वारसा दिग्दर्शनाचा!

215

>> मिलिंद शिंदे

संगीत कुलकर्णी… चित्रपट, दिग्दर्शन या गोष्टी अक्षरशः वारसाहक्काने मिळाल्या आणि संगीत दादाने त्याचं सोनं केलं.

झाड… मी म्हणालो
नाही, आणखी मोठं झाड आहे…. संगीतदादा मला म्हणाला.
मी पुन्हा ‘झाड’ म्हणालो.
नाही… आणखी मोठं झाड आहे – संगीतदादा.
मग मी झाड म्हणायचं आणि संगीतदादानं ते आणखी मोठं आहे असं म्हणायचं, असं तीन-चार मिनिटं चाललं आणि शेवटी संगीतदादाला हवं असलेलं मोठ्ठं झाड त्यानं माझ्याकडून वदवून घेतलं आणि आता आपण टेक करू म्हणून संगीतदादा मॉनिटरवर जाऊन बसला.
पाच ते सात मिनिटांचा हा वन सीन वन शॉट होता. मी आणि जयवंत वाडकर… वाडकर तसा जुना, अनुभवी. मी नवखा अगदीच. आणि त्यात वन सीन वन शॉट. मी थोडा साशंक होतो माझ्याबद्दल, पण संगीतदादाला विश्वास होता… आणि तो वन सीन वन शॉट संगीतदादाला हवा तसा झाला.
मालिकेचं नाव ‘थरार’ ज्यांनी टेलिव्हीजनच्या इतिहासात एक महत्त्वाचं नाव केले आणि दिग्दर्शक अर्थातच संगीत कुलकर्णी. या मालिकेत तीन सीनसाठी मला संगीतदादानं बोलवलं होतं, पण त्या तीन सीनमुळे जो बंध जुळला तो कायमचाच. त्याची वीण आजतागायत घट्ट आहे.
पहिल्या मालिकेच्या वेळी ते माझ्यासाठी फक्त दिग्दर्शक संगीत कुलकर्णी होते. मधल्या काळात नाते थोडे सैलावलं आणि आम्ही बोलू लागलो ‘तुझ्याविना’ मालिकेसाठी जेव्हा मला संगीतदादानं फोन केला तेंव्हा मी फलटणला शूटिंग करत होतो. नवी मालिका आहे. आणि तू त्यात प्रमुख खलनायकाची भूमिका करतोयस… मी उत्साहित झालो, पण मी अगदी उद्याच भेटायला येऊ शकत नाही मी म्हणालो, ‘मी परत आल्यावर भेटलो तर चालेल का?’ त्यावर संगीतदादाचं उत्तर मला फार दिलासा देऊन गेले. कारण त्या काळात तुरळकच कामे मिळायची. फार काँक्रीट असं काही घडत नव्हतं म्हणून रोल हातचा जाऊ नये म्हणून मी म्हणालो परत आल्यावर भेटलं तर चालेल का? ते उत्तर होतं ‘तू कधीही ये हा रोल तूच करणारयेस.’ संगीतदादाच्या आरेखनामुळे ती मालिका प्रचंड गाजली. मला त्याचा खूप फायदा झाला. त्यावर्षी मला सर्वोत्कृष्ट खलनायकाचे नामांकन मिळाले… अर्थात श्रेय संगीतदादाचं. माझे काही जवळचे मित्र म्हणतात संगीत कुलकर्णी म्हणजे तुला खलनायक करणारा माणूस… होय… संगीतदादानेच मला पहिल्यांदा मेजर खलनायक म्हणून लाँच केलं असं म्हणूया. ‘‘मला खलनायक करणारा माणूस’’…
तू मला संगीत म्हण. एकदा मी संगीतदादाला विचारलं मी तुम्हाला काय म्हणू? त्यावरचं संगीतदादाचं हे उत्तर…
संगीतदादा फार बोलत नाही. पण शूटिंगच्या वेळी ‘सायलेंस’पासून ‘कट’ म्हणेपर्यंत या दोन शब्दांच्या दरम्यान फक्त संगीतदादा बोलत असतो. त्याच्यातला दिग्दर्शक व्यक्त होत असतो. इतकं प्रेसीशन आहे त्याच्या वागण्यात केले. ‘चॅम्पियन’ हा वीणा लोकूर यांनी निर्मिती केलेला अतिशय अप्रतिम सिनेमा…आणि ‘क्षणोक्षणी’ हा दुसरा सिनेमा… दोन्ही अप्रतिम चित्रपट… ‘क्षणोक्षणी’ या चित्रपटानं पडदा पाहिला नाही याची खंत संगीतदाच्या बोलण्यातही होती आणि डोळय़ातही. आपण दिग्दर्शित केलेली कलाकृती चित्रपटगृहापर्यंत पोहोचू शकत नाही ही भावना कुठल्याही दिग्दर्शकाला हेलावून सोडणारी आहे.

एकाहून एक सरस मालिका, चित्रपट देणारा संगीतदादा कशाचंच श्रेय स्वतःकडे घेत नाही. आणि हे श्रेय नाकारताना तो उगाच ‘पोज’ही घेत नाही. आपल्या सगळय़ा कलाकृतीच्या यशाचं श्रेय तो आपले ज्येष्ठ बंधू सागर कुलकर्णी जे ज्योतीसागर नावानं लेखन करतात. संगीतदादाच्या जवळपास सगळय़ा मालिकांचे लेखन सागर कुलकर्णी यांनी केले आहे. संगीतदादा आपल्या मोठय़ा बंधूबद्दल इतकं बोलतात त्यातून त्यांच्या ठायी असलेला आपल्या भावाविषयीचा आदर पदोपदी जाणवतो. अगदी लहानपणापासूनच नाटकं बसवण्यापासून ते आज संगीतदादाच्या मालिकांचे लेखनापर्यंत सागर कुलकर्णी संगीतदा सोबत भक्कम उभे राहिले, समर्थ साथ दिली. मला अगदी बोट धरून माझ्या भावानं या क्षेत्रात आणलं ही त्यांची प्रतिक्रिया खूप बोलकी आहे.

चित्रपटसृष्टी वगळता बऱयाच मंडळींना हे माहिती नसेल की संगीतदा म्हणजे ज्येष्ठ दिग्दर्शक दत्ता केशव यांचे चिरंजीव. वडील आणि बंधूच्या तालमीत मी तयार झालो असे संगीतदादा मनापासून कबूल करतात. त्यांचे माध्यमभान आणखी जागृत करणाऱया गिरीश घाणेकर यांच्याविषयी ते अतिशय कृतज्ञतेने बोलतात. आणि त्यांच्याकडून ते अनेक गोष्टी शिकले. त्याचा त्यांना खूप फायदा झाला हे अगदी संगीतदा नम्रपणे सांगतो.

मी हिंदीत नाही रमत फार.
हे वाक्य बोलल्यावर संगीतदादा क्षणभर थांबला आणि मग पुन्हा बोलायला लागला. थोडे सफोकेट होतं… दिग्दर्शकाचे फार नियंत्रण राहात नाही, सृजनाला फार काम नाही, निर्णयप्रक्रियेत फार बोलता येत नाही. हे असं असं आहे हे चित्रीत करून द्या. हे काही मला मानवत नाही म्हणून मी रमत नाही फार तिकडं… हे सांगताना मराठी कलावंतांचे उजवेपण अधोरेखित करायलाही तो विसरत नाही.मी स्वतःलाच स्वतः दिग्दर्शक म्हणून लाँच केलं असं संगीतदा म्हणाला आणि मग खळाळून हसला. ते हसणं निखळ होतं. एकदम पारदर्शक होतं.संगीतदाच्या बऱयाच कलाकृती या त्यांनी स्थापित केलेल्य‘रूची फिल्मस्’ या बॅनरखाली निर्मित झाल्या.

रूची फिल्मस् हे नाव का ठेवलं?
असं विचारल्यावर संगीतदा थोडा शांत झाला आणि बरंच काही सांगायचं आहे, व्यक्त व्हायचं आहे असं मला वाटलं आणि संगीत हा बोलायला लागला. रूची म्हणजे संगीतदाची पत्नी… 1989 साली सवाई अभिनेत्रीचे पारितोषिक मिळविणारी अभिनेत्री… ‘‘माझ्या अगदी सुरुवातीच्या काळात आमची मैत्री झाली… मी तिला या क्षेत्रातल्या सगळय़ा शक्यता, अशक्यतांची जाणीव करून दिली.’’

रूची यांनी समर्थपणे भूमिका घेत… तू तुझ्या आवडीचे काम कर असे सांगितले. आणि स्वतः नोकरी (10 ते 12 वर्षं) नोकरी करून संगीतदादाला साथ दिली. रूचीच्या त्यागाबद्दल, सहकार्याबद्दल समंजसपणाबद्दल बोलताना संगीतदा खूप हळवा होतो… त्यातून रूचीचं त्याच्या आयुष्यातलं स्थान किती अपरिहार्य हेच जाणवतं.

मी संगीतदाच्या माहितीसाठी गुगलला सर्च केलं, पण मग मीच लॉगआऊट झालो. कारण संगीतदा या माहितीप्रचुर माध्यमांच्या पलीकडचा माणूस आहे. त्याचं माणूस असणं, त्याचं माणूसपण उकलणं हे गुगलला नाही ना जमणार… त्यासाठी संगीतदादालाच भेटायला हवं…

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या