कलेचा ध्यास आणि आस

>> शुभांगी बागडे

कलागुणांनी समृद्ध असणाऱया व्यक्ती आपल्या नजरेतून कायम आनंदच शोधत असतात. जगण्याचा असाच आनंद शोधणारं एक व्यक्तिमत्त्व म्हणजे शिल्पकार प्रमोद कांबळे. मातीच्या गोळ्यामध्ये प्राण फुंपून त्याला जिवंतपणा देणारी ही कला आणि तिचा कलासाधक म्हणून प्रमोद यांना गौरवण्यात आलं आहे. शिल्पकार म्हणून मिळालेली प्रसिद्धी, लोकप्रियता याबरोबरच मिळालेलं समाधान त्यांना खूप मोलाचं वाटतं, पण हे समाधान मिळवतानाच या क्षेत्रातील शिक्षणाचा दर्जा टिकावा आणि ते योग्य पद्धतीने मिळावं, याबाबत ते फार आग्रही आहेत. कलासाक्षरता हा कलेचा गाभा आहे, पण तो दुर्लक्षित होत असल्याबाबत खंत व्यक्त करतानाच यासाठी आपण नेमकं काय करू शकतो हेही सांगणाऱया शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्याशी केलेली ही बातचित.

शिवसेनाप्रमुखांचे शिल्प
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे समस्त कलाकारांचं आवडीचं व्यक्तिमत्त्व. मी याआधीही अनेकदा त्यांचं चित्र चितारलं आहे. हल्लीच मी त्यांचं शिल्प बनवलं. गेल्या महिन्यात स्टुडिओला लागलेल्या आगीने झालेल्या मानसिक आघातानंतर प्रथमच मी मातीत हात घातला आणि तोही शिवसेनाप्रमुखांचं शिल्प घडवण्यासाठी हा माझ्यासाठी विलक्षण योगायोग होता. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विलक्षण जादू आजही कायम आहे. व्यंगचित्रकार ही त्यांची वेगळी ओळख. त्यामुळेच कलाकारांबाबत त्यांना खास जिव्हाळा होता. नगरमध्ये एका कार्यक्रमासाठी जेव्हा शिवसेनाप्रमुख आले होते तेव्हा याची प्रचीती मला आली होतीच. आता पुन्हा या शिल्पाच्या माध्यमातून त्यांचे आशीर्वाद सोबत राहतील याची खात्री वाटते.

कलेचा ध्यास बाळगताना तुमच्यातील शिल्पकार कसा घडला?
– आमच्या घरात कलेबाबत पराकोटीचा जिव्हाळा होता. माझ्या आजोबांना शिल्पकलेची, मूर्तिकलेची खूप आवड होती. ते गावाच्या मंदिरातील मूर्ती साकारायचे. विणकाम करायचे. त्यांनी तयार केलेल्या एका वस्त्राचं ब्रिटिश कलेक्टरकडून खूप काwतुक झालं होतं. कोणत्याही मशिनरीशिवाय एवढी बारीक कलापुसर कशी करता येते याबद्दल त्यांना खूपच आश्चर्य वाटलं व त्याबाबत त्यांना दोन चांदीचे रांजण भेट दिले. ही गोष्ट त्याकाळी खूप मोठी होती. आजोबांच्या या कलेला खूप दाद मिळाली आणि माझ्या बाबांनीही हाच कित्ता गिरवला. ते स्वतः कलाशिक्षक होते. आपल्या मुलांनीही याच क्षेत्रात यावं असं त्यांना वाटत होतं आणि त्यानुसारच शालेय शिक्षणाबरोबरच कलाशिक्षणाकडेही जास्त लक्ष दिलं गेलं. घरातलं वातावरण कलेशी संबंधित असल्याने याबाबत वेगवेगळे प्रयोग केले जात असत. यातच विशेष प्रावीण्य मिळवत जे.जे. मधून शिल्पकलेचं शिक्षण घेतलं. त्यानंतर काही काळ चित्रपट क्षेत्रातही काम केलं, पण तिथे मन रुळेना. आपला कलेचा वारसा आपण जपला पाहिजे, कलेची सेवा केली पाहिजे असं सतत वाटायचं. कला आत्मिक समाधानासाठीच असायला हवी हा विचार करत मी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आणि नगरमध्ये स्थिरावलो. या निर्णयाचं अनेकांना अप्रूप वाटलं. पण केवळ पैसा हे कलेचं ध्येय असूच शकत नाही हे मला उमगलं होतं आणि म्हणूनच स्वतःला घडवण्यासाठीचा हा निर्णय होता.

नगरमध्ये शिल्पकलेबाबत आस्था निर्माण व्हावी यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न केले?
– जे समाजाकडून मिळालं आहे ते समाजाला दिलं पाहिजे ही गोष्ट मनात कायम ठेवत कलेच्या माध्यमातून आपण काय देऊ शकतो यासाठी मी प्रयत्न करतो. नगरमध्ये पुन्हा जाण्याचं प्रयोजन या कलेची आसक्ती हेच होतं. मुलांना या कलांची ओढ लागावी यासाठी असे अनेक प्रयोग केले. सध्या नगरमधून शिल्पकलेत अनेक मुलांनी नाव मिळवलं आहे. याचं खूप समाधान वाटतं. नगरमध्ये कामाची सुरुवात केल्यानंतर नगरची ओळख तयार व्हावी यासाठी प्रयत्न केले. यासाठी नेमपं काय करता येईल याचा विचार करताना महावीर कलादालनाच्या भिंतीवर सांस्पृतिक, सामाजिक एकता दर्शवणारं काहीतरी करावं असं सुचलं आणि ७२ दिवसांच्या प्रयत्नांतून पेन्सिल ड्रॉइंग असणारी भिंत साकारली.

‘नन्ही दुनिया’ या प्रकल्पाबाबत अब्दुल कलामांसोबत तुमची खास आठवण आहे. त्याबाबत सांगा ना…
आपलं काम हीच आपली खरी ओळख ठरते याचा प्रत्यय अनेक कामांनी दिला. ‘नन्ही दुनिया’ या प्रोजेक्टसाठी दिवंगत राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची दाद मिळाली. नन्ही दुनियासाठी मी प्राण्यांची शिल्पं बनवली. त्याचं उद्घाटन अब्दुल कलाम यांनी केलं. या उद्घाटनाच्या वेळचा अनुभव फारच वेगळा होता. या कार्यक्रमात काही कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने मला टीमबरोबर राहता आलं नाही. संपूर्ण टीम कलामांसोबत असताना सुरक्षेच्या कारणास्तव मला पत्रकारांच्या कक्षात बसवलं गेलं. मात्र कलाम हे प्रोजेक्ट पाहून भारावून गेले आणि त्यांनी माझ्याबद्दल विचारणा केली. त्यानंतर पुढील कितीतरी वेळ ते माझ्या कामाबद्दल बोलत होते. प्रत्यक्ष राष्ट्रपतींकडून होणारं ते कौतुक पाहून मी भारावून गेलो होतो.

आपल्याकडे कलासाक्षरतेचा अभाव दिसून येतो. याबाबत काय सांगाल?
– कलासाक्षरता हा कलेचा गाभा आहे. तो शालेय जीवनापासूनच रुजला पाहिजे, परंतु या गाभ्याकडेच दुर्लक्ष होताना दिसते. कलेचे मूलभूत संस्कार करण्यात आपलं शिक्षण कमी पडत आहे. कलेचे योग्य संस्कार होत ती आपल्यात रुजावी यासाठी प्रयत्न करणं म्हणजे कलासाक्षरता. मात्र याबाबत आपल्याकडे खूप अज्ञान दिसून येतं. कला म्हणजे अभिव्यक्तीचं माध्यम. कलासक्त असणं हे तुमच्या संवेदनशीलतेचं प्रतीकच आहे, परंतु या संवेदना एक जाणकार रसिक म्हणूनही तितक्याच जपल्या गेल्या पाहिजेत. दुर्दैवाने कलाकाराची सृजनशीलता जपण्याचा प्रयत्न आपल्याकडे होताना दिसत नाही?

तुम्हाला नुकतंच एका मोठय़ा अपघाताला सामोरं जावं लागलं. त्यादृष्टीने कलासंपत्ती एखाद्या आपत्तीत गमावल्यानंतर त्यासाठी नुकसानभरपाईसाठी कोणत्या तरतुदीचे आपल्याकडे प्रयोजन आहे?
– आपल्याकडे कलाकाराला कोणतंच संरक्षण मिळत नाही. याचा अनुभव माझ्यासह अनेकांना आला आहे. मुळात कलासंपत्तीचा विमा हा प्रकारच आपल्याकडे नाही. अशा कोणत्याही तरतुदी वा योजना कलाकारांसाठी नाहीत. परदेशात एखाद्या गायकाच्या गळ्याचा, त्याच्या हाताचा, त्याच्या खेळाच्या व कलेच्या सामग्रीचा विमा उतरवणं असणं ही संकल्पना आहे. खरं तर आमच्याकडे असणाऱया मोल्ड, डायसारख्या गोष्टींचा विमा उतरवणं अतिशय खर्चिक असतं. गेल्या महिन्यातील अपघातात माझी अनेक शिल्पं, मूर्ती, मोल्ड, मास्टरपीस, ऑण्टिक पॅलेंडर, अनेक पुरस्कार, चित्रं भस्मसात झाली. हे नुकसान भरून न येणारं आहे.

भविष्यातील योजना काय आहेत?
– आगीच्या अपघातानंतर आता सावरत आहे. भविष्यात काही मोठे प्रकल्प पूर्णत्वाला न्यायचे आहेत. नगरला म्युझियम सिटी आणि कला सिटी ही ओळख मिळावी याकरता प्रयत्नात आहे. याकरता ११ वेगवेगळी म्युझियम बनवत आहोत. २०२२ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने एक संकल्पना साकारायची आहे. ‘वॉल ऑफ युनिटी’ या नावाचा देशातील प्रत्येक राज्याची ऐतिहासिक, सामाजिक, सांस्पृतिक ओळख दर्शवणारा हा प्रकल्प असेल. हा भव्य प्रकल्प हे माझं स्वप्न आहे.