मोडी लिपी अस्तंगत होणार नाही

218
  • प्रज्ञा घोगळे
इतिहासकालीन मोडी लिपी अस्तंगत होत आहे. परंतु इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांना हे मान्य नाही. ते म्हणतात, आजच्या तरुण पिढीला इतिहासाविषयी आकर्षण आहे. त्यांचा मोडी लिपीला उत्तम प्रतिसाद आहे. मी स्वतः मोडी लिपीचे प्रशिक्षण वर्ग घेत आहे.

आज मोडी लिपी अस्तंगत होताना दिसते; तर आजच्या तरुणांपर्यंत ही मोडी लिपी पोहचेल का?

हो. निश्चितच पोहोचणार. आज मी मोडी लिपीचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. अनेक वर्षे मी मोडी लिपीचे प्रशिक्षण घेत आहे. ज्यांना इतिहासाची आवड असेल अशांनी मोडी लिपीचे प्रशिक्षण वर्ग चालू करावे. ज्यातून आपल्याला मोडी लिपी समजू शकेल. तसेच आम्ही मोडी लिपी शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यातील काही तरुण मोडी लिपी शिकले असून काही तरुण आता स्वतः मोडी लिपीचे प्रशिक्षण वर्ग घेऊन लोकांना मोडी लिपी शिकवत आहेत. आज तरुणांचा इतिहासाकडे पाहण्याचा कल बदलला असून आजच्या तरुणांमध्ये इतिहासाची जिज्ञासा निर्माण झाली आहे; यातून शेकडो तरुण इतिहास वाचू व शिकू इच्छितात अशा सर्वांना एकत्र करून त्यांच्याकडून काम करून घ्यावे असे मला वाटते.

इतिहास कालात अत्यंत प्रचलित असलेली मोडी लिपी अस्तंगत का झाली असावी? एक इतिहास संशोधक म्हणून यावर काय सांगाल?

इतिहास कालात अत्यंत प्रचलित असलेली मोडी लिपी अस्तंगत होण्याची एक नाही तर अनेक कारणे आहेत. सर्वप्रथम एक कारण म्हणजे मोडी लिपी ही थोडीशी किचकट असल्यामुळे स्वातंत्र्यानंतर आपण सार्वत्रिक देवनागरीचा स्वीकार केला. देवनागरीची अक्षरे टाईप करायला सोपी असून अगदी संस्कृतशी जवळ असल्यामुळे आपण त्याचा स्वीकार केला आणि म्हणून हळूहळू मोडी लिपी बाजूला पडली. मोडी लिपीमध्ये प्रत्येक व्यक्तीची लिखाणाची पध्दत वेगवेगळी असून अनेक अक्षरे एक सारखीच असतात. उदा.द, घ, प, फ, ह, ब ही अक्षरे एक सारखीच दिसून येतात. एखाद्या मनुष्याचे ‘प’ अक्षर तर दुसऱया व्यक्तीचे ‘द’ हे अक्षर ही अक्षरे एकसारखी दिसतात. दुसरी गोष्ट म्हणजे मोडी लिपीमध्ये आपण एक लाइन आखून घेतली का सरळ लिहीत जायचं म्हणजे आपण जे शब्दांमध्ये अंतर ठेवतो ते न ठेवता लिहिले जाते. यामुळे या वाक्यांमध्ये शब्द तुटत नाहीत. दुसरे कारण म्हणजे सरकारने शालेय अभ्यासक्रमातूनदेखील मोडी लिपी बंद केली. यामुळे मोडी लिपी कोणी शिकायचा प्रश्नच राहिला नाही. ही भाषा आज लोकांना येत नाही. जर शालेय अभ्यासक्रमातून तुम्ही एखादी लिपी काढून टाकली. तर लोकांचा त्या लिपीशी कायमचा संपर्क तुटतो. मग ती अगदीच दुर्मिळ होते. तसे मोडी लिपी अभ्यासक्रमातून काढून टाकल्यामुळे दुर्मिळ होत गेली. अशी ही मोडी लिपी अस्तंगत होण्याची कारणे आहेत.

मोडी लिपी खरोखर अवघड आहे का? आज मोडी लिपी अभ्यासणारा वर्ग किती आहे?

मोडी लिपी म्हटलं तर थोडी अवघड आहे. ती समजून घ्यायला देवनागरी लिपीपेक्षा कठीण आहे. मोडी लिपी देवनागरी सारखी सुटसुटीत लिहिता येत नाही. त्यामुळे ती वाचणे कठीण जाते. मोडी लिपीत काही अक्षरे ही एकसारखी असल्याने नेमके कोणते अक्षर लिहिले आहे ते समजणे फार कठीण जाते.

शिवकाल आणि पेशवाई कालखंड यामध्ये मोडी लिपी आहे का? तसेच मोडी लिपी देवनागरीशी सुसंगत आहे का?

हो. शिवकाल आणि पेशवाई कालखंड यामध्ये मोठ्या प्रमाणात मोडी लिपीचा समावेश आहे. कागदपत्र ही मोडी लिपीमध्ये लिहिलेली आहेत. त्यामुळे ती वाचणे आजच्या पिढीला कठीण जात आहे. मोडी लिपी व देवनागरी लिपीशी सुसंगत नाही. मोडी लिपी पूर्णपणे वेगळी आहे. देवनागरी आणि मोडी लिपी यामध्ये तब्बल ९० टक्के फरक आढळून येतो.

तुम्ही स्वतः मोडी लिपीचे प्रशिक्षण वर्ग घेत असून तरुणांचा प्रतिसाद कसा मिळतो आणि मोडी लिपीच्या प्रसाराकरता काय करावे?

मी स्वतः मोडी लिपीचे प्रशिक्षण वर्ग घेत असून आजच्या तरुण पिढींचा मोडी लिपीविषयी उत्तम प्रतिसाद आहे. आजच्या तरुण पिढीला इतिहास जाणून घेण्याची आवड असल्यामुळे त्यांचा मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळत असून त्यांना इतिहासाविषयीची जिज्ञासा आहे. तसेच मोडी लिपीचा प्रसार करण्यासाठी शासनाने ज्याप्रमाणे ज्युनिअर कॉलेजमध्ये एखादी एक्स्टर्नल भाषा शिकवली जाते. उदा. फ्रेंच, रशियन, चीन तशी त्यांनी शालेय अभ्यासक्रमात मोडी लिपी शिकवावी जेणेकरून लोकांना मोडी लिपी आवडेल. लोकांमध्ये मोडी लिपीविषयी मोठ्या प्रमाणात आवड निर्माण होईल आणि लोक त्या मोडी लिपीचा अभ्याकरून आपली मोडी लिपीत असलेली कागदपत्रे वाचू शकतील.

उत्साहाच्या भरात इतिहासात बदल केला जातो. त्याविषयी थोडंसं?

इतिहास एक शस्त्र आहे. ते पुराव्यावर आधारलेलं असून त्याचे कागदपत्रांच्या आधारे लेखन करावे अशी अपेक्षा असते. परंतु आज तरुणांना इतिहासाविषयी आकर्षण निर्माण झाले असले तरी ते शास्त्रीय पद्धतीने लेखन करण्याची परंपरा कमी झाली आहे. आपल्या मनाला इतिहासाविषयी काय वाटतं ते लोक लिहिण्याचा प्रयत्न करतात किंवा आपली मतं मांडण्याचा प्रयत्न करतात. हे लिखाण ते व्हॉट्सऍपच्या आधारे आपली मते मांडतात. परंतु हे अयोग्य आहे. इतिहासाचा अभ्यास करा आणि पुराव्यासहित आपली मते मांडा.

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी अध्यासनाने महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून त्यापैकी ‘मराठे-जंजिरेकर सिद्दी संघर्ष’ हा पहिला खंड ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी प्रसिद्ध केला आहे. येत्या काळात असे १० खंड सिद्ध करण्याचा त्यांचा मानस आहे. रियासतकार सरदेसाई यांनी ७५ वर्षांपूर्वी पेशवे दफ्तरातील कागदपत्रांचा अभ्यास केला होता. या मोडी लिपीतील कागदपत्रांचे लिप्यांतर करून गौरवशाली इतिहास प्रसिद्ध करण्याची आवश्यकता असल्याचे मत पांडुरंग बलकवडे व्यक्त करतात. मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित माहितीचा समावेश असलेली मोडी लिपीतील सुमारे पाच कोटी कागदपत्रे पेशवे दफ्तरामध्ये असून यासाठी मोडी लिपीच्या अभ्यासासाठी जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या