नाट्य परिषद रसिकाभिमुख करणार!

26

मुलाखत – रजनीश राणे

मच्छिंद्र कांबळी नाट्यनिर्माता संघाचे अध्यक्ष असतानाच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचेही अध्यक्ष झाले होते. मच्छिंद्र यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र नवनाथ ऊर्फ प्रसाद यांनीही तोच वारसा चालवला आहे. म्हणजे ‘भद्रकाली प्रॉडक्शन’ची वाटचाल जोमाने सुरूच आहे. पण निर्माता संघासह नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदीही प्रसाद यांची वर्णी लागली आहे. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत प्रसाद यांचे ‘आपलं पॅनेल’ निवडून आले आहे. आता पुढे काय? यासारख्या काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रसाद कांबळी यांच्याशी साधलेला हा मुक्तसंवाद…

१. ६१ पैकी ३४, हे मतांचे गणित कसे जमवलेस?
– मतदानाचा विचार केला तर ३२ मते हमखास होती. तसा प्रत्येकापर्यंत पोहोचलो होतो आणि पुढील पाच वर्षांचा अजेंडाही सांगितला होता. ३२ जणांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यामुळे विजयाची खात्री होतीच. ३२ चे ३४ झाले. ही दोन मते बोनस समजा. मात्र आता अध्यक्ष झाल्यावर आणि नियामक मंडळात आपले पॅनेल सरस असले तरी केवळ ३२च नव्हेत, तर संपूर्ण ६१ जणांची कार्यकारिणी माझी आहे, अशी माझी प्रामाणिक भावना आहे. मतांच्या आकडय़ांची जुळवाजुळव ही निवडणुकीपुरतीच होती. आता सर्वांना घेऊनच काम केले जाईल, निर्णय घेतले जातील.

२. मोहन जोशी दहा वर्षे अध्यक्ष होते. त्यांचे मार्गदर्शन घेणार?
– का नाही? निश्चितच घेणार. निवडणूक संपली, आता हम सब एक है. मोहन जोशी यांची परिषदेच्या कामकाजाबद्दल काही संकल्पना निश्चितच असेल, योजना असतील. त्यांच्याशी नक्कीच संवाद साधू आणि परिषदेच्या हिताचे निर्णय घेऊ. अखेर हा जगन्नाथाचा रथ आहे. तो सर्वांनी मिळूनच ओढायला हवा.

३. अजेंडय़ावर पहिला विषय कुठला आहे?
– अर्थातच नाट्यसंमेलन. मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात किंवा जूनच्या पहिल्या आठवडय़ात, पण पावसाळय़ापूर्वी नाट्यसंमेलन होणार म्हणजे होणारच. १९ एप्रिलला नियामक मंडळांची पहिली सभा आहे. त्यात निर्णय होईल. आयोजनासाठी दिवस कमी आहेत, पण सर्वांनी जोमाने काम केले तर नाट्यसंमेलन दणक्यातच होईल.

४. दरवर्षी सारखेच?
– दरवर्षी सारखेच, पण यंदाच्या संमेलनाचे स्वरूप मात्र बदलणार आहोत. नाट्यरसिक आणि रंगकर्मी यांच्या सूचनांचा विचार करून ते बदलण्याचे ठरत आहे. आता बैठकीत काय ठरते ते बघूया. पात्र बदलली, नाटक मात्र तेच, असे काही होणार नाही, हे निश्चित!

५. नाट्य परिषद हा विषय रंगकर्मी यांच्या भोवतीच का मर्यादित राहतो? प्रेक्षकांना कधी विचारात घेणार की नाही?
– नक्कीच घेणार. नाट्य परिषद ही काही रंगकर्मी किंवा रंगमंच कामगारांची युनियन नव्हे. रंगकर्मी आणि नाट्यरसिक यांच्यातील परिषद दुवा बनायला हवी असे मला वाटते. परिषद ही मध्यवर्ती संघटना आहे. ती रसिकाभिमुख करण्याचा आमचा प्रयत्न राहील.

६. म्हणजे नेमके काय करणार?
– परिषदेमार्फत रंगकर्मींसाठी विविध योजना, प्रकल्प राबवले जातात. पण रसिकांचा संबंध फक्त नाट्यसंमेलनापुरताच येतो. हा संबंध टिकायला हवाच, पण त्यापलीकडे जाऊन प्रेक्षकांची रसिकता जोपासण्यासाठी काही करता येईल का याचा विचार व्हायला हवा. आज महाराष्ट्रातील नाट्यगृहांची काय अवस्था आहे? थिएटर चांगली नाहीत म्हणून नाटकवाले तेथे जात नाहीत आणि नाटक येत नाही म्हणून नाट्यरसिक टीव्हीसमोर बसतात. हे कुठेतरी थांबायला हवे.

७. म्हणजे सरकारवर दबाव आणणार?
– का आणू नये? सरकारचं उत्तरदायित्व आहे त्यासाठी. आज सरकार गावात नाट्यगृह बांधते; पण काही वर्षांतच त्या नाट्यगृहाचे सभागृह होते. ते तसे का होते याचा सरकारने विचार करावा. नाटकाचे थिएटर सभा, लग्नासाठी भाडय़ाने दिले जाते. हे वाईट आहे. थिएटर बांधण्यापूर्वी परिषदेशी बैठक केली, नाट्यसृष्टीशी संबंधितांशी चर्चा केली आणि नंतर नाट्यगृहाचा बांधकाम आराखडा तयार केला तर ‘सभागृहा’त प्रयोग करण्याची वेळ नाटकवाल्यांवर येणार नाही.

८. म्हणजे परिषद आता रसिकांचा विचार करणार तर…
– बिलकुल. अहो, मराठी रंगभूमीचे काय होणार, असा तद्दन फालतू प्रश्न विचारणाऱयांनी रंगभूमी तहहयात राहणार, चिंता करू नका हे लक्षात ठेवावे. जोपर्यंत रसिक आहेत तोपर्यंत मराठी नाटक सुरूच राहणार. पण रसिकाची रसिकता जिवंत ठेवायची असेल तर नाटक त्याच्यापर्यंत पोहोचायला हवे आणि त्यासाठी उत्तम थिएटर्स हवी, असे हे गणित आहे. आता हे गणित सोडविण्यासाठी नाट्य परिषद निश्चितच पुढाकार घेईल. हे मी ठामपणे सांगतो.

९. जग डिजिटल झालेय, परिषदेचे काय?
– परिषदही डिजिटल व्हायला हवी. खरे तर निवडणूक ऑनलाइनच व्हायला हवी होती असे माझे वैयक्तिक मत आहे. डिजिटल हा या युगाचा मंत्र असला तरी तो चुकीच्या पद्धतीने अमलात येता कामा नये. पनवेलच्या थिएटरचे तारखांचे बुकिंग ऑनलाइन केले आहे. रवींद्र नाट्य मंदिरचेही तसेच होणार आहे. हे योग्य आहे, पण प्रेक्षकांचे काय? त्यांच्यासाठी ऑनलाइन बुकिंगची व्यवस्था आधी व्हायला हवी. थिएटरने प्रेक्षकांचा विचार आधी करायला हवा असे मला वाटते.

आपली प्रतिक्रिया द्या