शालेय स्तरापासून क्रीडा संस्कृती रुजायला हवी, शारीरिक शिक्षण शिक्षिका नीता जाधव यांची इच्छा

218

महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे क्रीडाक्षेत्राकडे विशेष लक्ष असते. महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घ्यावी यासाठी त्यांच्याकडून सातत्याने मार्गदर्शन करण्यात येते. शालेय स्तरापासूनच क्रीडा संस्कृती रुजायला हवी. यासाठी पावले उचलण्यात येत आहेत, अशी माहिती घाटकोपर येथील पंतनगर, इंग्रजी माध्यम महानगरपालिका शाळेच्या शारीरिक शिक्षण शिक्षिका नीता जाधव यांनी दैनिक ‘सामना’शी संवाद साधताना दिली.

विद्यार्थ्यांचे हदय व फुफ्फुस सुदृढ होण्यासाठी विशेष मेहनत
कोरोनाच्या काळात शालेय विद्यार्थ्यांचे हदय व फुफ्फुस सुदृढ होण्यासाठी विशेष मेहनत घेण्यात येत आहे. यामध्ये अनुलोम विलोम, बसत्रिका, कपालभाती या प्राणायामांचा समावेश आहे. शारीरिक सुदृढतेसाठी विविध योगासने शिकवण्यात येत आहेत. तसेच कोरोनाबद्दलच्या जागरुकतेबाबत वारंवार सांगण्यात येते. सातत्याने हात धुणे, मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, काय खावे आणि काय खाऊ नये, याबाबत सूचना करण्यात येतात, असे नीता जाधव यावेळी म्हणाल्या.

इतर खेळांबद्दलही माहिती
कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. गुगल मीट, टेलीग्रॅम या ऍपद्वारा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. प्राणायाम, योगासने याखेरीज इतर खेळांबद्दलही त्यांना माहिती दिली जात आहे. खेळ व त्यामधील नियम याकडे लक्ष वेधले जाते. युटय़ूबवर लाईव्ह सेशनही घेतले जात आहे, असे नीता जाधव यांनी पुढे सांगितले.

पालकांकडूनही उत्तम प्रतिसाद
कोरोनामुळे आम्हाला विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवावे लागत आहे. मात्र विद्यार्थ्यांसह पालकांकडूनही या शिक्षणाला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. शिक्षणाधिकारी महेश पालकर यांच्याकडूनही क्रीडाशी निगडीत विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे, असे नीता जाधव यांनी सांगितले.

एका वर्गासाठी आठवडाभरात चार तासिका
आता शाळेमध्ये शारीरिक शिक्षणालाही मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. जून महिन्यापासून शिक्षणाला सुरुवात होते. सर्व खेळांसाठी विशेष वर्ग घेतले जातात. सांघिक कवायत स्पर्धा तसेच वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन मोठय़ा स्तरावर केले जाते. एका वर्गासाठी आठवडाभरात चार तासिकांमध्ये आम्हाला विद्यार्थ्यांना खेळ, आरोग्य व शारीरिक शिक्षणाचे धडे द्यावे लागतात, असे नीता जाधव पुढे नमूद करतात.

आपली प्रतिक्रिया द्या