बी पॉझिटिव्ह – माणसांची श्रीमंती

जगातला मी सर्वात श्रीमंत माणूस आहे, ज्याच्याकडे आपुलकीच्या, जिव्हाळय़ाच्या अगणित माणसांची श्रीमंती आहे. सांगतोय शिव ठाकरे…

तेव्हा मी ‘रोडिज’ शो करायचो… 2017 च्या सुमाराची गोष्ट. तेव्हा एकदा प्रवास करताना रणविजय सिंघा म्हणाले, ‘‘तुझे किती फॉलोवर्स आहेत इन्स्टावरती?’’ तेव्हा माझे केवळ साडेतीनशे फॉलोवर्स होते. ते म्हणाले, ‘‘हे बघ स्वतःच्या ध्येयावरती लक्ष पेंद्रित कर. पह्कस रहा आणि या 350 वरती अजून किती शून्य वाढवायचे हे आताच ठरव. तुझे ध्येय तुला स्वतःला ठरवायचे आहे. मेहनतीने पैसे कमव. बचत कर. जमिनीत गुंतवणूक कर.’’ हे आणि असे अनेक आपुलकीचे सल्ले ते देत राहिले. त्यातले बरेचसे मी आज अमलात आणलेत आणि आणत राहीन.

अमरावतीतील इंजिनीअरिंगमधले माझे मित्र…त्यांच्याविषयी काय बोलू? बोलेन तितके कमीच आहे. काही निवडक नावे घेतोय खरे, पण बरीच नावे घ्यायची राहतील. माझा मित्र गौरव मला सातत्याने निरनिराळय़ा चित्रपटाच्या लिंक पाठवत असतो. तो म्हणतो की, ‘‘बघ हा चित्रपट. खूप काही शिकण्यासारखे आहे.’’ मग मीसुद्धा बारकाईने ते चित्रपट पाहून स्वतःमध्ये अधिकाधिक सकारात्मक बदल घडवत राहतो. प्रीतेश आणि संग्राम ही टेक्निकलमधील बापमाणसे आहेत. मला बऱयाच टेक्निकल गोष्टी ते साध्या, सोप्या करून समजावत असतात. शिकवत असतात. सनी, कलश, सागर आणि नीरव… शिव्या देत देत मला उपदेशाचे डोस अगदी अजीर्ण होईपर्यंत सतत पाजत राहणे हा चौघांचा जन्मसिद्ध हक्क आहे. सातत्याने ते मला माझ्यातले गुण-दोष सांगत असतात, पण सुरुवात मात्र शिव्यांनीच होते. मलाही कधी त्यांचा राग येत नाही. त्यांनी सांगितलेल्या बऱयाच गोष्टी मी अमलात आणतो आणि माझ्यामध्ये आवश्यक ते बदल घडवतो.

कपिल माझा दुबईतला मित्र. त्याची संपूर्ण फॅमिली माझ्याविषयी काय काय अपडेटस आहेत मीडियामध्ये याविषयी सांगत असते. आपली प्रगती इतकी कोणी काळजीपूर्वक बघत आहे हे बघून मन भरून येते. मुंबईला आलो की, राज व क्षितिज जणू माझा डावा आणि उजवा हात असल्यासारखे माझ्यासोबत असतात. एका पह्न सरशी मी असेल तिकडे लोकल, बस, पब्लिक ट्रान्सपोर्ट जे मिळेल ते पकडून हजर होतात. सांगेल ते काम करतात, मदत करतात. असे आपल्या लोकांसाठी कधीही उपलब्ध राहणे किती महत्त्वाचे आहे, हे मला समजले आहे.

समीर हा अमरावतीचा माझा मित्र. वयाने मोठा असलेला, पण मला अगदी लहान भावासारखा सांभाळणारा. एकत्र जिम करायचो आम्ही. तेव्हा तो मला फिटनेसविषयी सल्ले द्यायचा. अमरावतीला गेल्यावरती माझ्यासोबत सावलीसारखा असतो तो समीर शहा. अगदी एअरपोर्टला उतरल्यापासून घरापर्यंत आणि जिथे जिथे मी जाईन तिथे तिथे स्वतःची गाडी आणि तो स्वतः माझ्यासोबत असतात. काय हवे नको ते सातत्याने बघत असतो.

गिनीज बुक, लिम्का बुक रेकॉर्ड किंवा आणखीन कुठले वर्ल्ड रेकॉर्ड असू दे मी हे आज अत्यंत अभिमानाने आणि आनंदाने सांगू शकतो की, जगातला मी सर्वात श्रीमंत माणूस आहे, ज्याच्याकडे आपुलकीच्या, जिव्हाळय़ाच्या अगणित माणसांची श्रीमंती आहे.

ओंजळ भरलेली…

आयुष्यात आलेल्या या आणि अशा अनेक सकारात्मक व्यक्तींकडून पुष्कळ गोष्टी माझ्याही नकळत आत्मसात केल्या. माझ्याने होईल तितकी मी मदत प्रामाणिकपणे समोरच्या गरजू व्यक्तीला करत असतो. त्यांचे प्रोफाइल्स पाठवणे. त्यांच्यासाठी शब्द टाकणे आणि अन्य स्वरूपाची मदत करणे हे सारे सारे मी मनापासून करतो. आपण सातत्याने देत राहिलो गरजूंना तरी आपली ओंजळ कधीही रीती होत नाही, किंबहुना ओथंबून वाहतच राहते.

(शब्दांकन – निनाद पाटील)