कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरताना…!

>> मनोज मोघे

कोरोनाच्या दुसऱया लाटेत अगदी दररोज रुग्णसंख्येचा 60 हजारांचा उच्चांक गाठल्यानंतर ही रुग्णसंख्या राज्यात दिवसाला 10 ते 15 हजार रुग्ण सापडण्यापर्यंत खाली आहे. यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणेला मोठय़ा प्रमाणात उपाययोजना कराव्या लागल्या. कोरोनाच्या दुसऱया लाटेतून आता सावरत असतानाच तिसऱया लाटेसाठीही आपण सज्ज होत आहोत. याबाबत राज्याच्या टास्क पर्ह्सचे सदस्य तसेच फोर्टीस रुग्णालयाच्या क्रिटिकल केअर विभागाचे संचालक डॉ. राहुल पंडित यांच्याशी साधलेला संवाद.

 कोरोनाच्या दुसऱया लाटेतून सावरत असतानाच तिसऱया लाटेसाठीही आपण तयारी करतोय. नेमकी ही तयारी आपण कशाप्रकारे करीत आहोत?

– तिसऱया लाटेला सामोरे जात असताना आपण नेमके कोणत्या वयातील वर्गाला याचा अधिक संसर्ग होणार याचा अंदाज बांधत आहोत. जसे पहिल्या लाटेत 60 ते 80 वर्षांवरील वयोगटाला अधिक संसर्ग झाला. त्यानंतर दुसऱया लाटेत 25 ते 50 वयोगटातील व्यक्तींना संसर्ग झाला. त्याप्रमाणेच आता तिसऱया लाटेत 10 ते 20 वयोगटातील मुलांना याचा संसर्ग अधिक होऊ शकतो, असे अंदाज बांधले जात आहेत. त्यामुळे उद्या लहान मुलांवर जर या लाटेचा परिणाम झालाच तर आपली तयारी कुठेही कमी पडू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या लहान मुलांसाठी टास्क पर्ह्स स्थापन केला. रुग्णांसाठी बेडची व्यवस्था, पेडिऑट्रिक आयसीयू यासारख्या सोयी उभ्या करून आधीच तयारी केली आहे. दुसरी लाट ओसरतेय, मृत्यूदरही 3 टक्क्यांपेक्षा खाली आहे. आणि मुंबईसारख्या शहरातही आज आपण दररोज 25 हजारांवर टेस्टिंग करीत आहोत. पहिली लाट जेव्हा उच्चांकावर होती तेव्हा आपण 25 ते 26 हजार रोज टेस्टिंग करीत होतो. त्यामुळे आज दुसरी लाट ओसरत असली तरी आपण टेस्टिंग कमी होऊ दिलेले नाही. जिनोम टेस्टिंग लॅब आता पुण्याबरोबर मुंबईतही सुरू करण्यात आली आहे. यामुळेच आपल्याला तिसऱया लाटेचाही अंदाज येणार आहे.

 हळूहळू लॉकडाऊन उठवला जातोय, पण यामुळे पुन्हा संसर्ग वाढणार नाही का?

– लॉकडाऊन उठवल्याने संसर्ग वाढण्याचा धोका आहे, म्हणूनच आपण हळूहळू सुनियोजित पद्धतीने अनलॉक करीत आहोत. अनलॉक करताना रुग्ण दुपटीचा कालावधी, मृत्यूदर, ऑक्सिजन बेडची संख्या, आयसीयू बेडची संख्या या सर्वच बाबी लक्षात घेऊन आपण अनलॉक करीत आहोत. वैद्यकीयदृष्टय़ा आपण सक्षम आहोत का हे पाहूनच आपण पावले उचलत आहोत. टेस्टिंगच्या प्रमाणातही आपण वाढ केलेली आहे. त्यामुळे कोणत्या विभागात आपल्याला जास्त रुग्ण आढळू लागले आहेत हे तत्काळ आपल्याला करणार आहे. यामुळे अशा जागी तत्काळ उपाययोजना करून तिथेच कोरोना संसर्ग रोखण्यावर आपले प्राधान्य आहे. हा संसर्ग रोखताना नागरिकांनीही आपली जबाबदारी समजून घ्यायला हवी. गर्दीत जाणे टाळणे, डबल मास्किंग, स्वच्छता या गोष्टी आपल्याला पाळाव्याच लागणार आहेत.

 म्युकरमायकोसिससारखी नवीन संकटे समोर आहेत. त्याचबरोबर औषधांच्या उपलब्धतेचा प्रश्न आहे. त्यावर कसा तोडगा काढणार आहोत?

– म्युकरमायकोसिसचे प्रमाण मधल्या काळात वाढले असले तरी आता ते प्रमाण कमी होत आहे. आठवडय़ात तीन ते चार केसेस सापडत आहेत. पण ज्यावेळी म्युकरमायकोसिसचे प्रमाण वाढले. त्यावेळी अनपेक्षितपणे हे घडले असल्याने औषध आपल्याला माहीत असले तरी तेवढय़ा प्रमाणात ते उपलब्ध नव्हते. अशा प्रकारचे सेपंडरी बॅक्टेरियल फंगस इनफेक्शनचा आजार जर आलाच तरी अगदी लहान मुलांपासून आपण तयारी करीत आहोत. यासाठी आपण उपचाराचा एक प्रोटोकॉल ठरवला आहे. त्यानुसारच आपल्याला पुढे जावे लागणार आहे. स्टिरॉइड अॅण्ड शुगर पंट्रोल प्रोटोकॉल डॉक्टरांना पाळावाच लागणार आहे. मी पर्ह्टीस रुग्णालयात स्वतः हजारो कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना हा प्रोटोकॉल फॉलो केला आणि मी उपचार केलेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचा एकही रुग्ण आढळला नाही. हाच प्रोटोकॉल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या ‘माझा डॉक्टर’ संवादादरम्यान एकावेळी 26 ते 27 हजार डॉक्टरांना समाजावून सांगण्यात आला आहे. यापुढे रुग्णांमध्ये आपल्याला रक्तातील साखर तपासावीच लागणार आहे. टीपीआर, रक्तदाब, ऑक्सिजनचे रक्तातील प्रमाण आणि सहावी रक्तातील साखरेचे प्रमाण हे कोरोना रुग्णांची तापसणी करताना डॉक्टरांना लक्षात घ्यावे लागणार आहे. त्यानुसार उपचार केल्याने रुग्णांमध्ये निर्माण होणारे कॉम्प्लिकेशन आपण रोखू शकणार आहोत.

 विषाणू आपले स्वरूप बदलतो, त्यामुळे उपचाराचे स्वरूप आपण कसे ठरवणार आहोत?

– आपल्याकडेही आता जिनोम सिक्वेन्सिंग सुरू झाले आहे. पुण्याच्या एनआयव्हीबरोबरच कस्तुरबा रुग्णालयातही जिनोम सिक्वेन्सिंगसाठी लॅब सुरू करण्यात आली आहे. आयसीएमआरआधीही स्वरूप बदलेला विषाणू ओळखण्यात आपण आघाडीवर आहोत. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी आयसीएमआरच्या आधी तीन महिने कोरोनाचा अमरावती स्ट्रेन ज्याला आपण डेल्टा म्हणतो तो शोधून काढला होता. जिनोम सिक्वेन्सिंगमुळे विषाणूचे बदलले स्वरूप ओळखणे आपल्याला शक्य होणार आहे. यावरूनच आपल्याला तिसऱया लाटेचाही अंदाज घेता येऊ शकेल. उपचाराची पद्धतीही ठरवता येईल.

 अजूनही लशींची पुरेशी उपलब्धता नाही, असे असताना लसीकरण वेगाने कसे होणार? लहान मुलांमधील लसीकरणाबाबत काय नियोजन करणार आहोत?

– लसीकरणात महाराष्ट्र हे देशात आघाडीवर असलेले राज्य आहे. लसींच्या उपलब्धतेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच घोषणा केली आहे. त्यामुळे दिवाळीअगोदर मोठय़ा प्रमाणावर लसीकरण होण्याची आशा आहे. लहान मुलांमधील लसीकरणाच्या ट्रायल्स जगभर सुरू आहेत. न्यू इंग्लंड जनरल ऑफ मेडिकल मध्ये पहिल्या टप्प्यातील चाचणी यशस्वी झाल्याचे म्हटले आहे. अशाप्रकारे जगभरातील चाचण्यांचे रिपोर्ट सकारात्मक आल्यानंतर लहान मुलांमधील लसीकरणाला प्रत्यक्षात सुरुवात होईल. त्यानुसार राज्य सरकारही नियोजन करेल.

 कोरोनापासून आपल्याला नेमकी कधी मुक्तता मिळणार?

– हे शेवटी आपल्याच हातात आहे. आपण उपाययोजना करीत आहोत. जेव्हा 70 ते 80 टक्के लोकांचे लसीकरण होईल तेव्हा निश्चितच या आजारावर नियंत्रण येईल. जगभरात जेव्हा 100 टक्के लोकांचे लसीकरण होईल तेव्हाच कोरोनापासून मुक्तता मिळण्याचा आपण विचार करू शकतो. अन्यथा विमान तसेच अन्य मार्गाने ये-जा होतच असते. त्यामुळे तिथून पुनः पुन्हा कोरोनाचा संसर्ग आपल्या इथे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लसीकरणाबरोबरच आपलीही जबाबदारी आहे. डबल मास्किंग, घरातून बाहेर पडताना गर्दी टाळणे, सोशल डिस्टन्सिंग राखणे, स्वच्छता पाळणे याची आपल्याला सवय करून घ्यावी लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या