जिद्द

251

>> नमिता वारणकर

नुकत्याच झालेल्या पॅरा बॅडमिंटन जागतिक स्पर्धेत तिने सुर्वणपदक पटकावले आहे… इतरांना प्रेरणा देणारा प्रवास करणाऱया या मराठमोळय़ा मुलीचं नाव आहे ‘मानसी जोशी’!

प्रबळ इच्छाशक्ती आणि अचानक उद्भवलेल्या अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करण्याची जिद्द हे गुण अंगी असतील तर ‘यश’ दूर नाही…अर्थात हे फक्त वाचायला किंवा ऐकायला फार सोपं वाटत असलं तरी स्वतःवर ओढवलेल्या संकटाला निश्चयाने तोंड दिले. नुकत्याच झालेल्या पॅरा बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले आहे. इतरांना प्रेरणा देणारा प्रवास करणाऱया या मराठमोळ्या मुलीचं नाव आहे ‘मानसी जोशी’!

दुचाकीवरून कार्यालयात जात असताना एक दिवस तिला एका ट्रकने धडक दिली. त्यात तिने एक पाय गमावला. तशा परिस्थितीतही तिने रुग्णालय गाठले. उपचारानंतर धातूचा पाय लावण्यात आला. अशा अशक्यप्राय परिस्थितीत खचून न जाता त्यावर मात करून अशक्य ते शक्य करून दाखवणाऱया मानसीशी केलेली ही बातचित…

आयुष्यात आलेल्या अवघड वळणाविषयी ती सांगते, अपघातानंतर 50 दिवस मी रुग्णालयात होते. अपघातातून सावरल्यावर आणि कृत्रिम पाय बसवल्यानंतर माझे बॅडमिंटनवरील प्रेम मला शांत बसू देत नव्हते. म्हणून मी क्रीडा प्रशिक्षक गोपीचंद यांच्या अकादमीत प्रवेश घेतला. स्थानिक आणि वरच्या पातळीवरील अनेक स्पर्धांमध्ये सहभागी झाले. मी घेतलेल्या प्रचंड मेहनतीचं चीज झालं. त्यामुळे मला खूपच आनंद झाला. गोपीचंद अकादमीच्या कोचिंग स्टाफचे मी आभार मानते. माझ्या प्रत्येक सामन्यावेळी गोपीचंद सर स्वतः उपस्थित असायचे. यासाठी त्यांचे विशेष आभार, अशा शब्दांत ती तिच्या भावना व्यक्त करते.

लहानपणापासूनच तिला बॅडमिंटन खेळाची आवड होती. त्यामुळे शाळेत आणि जिल्हा स्तरावर होणाऱया बॅडमिंटन स्पर्धांत ती भाग घेत असे. तसेच वडील मुंबईच्या भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरमध्ये काम करतात. इथेच तिने तिच्या खेळातील बारकावे शिकून घेतले होते. सोमय्या महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक इंजिनीयरिंग पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण होताच नोकरीनंतरही तिने तिचा हा छंद जोपासला. त्यामुळे या खेळात प्राविण्य मिळवणे सोपे जाऊ लागले.
2015 साली रौप्य पदक आणि 2017 साली दक्षिण कोरियात झालेल्या स्पर्धेत ब्रांझ पदक मिळाले होते. त्यानंतर मला वर्ल्ड पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवण्याचे स्वप्न खुणावू लागले. या स्पर्धेची तयारी सुरू केली आणि खडतर प्रयत्नांमुळेच ती या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवू शकली.

अपंग खेळाडूंची कणखर मानसिकता…
अपंग खेळाडूंच्या कणखर मानसिकतेविषयी प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी सांगतात, माझ्या आतापर्यंतच्या कारकीर्दीत मी ज्या अपंग खेळाडूंना प्रशिक्षण दिले त्यांच्याकडे बघितल्यावर असं लक्षात येतं की, हे खेळाडू मानसिकदृष्टय़ा चांगल्या खेळाडूंपेक्षाही सक्षम आहेत. त्यांच्याकडे काय नाही यावर ते रडत बसत नाहीत. जे आहे त्यावर सकारात्मक विचार कसा करायचा हेच त्यांच्याकडून बघितले जाते. सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्ष सराव करणं, कमी कालावधीत प्रत्यक्षरीत्या एखादी गोष्ट अमलात आणणं, त्यांची सराव करण्याची पद्धतही सर्वसामान्य खेळाडूंसारखीच आहे. सरकारप्रमाणेच कॉर्पोरेट विभागानेही या खेळाडूंना मदत करावी.

नवं आव्हान
यंदा महाराष्ट्र सरकारने ‘एकलव्य पुरस्कार’ देऊन तिचा सन्मान केला आहे. आता पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देण्याचं स्वप्न बघून नव्या प्रवासाला मानसीने सुरुवात केली आहे. यामुळेच जागतिक पातळीवर सातत्याने यशस्वी होण्याचे आव्हान तिच्यासमोर आहे. जिद्द आणि मेहनतीच्या बळावर देशाचं नाव उंचावर नेणारी मानसी आपल्याला कायम प्रेरणा देत राहील हे नक्की!

विश्वविजेतेपदासाठी मेहनत
फिटनेसवर खूप मेहनत घेतली. दररोज खेळासाठी करायच्या सरावात शिस्त आणि सातत्य आणले. विश्वजागतिक बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर व्यायामाच्या सत्रात वजन कमी करून स्नायू बळकट करण्यावर भर दिला. खेळताना सर्व्हिस जोरदार व्हावी यासाठी जिममध्ये कित्येक तास मेहनत घेत होते. असे मानसीचे तिने घेतलेल्या खेळाविषयी म्हणणे आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या