घरंदाज

215

>> आसावरी जोशी

सुरेखा पुणेकर, लावणीसम्राज्ञी… नटरंगी नार… अनेक बिरुदं मिरवत त्या ‘बिगबॉस’च्या तथाकथित सभ्य वर्तुळात दाखल झाल्या… 6 आठवडय़ांच्या ऐसपैस मुक्कामानंतर स्वतःची अदब राखत स्वतःचा स्वतंत्र आणि सभ्य ठसा आपल्या छान वागण्याने उमटवला… पाहूया या ‘नटरंगी सम्राज्ञी’चा अनोखा प्रवास…

ती आजवर शाळेची पायरीही चढलेली नाही. स्वतःची सही यापलीकडे अक्षर ओळख नाही. आजतागायत.. आईवडिलांनी शाळेत पाठवलंच नाही कधी. स्वतःचा तमाशाचा फड हे वडिलांनी पाहिलेलं स्वप्न तिने लहान वयातच पूर्ण केलं. खूप कष्टाने… मेहनतीने. ज्या जगात ती वाढली त्या जगाची भाषाच निराळी… केवळ शरीराची भाषा… घुगरांची भाषा… शृंगाराची भाषा… ही भाषा साऱया आयुष्याचं गणित शिकवून जाते. तिला अर्थातच ही भाषा अवगत झाली… आणि यातूनच तिने जिद्दीने खऱया अर्थाने आपलं आयुष्य घडवलं… उजळवलं… नकळत्या पायात घुंगरू बांधून सुरू झालेला हा प्रवास आज तथाकथित उच्चभ्रू वर्गात लीलया वावरून स्वतःचं वेगळेपण दाखवून स्थिरावलाय…

सुरेखा पुणेकर. नुकत्याच सुरेखाताई ‘बिग बॉस’च्या कार्यक्रमात 6 आठवडे राहून स्वतःचे वेगळेपण दाखवून बाहेर आल्या…

आपण कोण आहोत… आपल्यात काय उणे – अधिक आहे याची योग्य, डोळस जाणीव माणसाला असली की पुढची वाटचाल खूप सोपी होऊन जाते. येथेच मला सुरेखा पुणेकरांचे वेगळेपण जाणवले.

छान अनुभव आला मला बिग बॉसच्या घराचा… सहज गप्पांना सुरुवात झाली… मला मुळात फिरतीची सवय… घुंगरांसोबत पायाला चाकंही बांधलेली… एका जागी ठरणं अवघड… पण ‘बिग बॉस’च्या पूर्ण अनोळखी घरात मी मुक्काम केला. 15 घरचे 15 जण. एकमेकांना पूर्ण अनोळखी… पण माझ्या सरावाच्या आणि स्वभावाच्या विरुद्ध मी भरपूर दिवस एका जागी स्थिरावले. खूप मान दिला अगदी प्रत्येकाने मला… बरेचजण तर मला आई म्हणायचे… सगळय़ांशीच माझं खूप छान जमलं… माझ्या हाताची पोळी आणि भाकरी सगळय़ांच्याच आवडीची. माझ्या हातच्या पोळीला पदर कसे सुटतात याचा शोध शेफ परागही घ्यायचा.

भांडणं हा ‘बिग बॉस’च्या घराचा आत्मा… सुरेखाताई अगदी मोकळेपणाने बोलत होत्या. सगळय़ा जगाशी आमचा संपर्क तुटलेला. वेळसुद्धा समजायची नाही. घरातली कामं किती वेळ करणार… मग भांडायचं. मुळात ‘बिग बॉस’ची ट्रॉफी मिळवण्याची चुरस प्रत्येकातच. त्यामुळे भांडण अपरिहार्यच. एकमेकांच्या गोष्टीत नाक खुपसणे… कागाळय़ा करणे हा या खेळाचा भागच आहे… पण माझ्याशी कोणी वाईट वागले नाही. मला सगळय़ांच्या सगळय़ा गोष्टी ठाऊक होत्या. प्रत्येकाचं काम वेगळं… माझंही काम खूप वेगळं… पण प्रत्येकाने मला मान दिला. मी कोणाच्या भांडणात नव्हते. पण माझं एवढं शिक्षण नसल्याने त्यांचे टास्क मला एवढे जमले नाहीत हेही सुरेखाताई सहज मान्य करून टाकतात…

‘बिग बॉस’मधल्या राहण्यामुळे मोबाईलची सवय सुटली माझी… ‘बिग बॉस’चा हा जेटलॅगही त्या मनापासून अनुभवत आहेत. गाणी विसरलेय… अजून एखाद- दोन आठवडे लागतील पूर्वपदावर यायला. तिथे मला 24 तास एसी मात्र सहन होत नव्हता. त्यामुळे बाहेर आल्यावर आधी मी सर्दी, खोकला, तापाने बेजार झाले. आता गावाला आलेय… काहीच दिवसांत माझ्या कामाला सुरुवात करीन.

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मी वेगळा अनुभव घेतलाय… सुरेखाताई सांगत होत्या… एवढे खडतर अनुभव आले आहेत की, त्यामुळे माझे पाय कायम जमिनीवर असतात…

वडील पुणे रेल्वे स्टेशनवर हमाली करायचे. परिस्थिती एवढी बिकट, की वडिलांच्या डोक्यावरील मुंडाशाचे फ्रॉक शिवून सुरेखाताईंनी घातले आहेत. पण वडिलांना तमाशाचे, लावणीचे अतिशय वेड. शाळेत शिकण्यापेक्षा हे शिक… सहज लेकीला सांगून टाकले आणि अमलातही आणले. वयाच्या आठव्या वर्षापासून सुरेखाने पायात घुंगरू बांधून घेतले… आणि त्यांची संगत आयुष्यभराची झाली.

पुढे गावातून सहा हजार उसने घेऊन आणि घरातील चार सोन्याचे डाग विकून पंचवीस हजार रुपये उभे केले आणि खूप लहान वयात सुरेखाने स्वतःच्या आणि बहिणीच्या नावाने तमाशाचा फड उभारून वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. लहान असताना लावणी सादर केली की प्रेक्षक कौतुक म्हणून गळय़ात शेव-रेवडीच्या माळा घालायचे. 1986 ला लता-सुरेखा पुणेकर नावाने सुरेखाबाईंनी तमाशाचा फड सुरू केला.

मूळच्या संवेदनक्षम मनाने त्यांना एवढय़ावरच स्वस्थ बसू दिले नाही. पुढे त्यांनी ऑर्केस्ट्रा सुरू केला, नाटकं केली. तमाशा ते नाटक हा पल्ला त्यांनी अंगभूत कलेच्या आणि वानकं करण्याच्या ओढीतून सहज गाठला. ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या लोकनाटय़ात राम नगरकरांबरोबर काम केले. मधू कांबीकर, जयमाला इनामदार यांच्या सहवासात त्यांची नाटय़कला, नृत्यकला प्रतिष्ठsची झाली.

आज लावणी, तमाशा या पूर्वी उपेक्षित असलेल्या लोककला प्रकारास प्रतिष्ठा मिळवून देण्यात सुरेखाताईंचा मोठा वाटा आहे. ‘नटरंगी नार’ने पारंपरिक लावण्या प्रतिष्ठत वर्गात पोहोचवल्या. अमेरिकेत पोहोचलेली ही नटरंगी नार जमिनीवर मात्र घट्ट पाय रोवून उभी राहिली. यातूनच या क्षेत्रात येणाऱया मुलींना सुरेखाताईंनी घुंगरांच्या जोडीने शिक्षणाच्या वाटेवरही चालवण्याचा ध्यास घेतला. त्या सांगतात, माझा अट्टहास असतो की, या मुलींनी शिक्षण घेतलंच पाहिजे. नृत्याच्या तालमीसोबत पुस्तकही हाती धरायला हवे.

आजच्या लावणीबद्दलही सुरेखाबाई सकारात्मक दृष्टिकोन बाळगतात. आज लावणीमध्ये फ्युजन, रिमिक्स, चित्रपट शिरलाय. अर्थात प्रेक्षकांच्या आवडीचे द्यावे लागते. त्यांना स्वतःला पारंपरिक लावण्या आवडतात. शासनाला रंगभूमीवरील केवळ नाटक दिसते… आम्हा लोककलावंतांनी कुठे जायचे मग? शासनाने या लोककलेतही लक्ष द्यायला हवे. अजूनही अनेक लोककलावंतांचे हातावरचे पोट असते. त्यांनाही सुरक्षित आयुष्य मिळायला हवे. आमचं आयुष्य आम्हीच घडवलं. पण ही लोककला टिकवायची असेल तर आम्हा लोककलावंतांना शासनानेच पाठिंबा द्यायला हवा.आज सुरेखाताईंनी त्यांच्या ‘नटरंगी नार’ने लावणीला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. अनेक मुलींना त्यांनी सुरक्षित आयुष्य दिलं आहे. ज्या मातीतील त्या आहेत तिच्याशी आत्यंतिक इमान राखून त्या तथाकथित प्रतिष्ठत वर्तुळात स्वतःचे स्थान निर्माण करून, वचक राखून वावरतात. आपल्या कुटुंबावर, बहिणींवर त्यांची तितकीच माया. शेती करायला आवडते. घरच्या स्वयंपाकघरात त्या मनापासून रमतात. पुरणपोळी, मटण हे त्यांचे हातखंडा प्रकार.

त्यांच्याशी बोलत असताना व्यक्तिशः मला जाणवला, भावला तो त्यांचा प्रामाणिकपणा, साधेपणा… ज्या जगाला… आपण निषिद्ध मानतो… जी परिस्थिती आपल्याला नकोशी असते, त्यात राहूनही सुरेखा पुणेकरांनी स्वतःच स्वतःवर वानके संस्कार घडवून घेतले आहेत. सभ्यतेच्या मर्यादा तथाकथित उच्चभ्रूंनी त्यांच्याकडून शिकाव्यात इतके आदबशीर वागणे आणि बोलणे मला त्यांच्यात दिसले आणि जाणवले. येथेच त्या स्वतःचे वेगळेपण सिद्ध करतात.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या