माझी ‘बकेट लिस्ट’पूर्ण झाली – तेजस देओस्कर

121

>> मंगेश दराडे

माधुरी दीक्षित ‘बकेट लिस्ट’ मधून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतेय. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा तेजस देओस्कर या तरुण दिग्दर्शकाने पार पाडली आहे. माधुरीसारख्या मोठ्या स्टारसोबत काम करण्याचे दडपण होतेच, पण त्याहीपेक्षा जबाबदारी अधिक वाटत होती. माधुरी दीक्षित यांना घेऊन मराठी सिनेमा करण्याच माझं स्कप्न पूर्ण झाल्याचे तेजस सांगतो.

बकेट लिस्टचा ट्रेलर सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतोय. बकेट लिस्ट म्हणजे एखाद्याच्या आयुष्यात अपूर्ण राहिलेल्या इच्छांची यादी. ही यादी आपण बनवतो आणि त्या पूर्ण करण्याचा दृष्टीने प्रयत्न करतो. ही लिस्ट पूर्ण करण्यासाठी आपण जी धडपड करतो ते म्हणजे आयुष्य जगणं. याच आशयावर हा सिनेमा बेतला आहे.

धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. याबाबत तेजस म्हणाला, कथानक लिहितानाच ‘मधुरा साने’ या मुख्य भूमिकेसाठी माझ्या डोक्यात पहिले नाव माधुरी दीक्षित यांचे होते. आम्ही त्यांची भेट घेऊन कथानक ऐकवले. कथानक आवडल्यानंतर दोन दिवसांनी त्यांना पूर्ण स्क्रिप्ट ऐकवली. तेव्हा १० मिनिटं त्या स्तब्ध झाल्या. होकार देण्यासाठी त्यांनी काही दिवसांचा वेळ मागितला. पण पुढच्या दहा मिनिटांतच त्यांनी आम्हाला होकार कळवला.

माधुरी दीक्षित यांच्या सहभागामुळे या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या जास्त अपेक्षा आहेत. त्याचं दडपण येतं का ? याबाबत तेजस म्हणाला, दडपणापेक्षा माझं काम यानिमित्ताने अधिक चांगल्या प्रकारे सगळ्यांपुढे आणायची माझ्यावर जबाबदारी जास्त होती. दुसरी गोष्ट म्हणजे बॉलीवूडची इतकी मोठी स्टार मराठीत पदार्पण करतेय. त्यामुळे सिनेमाची प्रोडक्शन व्हॅल्यू कमी आहे असे त्यांना कुठेही वाटायला नको म्हणून त्यासाठी निर्मात्यांपासून तंत्रज्ञांपर्यंत सगळ्यांनी खूप मेहनत घेतली. या सिनेमात माधुरी दीक्षित ही मधुरा साने नावाच्या महिलेची भूमिका साकारणार आहे. मधुराच्या आयुष्यातले वेगवेगळे टप्पे यात पाहायला मिळणार आहेत. सर्वसामान्य गृहिणी ते सुपरबाईक चालकणारी मधुरा अशा वेगवेगळ्या रूपात माधुरी दिसणार आहे. सुपरबाईक चालकण्यासाठी माधुरी यांनी खूप मेहनत घेतल्याचे तेजसने सांगितले.

करण जोहर, रणबीर कपूर ही नावे ‘बकेट लिस्ट’शी जोडली गेली. त्याप्रमाणे पुढच्या सिनेमांतही प्रेक्षकांना सरप्राईज मिळेल, हे सांगायलाही तो विसरला नाही. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी सिनेमाला कौतुकाची थाप मिळतेय. पण त्याचबरोबर प्रेक्षकांचे प्रेम मिळणेही महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या