बालनाट्य ते औरंगजेब साकारताना…

523

>> केदार ओटवणेकर

वडिलांना मदत म्हणून रंगभूषा करता करता ही रंगांची कलाच माझा ध्यास ठरली…

माझे वडील ज्येष्ठ रंगभूषाकार सुरेश ओटवणेकर. मी मोठा ऑफिसर व्हावं अशी माझ्या बाबांची इच्छा. पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना मदत करण्यासाठी मला नाट्यक्षेत्रात रंगभूषाकार म्हणून काम करणं भाग होतं. 12 वी झाल्यावर 1996 साली बालनाट्यात रंगभूषा करायला सुरुवात केली. त्यानंतर माझी नाटकाची आवड वाढल्यामुळे राजू तुलालवार यांच्या चिल्ड्रेन्स थिएटर या संस्थेतर्फे होणाऱ्या बालनाटय़ात काम केलं.

अदिय निर्मित ‘एवढंच ना’ हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक. पुढे माऊली प्रोडक्शनच्या ‘आई रिटायर होतेय’, ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’, ‘बाबांची गर्लफ्रेंड’ तसेच सुयोग निर्मित ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘सख्या सजणा’, ‘वन टू का फोर’, अष्टविनायक निर्मित ‘गंगुबाई मॅट्रिक’, ‘बंटी की बबली’, ‘जाऊबाई जोरात’, असा रंगभूषाकार म्हणून प्रवास सुरू झाला. हा नाटयक्षेत्रातील प्रवास सुरू असतानाच ‘नऊ महिने नऊ दिवस’ या चित्रपटात निर्मिती सावंत यांचा पर्सनल मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केले. त्यानंतर दूरदर्शनच्या दम दमा दम, धिना धिन धा, हास्यरंग, ईन मीन तीन या कार्यक्रमांत रंगभूषाकार म्हणून काम करू लागलो.

माझ्या बाबांमुळे प्रभाकर पणशीकर (पंत) मला ओळखायचे. तेव्हा गणेशोत्सवानिमित्त ते ‘मी पणशीकर बोलतोय’ हा कार्यक्रम करायचे. त्यामध्ये ते त्यांच्या वेगवेगळ्या नाटकांमधील प्रवेश करायचे. यात अशोक समेळ, फैय्याज, विघ्नेश जोशी असे सर्वच दिग्गज कलाकार असायचे. एक दिवस रंगभूषाकार शशिकांत सकपाळ वैयक्तिक अडचणीमुळे एका प्रयोगात येऊ शकणार नव्हते म्हणून त्यांनी मला त्या प्रयोगाला पाठवलं. मला त्यांच्या एकाही नाटकातले गेटअप माहीत नसले तरीही प्रभाकर पणशीकर आणि इतर कलाकारांनी मला सांभाळून घेतलं. ‘इथे ओशाळला मृत्यू’मधील औरंगजेब आणि तोही प्रेक्षकांसमोर स्टेजवर पंत प्रेक्षकांशी बोलत असताना मला साकाराचा होता. म्हणून मी घाबरलो होतो. पंत बोलायचे थांबले की मी त्या वेळात दाढी, मिशी, भूवया लावायचो. त्यांच्या चेहऱयावरील सुरकुत्या काढायचो. असं करत घाबरत घाबरत एकदाचा औरंगजेब तयार झाला आणि माझ्या पाठीवर शाबासकीची थाप पडली. पंतांनी माझं तर कौतुक केलंच पण माझ्या वडीलांचंही केलं. ही माझ्या कामाची पावती. आणखीन एक पावती मिळाली ती म्हणजे कार्यक्रम संपल्यावर एका शाळकरी मुलीने माझा रंगभूषाकार म्हणून घेतलेला ऑटोग्राफ.

नाटयसृष्टी जसजशी गॅसबत्त्यांकडून एलईडीकडे प्रवास करू लागली तसे पूर्वीचे भडक मेकअप आता सौम्य झाले. जयंत घाटे यांना नाटकातील सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे हव्या असतात. ‘हे राम नथुराम’ नाटकात त्यांची भूमिका सुपरीटेंडट शेखची होती. त्यांची दाढी मी फेविकॉलने चिकटवली. हा प्रयोग व्यवस्थित पार पडला. त्याबद्दल त्यांनी माझं कौतुक केलं.

आपली प्रतिक्रिया द्या