दिला तर तुम्ही त्यासाठी प्रयत्न करा. जर तुमचं नातं पुन्हा नाही जुळलं आणि आता हे जुळू शकत नाही हे यानंतरही तुम्हाला वाटलं तर मग तुम्ही इथे या. घटस्फोटाची घाई करू नका. काहीजण मात्र ठरवून आलेले असतात, त्यामुळे ते मला म्हणतात की, तुमच्या सल्ल्याबद्दल आम्ही आभारी आहोत, पण आम्ही घटस्फोटाच्या निर्णयाबद्दल ठाम आहोत. अशावेळी मला त्यांचा निर्णय स्वीकारावा लागतो.

हिंदी सिनेसृष्टीतील अनेक नामवंतांच्या घटस्फोटाच्या केसेस तुम्ही चालवल्या आहेत. आता तुम्हीच एक सेलिब्रिटी वकील झाला आहात.

– तुला खरं सांगू का, हॉलीवूडमध्ये म्हण किंवा एकूण अमेरिकेतच म्हण, घटस्फोटाचे प्रमाण खूप आहे. तिथल्या सेलिब्रिटीजचे घटस्फोटाचे खटले चालवणारे काही वकील खूप प्रसिद्धीला आले. म्हणजे सेलिब्रिटीजचे वकील स्वतःच सेलिब्रिटी झाले. बॉलीवूडच्या अनेक डिव्होर्स केसेस मी चालवल्या आहेत आणि माझ्याकडे जे क्लायंटस् येतात त्यात सिनेसृष्टीतल्या जोडप्यांचे प्रमाण मोठे आहे, पण मी नहमीच सांगते, हो, मी सिनेसृष्टीतल्या अनेकजणांच्या केसेस चालवते. माझे क्लायंटस् सेलिब्रिटी आहेत, मी सेलिब्रिटी नाही.

bhaktic3@hotmail.com