
कोरोनानंतर यंदा प्रथमच दहावी-बारावीच्या परीक्षा पूर्ण अभ्यासक्रमावर घेण्यात येणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना वाढीव वेळेची सुविधा मिळणार नाही. परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लिखाणाचा सराव करण्याचा सल्ला शाळांमधून दिला जातोय तसेच प्रीलियम परीक्षेत गुण कशात कमी झाले आहेत हे तपासून त्यानुसार बोर्डाच्या परीक्षेची तयारी करण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना दिल्या जात आहेत. अंतर्गत गुण आणि ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाच्या प्रश्नांमुळे पासिंगपुरते गुण मिळविणे सोपे असले तरी स्कोअरिंगचे काय… असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. या यापार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी केलेली बातचित…
बोर्डाच्या परीक्षांना सामोरे जाण्यास विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल…
बोर्डाची परीक्षा शाळास्तरावर होणाऱ्या प्रीलियम परीक्षेपेक्षा खूपच सोपी आहे. विद्यार्थ्यांनी विनाकारण घाबरून जाऊ नये. दहावीच्या विद्यार्थ्यांनी नववीची आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी अकरावीची परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार दिली आहे. परीक्षेत पासिंग आणि स्कोअरिंग दोन्हीही कठीण नाही. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षांमधील अंतर्गत गुण मिळविणे सोपे आहे. तसेच लेखी परीक्षेतही पर्यायी प्रश्न असून गुण मिळविणे अवघड गोष्ट नाही. विद्यार्थ्यांना शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधून मिळणाऱ्या छापील वेळापत्रकानुसार परीक्षेला सामोरे जावे. परीक्षा काळात कोणतेही दडपण आल्यास पालकांशी तसेच बोर्डाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधून दडपण, नकारात्मक विचारांवर मात करावी.
कॉपी रोखण्यासाठी लोकांकडून नवनवीन कल्पना मागविण्याचे प्रयोजन काय…
दगवर्षी राज्यात सुमारे 30 लाख विद्यार्थी दहावी- बारावीच्या परीक्षांना बसतात. कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन, भरारी पथके तसेच अन्य मार्गांचा अवलंब केला जातो. मात्र परिक्षेतील कॉपी पूर्णपणे रोखणे शक्य झालेले नाही. त्यामुळे आम्ही लोकांनाच आव्हान केले आहे की कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी काय उपाययोजना यातील कमी खर्चिक आणि कमी मनुष्यबळ लागणाऱ्या उपाययोजनांचा आम्ही नक्कीच विचार करू. बोर्डाच्या परीक्षा या पारदर्शकपणे पार पाडणे हाच आमचा हेतू आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रश्नपत्रिका परीक्षेच्या आधी सोशल मीडियावर व्हायरल होण्याचे प्रमाणही वाढले आहे. विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवावे की त्यांना सकाळ सत्रातील परीक्षेसाठी सकाळी 10.30 नंतर व दुपार सत्रातील परीक्षेसाठी 2.30 वाजल्यानंतर परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे दहावी- बारावी परीक्षा रद्द होतील अशी चर्चा आहे
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कुठेही भविष्यात दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द होणार आहेत, असे म्हटलेले नाही. केंद्राने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा जाहीर केला आहे. त्यानुसार राज्य स्तरावर त्याची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू आहे. बोर्डाच्या परीक्षांचे स्वरूप बदलण्याचा प्रस्ताव आहे. या परीक्षा अधिकाधिक विद्यार्थीस्नेही करण्यावर भर दिला जाणार आहे. राज्य सरकार याविषयीचे धोरण निश्चित करेल. या धोरणनिश्चितीनंतरही विद्यार्थ्यांना दहावी-बारावीची परीक्षा द्यावीच लागणार आहे.