नाशिककरांची नागपुरी आवड

326

>> शेफ विष्णू मनोहर

अभिनेत्री अनिता दाते. शाकाहारी असली तरी झणझणीत पदार्थ विशेष आवडीचे…

“माझ्या नवऱयाची बायको’’ या मालिकेमार्फत घराघरांत पोहचलेली अनिता जेव्हा माझ्या घरी जेवायला आली तेव्हा तिच्याशी बोलताना असं लक्षात आलं की, ती जशी मालिकेत आपल्याला दिसते, तसाच तिचा खरा स्वभाव आहे. ज्यावेळी तिला फुलोरातल्या या डेटबद्दल सांगितलं तर ती अतिशय खुश झाली, कारण तिला अस्सल नागपुरी खायचं होतं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मालिकेत तिचं माहेर नागपूरचं दाखवलं आहे, ती नागपुरी बाजातच बोलण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे अर्थातच मालिकेत नागपुरी पदार्थांची नावे भरपूर असतात. त्यातले काही पदार्थ तर तिला माहीतही नव्हते, म्हणूनच आपण मालिकेत ज्या पदार्थांचं वर्णन करत आलो ते नेमके कसे लागतात याची उत्सुकता तिला होती. म्हणनूच तिच्यासाठी खास नागपुरी पुरणपोळी, आलूबोंडा, तर्री, पोपट पोहे, पुडाची वडी, असा बेत ठेवला होता.

तर्री-पोहे खातांना तिने एक मजा सांगितली की मी जेव्हा पोपट-पोहे हा प्रकार मालिकेत बोलून दाखवला त्यावेळेस हजारो लोकांचे फोन आले की हा पदार्थ म्हणजे नेमका काय? मग तिला सांगितलं की पोपट म्हणजे वालाच्या दाण्यांचाच एक प्रकार आहे. त्याची शेंग पोपटी रंगाची असून आकारसुद्धा जवळपास पोपटासारखाच दिसतो. यावर मी तिला अजून एक गंमत सांगितली की जसं तुझ्या मालिकेत पोपट पोह्यांचं नाव आलं त्याच वेळी मी माझ्या युट्युब चॅनलवर पोपट पोह्यांची रेसीपी सांगितली आणि त्याला बरेच लाईक्स मिळाले, जवळपास 8-10 लाख लोकांनी तो व्हिडीओ बघितला. संपूर्ण जगात पोपट पोह्यांची चर्चा सुरु झाली आणि पोपट पोहे खऱया अर्थाने फुड मॅपवर आले.

अनिता मूळची नाशिकची, त्यामुळे तिला तिखट, झणझणीत आवडतं. पण तसा तिचा आहार साधाच आहे. डेलीसोप असल्यामुळे रोज शुटींगची धावपळ असल्यामुळे साधं शक्यतोवर घरचंच खाते. जेवणात सॅलड, स्प्राऊट्स यांचे प्रमाण जास्त असते. पण वेळ असेल तर व्यवस्थित साग्रसंगीत जेवायला आवडतं. कामानिमित्त नागपूर किंवा पुण्याला आली तर आवर्जुन विष्णूजी की रसोईला जेवायला जाते. विष्णूजी की रसोईत गेल्यावर तिने तेथील काही खास पदार्थांचा उल्लेख केला तो म्हणजे पुरण पोळी, पुडाची वडी त्याची कृती पुढे दिलेली आहे.

पोपट पोहे

popat-pohe

साहित्य – भिजवलेले जाड पोहे 2 वाटय़ा, पोपटीची दाणे 1 वाटी, मोहरी 1 चमचा, हिंग पाव चमचा, हळद पाव चमचा, बारीक चिरलेली मिरची 2 चमचे, चिरलेला कांदा 1 वाटी, मीठ 1 चमचा, एका लिंबाचा रस, साखर चवीनुसार, कोथिंबीर.
कृती – एका कढईमध्ये तेल फोडणीला घालून कांदा, हिरवी मिरची, हळद, तिखट घालून चांगले परतून घ्या. नंतर त्यात पोपटीचे दाणे टाकून झाकण ठेवून थोडे शिजवून घ्या. नंतर भिजवलेले पोहे घालून चवीनुसार मीठ, लिंबू, साखर घाला. थोडा पाण्याचा हबका मारा व एक वाफ येऊ द्या. नंतर गरम गरम खायला द्या.

पुडाची वडी

pudachi-wadi-new

साहित्य – उडदाची डाळ अर्धी वाटी, चणा डाळ अर्धी वाटी, सुके खोबरं अर्धी वाटी, कढीपत्ता, मीठ, तिखट, साखर चवीनुसार, आमचूर पावडर अर्धा चमचा, हिंग पाव चमचा, मैदा 1 वाटी, तांदळाची पिठी अर्धी वाटी, तेल 4 चमचे.
कृती – एका कढईत अर्धी वाटी उडदाची डाळ व अर्धी वाटी चणा डाळ तेलामध्ये परतून घ्या. त्याचबरोबर अर्धी वाटी सुके खोबरे, अर्धी वाटी कढीपत्ता परतून घ्या. सर्व मिश्रण एकत्र करुन मिक्सरमध्ये बारीक करा. त्यामध्ये चवीनुसार साखर, मीठ, तिखट, आमचूर, हिंग इत्यादी घाला. एक वाटी मैदा अर्धी वाटी तांदळाची पिठी चवीनुसार मीठ, थोडे तेल घालून त्याचा गोळा करा. त्याची पोळी लाटून त्यावर तयार पूड पसरवा. दुसरी पोळी लाटून त्यावर ठेवा. पुन्हा त्यावर पूड पसरवा. असे एकावर एक पाच थर करा. व हलक्या हाताने वरुन त्याला दाब द्या. नंतर चौकोनी तुकडे कापून मंद आचेवर तळून घ्या.

पुरण पोळी

puran-poli-2004

साहित्य – हरभरा डाळ 3 वाटय़ा, गूळ 2 वाटय़ा, साखर 1 वाटी, जायफळ पावडर अर्धा चमचा, वेलची पावडर अर्धा चमचा, मीठ चवीनुसार, कणीक 1 वाटी, मैदा 1 वाटी, साजूक तूप अर्धी वाटी, तेल 2 चमचे.
कृती – सर्वप्रथम एका भांडय़ात 4-5 वाटय़ा पाणी घालून हरभरा डाळ शिजवून घ्या. डाळ शिजत आल्यावर त्यात गूळ व साखर घालावा. गूळ आणि साखर मिसळल्यावर डाळ चांगली शिजली की ती गॅसवरुन खाली उतरुन घ्या. नंतर पुरणाच्या साच्यातून तिला बारीक करुन घ्या. त्यात थोडी जायफळ पावडर व वेलची पुडसुद्धा घाला.
कणीक, मैदा, थोडं मीठ मिसळून 2 चमचे तेल मिसळून चांगले भिजवून मळून घ्यावे. त्यानंतर एका गोळ्याची पोळी लाटून त्यावर तयार केलेले पुरण पसरवा. चारही बाजूंनी पोळी गुंडाळून बंद करा व थोडी लाटून घ्या. तव्यावर तुप सोडून खरपूस भाजून साजूक तुपाबरोबर सर्व्ह करा.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या