मराठी तरुणांनी मोठी स्वप्ने बघावीत…

803
–  राजेश पोवळे

‘रामायणा’त एक गोष्ट आहे. लंकेत सीतेच्या शोधाला जाण्याआधी हनुमानाला स्वतःच्या शक्तीची ओळखच नव्हती. ही कामगिरी आपल्याला जमेल की नाही याबाबत तो साशंक होता. अखेर जांबुवंताने त्याला त्याच्या सुप्त सामर्थ्याची जाणीव करून दिली आणि त्याच्यातील साहस, आत्मविश्वास जागवला. मराठी तरुणांबाबत आज हीच स्थिती आहे. त्यांनी स्वतःची अंगभूत वैशिष्ट्ये आणि महाराष्ट्र भूमीचे महत्त्व ओळखले पाहिजे. एका छोट्याशा दुकानापासून बहुराष्ट्रीय विस्तार असलेला उद्योगसमूह घडवणारे मसाला किंग धनंजय दातार सांगताहेत मराठी तरुणांना समृद्धीचा मंत्र…

मराठी तरुण उद्योजकतेपासून दूर का राहतो?

  • सर्वच मराठी तरुण उद्योजकतेपासून दूर नाहीत. त्यातल्या त्यात मध्यमवर्गीय आणि सुशिक्षित लोक उद्योजकतेपासून दूर राहतात असे मला जाणवते. शिकून चांगल्या पगाराची नोकरी पकडली की, आयुष्याची चिंता मिटते हा समज आजही प्रबळ आहे. महिन्याला ठरावीक तारखेला मिळणाऱ्या पगाराचे आकर्षण त्यामागे असते. व्यवसाय म्हणजे जोखीम आणि आर्थिक चढ-उतार या अनिश्चिततेला लोक घाबरतात. म्हणून ते नोकरीचा समोर असलेला सोपा मार्ग शोधतात. मीसुद्धा याला अपवाद नव्हतो. आमच्या घराण्यात सगळे नोकरदार आणि धंद्याशी त्यांचा कधीच संबंध आला नाही. माझे वडील दुबईला नोकरीसाठी गेले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मीसुद्धा तिकडे नोकरीला जाण्याचे स्वप्न बघत होतो. गंमत म्हणजे ते स्वप्नही पोरकट विचारांवर आधारित होते. मुंबईतून आखाती देशांत जाणारे लोक दोन वर्षांनी परत येत तेव्हा त्यांच्या गळ्यात सोन्याची साखळी, हातात परदेशी कंपन्यांची घड्याळे, ट्रान्झिस्टर दिसत. ते बघून मला दुबई हा स्वर्ग वाटू लागला. झटपट श्रीमंत होण्याच्या आकर्षणापायी मी दुबईला नोकरीसाठी जायचा हट्ट धरून बसलो होतो.

मराठी समाजाची मानसिकता उद्योजकतेला अनुकूल आहे का?

  • होय, नक्कीच. मात्र त्यासाठी आपल्याला मनातील गैरसमजाची जळमटे झटकावी लागतील. राजकारण, समाजसेवा, लष्कर, विद्वत्ता, शेती, कला, विज्ञान, क्रीडा, कला, साहित्य आदी सर्व क्षेत्रांत मराठी समाजाने दिग्गज व्यक्तिमत्त्वे घडवली आहेत. उद्योगाचे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. फार थोड्या लोकांना ठाऊक असेल की, पेशवाईच्या काळात महाराष्ट्रातील पहिला कारखाना एका मराठी माणसानेच सुरू केला होता आणि गुजरातमध्येही बडोदा संस्थान असताना जे पहिले दोन-तीन कारखाने सुरू झाले त्यापैकी एक कौले बनवण्याचा मोर्वीतील कारखाना एका मराठी माणसाचाच होता. इतकी गौरवशाली परंपरा असताना उद्योगाचे क्षेत्र आपल्यासाठी नाही हा न्यूनगंड प्रथम टाकून द्यायला हवा. मराठी तरुणांनी बिनधास्त धंद्यात उतरावे.

…पण उद्योगासाठी काही कौशल्ये किंवा गुण गरजेचे असतात ना

  • हाही एक गैरसमज आहे. उद्योग सुरू करण्यासाठी केवळ निर्धार पुरेसा असतो. ‘शेंडी तुटो किंवा पारंबी’ असा चेव अंगात असावा लागतो. गंमत म्हणजे एकदा तुम्ही व्यवसाय सुरू केलात की, तोच तुम्हाला शिक्षक बनून शिकवतो. तुमच्या अंगात नवे गुण आणि कौशल्ये येऊ लागतात. मी त्याचा पडताळा घेतला आहे. माझ्याकडे उद्योगासाठी आवश्यक कोणतेही कौशल्य नव्हते. शिरखेड या खेडेगावातून मुंबईत शाळेसाठी आलो तेव्हा माझ्या खेडवळ बोलीला सगळे हसायचे. शाळेत मी मुखदुर्बळ होतो आणि चाचरत बोलायचो. सर्व विषयांत काठावर पास व्हायचो. गणिताची तर इतकी भीती होती की, दहावीला पाचवेळा गणितात नापास झालो होतो. दुबईला वडिलांना दुकानात मदत करायला गेलो तेव्हा मला इंग्रजी आणि अरबी या भाषा येत नव्हत्या. केवळ हिंदी आणि मराठी बोलायचो, पण माझ्यातील सगळ्या त्रुटी व्यवसायाने दूर केल्या. मी आज आत्मविश्वासाने चारही भाषा बोलतो, जाहीर व्याख्याने देतो, कोट्यवधींचे व्यवहार करतो. या व्यवसाय क्षेत्रानेच एकेकाळी दुकानात झाडू-पोछा करणाऱ्या मला ‘दुबईचा मसाला किंग’ म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली.

मराठी तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल?

  • ‘हजारो मैलांचा प्रवास घडू शकतो, गरज फक्त एक पाऊल पुढे टाकण्याची असते’ अशी म्हण आहे. मराठी तरुणांमध्ये निर्धार, हिंमत, सहनशीलता आहेच. त्याच जोरावर त्यांनी व्यवसायात उतरावे, भांडवलाची काळजी करू नये. आजच्या काळात सरकारसह अनेक संस्था नवउद्योजकांच्या पाठीशी भक्कम उभ्या राहतात. तरुणांनी कष्टाने उद्योग वाढवावा आणि नफ्यासाठीच करावा. अल्पसंतुष्ट न राहता मोठी स्वप्ने बघावीत. फक्त दोन गोष्टींचे भान बाळगावे. धंदा करताना ‘डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर’ ठेवावी (संताप, भांडण आणि द्वेष टाळावा) आणि प्रामाणिकपणा कधीही सोडू नये. हिंदुस्थान आणि महाराष्ट्र या बाजारपेठांची ताकद खूप मोठी आहे. देशाची सवाशे कोटी लोकसंख्येची बाजारपेठ परदेशांना भुरळ घालते, तर आपण का नको त्याचा फायदा घ्यायला? महाराष्ट्राची ताकदही समजून घ्या. येथे रस्ते, रेल्वे यांचे उत्तम जाळे उभारले गेले आहे. दर ५० किलोमीटरच्या अंतरात एखादे तरी छोटे-मोठे गाव किंवा शहर आहे. जगातील पहिल्या १५ मोठ्या भाषांपैकी असलेली मराठी बोलणारी ११ कोटी लोकसंख्या आहे. नयनरम्य पर्यटनस्थळे, औद्योगिक विस्तार, मुबलक पाणी, सुपीक शेती, पायाभूत सुविधांचा विकास, काय म्हणून नाही? देवाने आपल्याला भरभरून दिले आहे. त्याचा फायदा उठवा. आपण हातातील संधी सोडली आणि ती दुसऱ्या कुणी साधली तर मागाहून तक्रार करण्यात अर्थ नसतो.

‘MBX’ या मराठी बिझनेस एक्स्चेंज परिषदेचं यंदाचं दुसरं वर्ष आहे. ९ आणि १० नोव्हेंबरला ही परिषद होईल. दिनांक ९ नोव्हेंबर २०१७ या दिवशी ठाणे येथील टिपटॉप प्लाझामध्ये ‘MBX’ मराठी बिझनेस एक्स्चेंज २०१७ चं उद्घाटन दुबईतील मसाला किंग डॉ. धनंजय दातार यांच्या हस्ते होणार आहे. होतकरू मराठी उद्योजकांना व्यावसायिक ज्ञान, आपला उद्योग कसा वाढवावा, व्यवसायातील संधी तसंच आर्थिक भरभराटीसाठी उद्योग क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन या परिषदेत मिळणार आहे. डॉ. धनंजय दातार याचं अमूल्य मार्गदर्शन मिळवण्याच्या या संधीचा उद्योजकांनी नक्कीच लाभ घ्यावा.

आपली प्रतिक्रिया द्या