जिम्नॅस्टिक आणि नृत्य

 फुलवा खामकर

सतत वेगवेगळे प्रयोग हे फुलवाचे वैशिष्ट्य. स्वत:ची नृत्यसंस्था, ऑनलाइन डान्स अॅकॅडमी आणि बरेच काही… काहीतरी आव्हानात्मक शारीरिक हालचाल ही आजच्या प्रत्येक स्त्रीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.

समर्थ व्यायाम मंदिरमध्ये मी १९८४मध्ये जिम्नॅस्टिक शिकायला लागले. लहानपणापासून खूप मस्तीखोर होते. म्हणून मला आईने समर्थ व्यायाम मंदिरमध्ये जिम्नॅस्टिक शिकायला पाठवले. तिथे मी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरीय अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. तिथूनच मी रिदमिक जिम्नॅस्टिककडे वळले. हा फक्त मुलींसाठी खेळ आहे.  त्याच्यामध्ये संगीताच्या तालावर रिदमिक जिम्नॅस्टिक केलं जातं. यामध्ये मला छत्रपती पुरस्कार मिळाला. तिथूनच मला नाचाची आणि कोरियोग्राफीची आवड निर्माण झाली. त्यामुळे नृत्य शिकू लागले. त्यानंतर माझ्या असं लक्षात येऊ लागलं की, मला नृत्य शिकत असताना जिम्नॅस्टिकचा खूप फायदा होत आहे. माझ्या नृत्याचा पाया जिम्नॅस्टिक आहे. त्यामुळे जेव्हा स्वतःचा क्लास सुरू करण्याची वेळ आली तेव्हा मी जिम्नॅस्टिक विद्यार्थ्यांना जिम्नॅस्टिक शिकवायचंच हा निर्णय घेतला.

 नृत्य शिकणाऱ्यांनाही व्यायामाची गरज

तरुणींनी व्यायामाला महत्त्व देणं खूप आवश्यक आहे. व्यायाम  ही आताच्या काळाची गरज आहे. कुठल्याही पद्धतीचे काम करणाऱ्या माणसाने स्वतःसाठी अर्धा तास काढलाच पाहिजे. विशेषतः मुलींनी स्वतःकरिता वेळ दिला पाहिजे कारण आपल्या शरीरामध्ये सतत बदल होत असतात. ते बदल पुरुषांच्या शरीरात होत नाहीत. आपली शारीरिक आणि मानसिक अवस्था पुरुषांपेक्षा वेगळी असते. व्यायामासाठी वेळ दिला की, त्याचा फायदा आपल्याला आपल्या पुढच्या कामांमध्ये होतो. यामुळे मी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या फिट राहते. जे नृत्य करतात त्यांना व्यायामाची गरज नाही असं काहीजणांना वाटतं, पण तसं नाही. नृत्य शिकणाऱ्यांनाही व्यायामाची गरज असते. त्यामुळे आपले शरीर बळकट व्हायला मदत होते.

 शास्त्रीय नृत्य शिकणे महत्त्वाचे

नृत्य शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने शास्त्रीय नृत्य शिकणं खूप गरजेचं आहे. शिकायलाच पाहिजे. मी लहानपणी बॅले, जिम्नॅस्टिक शिकले त्या माझ्या फॉर्मला कथ्थक खूप जवळ जातं. कथ्थक जास्त फ्री स्टाइलकडे जाणारा नृत्यप्रकार आहे. ज्यांना नृत्यात करियर करायचं आहे त्यांनी मोहिनीअट्टम, भरतनाट्यम्, कथ्थक जो नृत्य प्रकार आवडेल तो शिकायला हवा. मी  शास्त्रीय नृत्य शिकले नसते, तर कदाचित नटरंगच्या लावण्या मला कोरियोग्राफ करता नसत्या आल्या. हिंदुस्थानी नृत्य दिग्दर्शन करताना शास्त्रीय नृत्याची आवश्यकता खूपच भासते. 

स्वतःसाठी वेळ द्या

ज्यांना व्यायामाची आवड आहे त्यांनी व्यायाम करा आणि नृत्याची आवड आहे त्यांनी नृत्य करा. कारण व्यायामाची जरी आवड असली तरी प्रत्येकाच्या शरीराची रचना वेगळी असते. हल्ली ऑनलाइनही वेगवेगळय़ा प्रकारचे व्यायाम शिकवले जातात. ज्यांना झेपत नाही वेळेमुळे ते ऑनलाइन बघूनही व्यायाम करू शकतात.

ऑनलाइन डान्सला प्रतिसाद

जे मला शिकायला वेळ मिळत नाही ते नृत्याचे प्रकार मी ऑनलाइन बघतेहल्ली जग इतकं बदललंय की, फक्त ऑनलाइन शिकणं महत्त्वाचं नाही, तुम्हाला एक चांगला गुरू मिळणंही आवश्यक असतं. पण जिथे अशी काही सोय नाही तिथे ऑनलाइनचा पर्याय खरंच खूप चांगला आहे. मराठी चित्रपटातल्या गाण्यांवर हिंदुस्थानी आणि पाश्चिमात्य नृत्य प्रकार कसे करता येतील यासाठी मी एक ऑनलाइन एपिसोड केला होता. यामध्ये सध्या ड्युएट नृत्य, कथ्थक तसेच कंटेम्पररी नृत्य असे नृत्याचे वेगवेगळे प्रयोग करून मी नवीनवीन प्रयोग करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या