तिखट माधुर्य

448

>> शेफ विष्णू मनोहर

गायिका मधुरा दातार. विविध पदार्थ करून पाहण्याची आवड, त्यात तिखटाचा सढळ हस्ते वापर.

काही लोक स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर पुढे येतात त्याची गती थोडी कमी असते, पण जो पाया उभा राहतो तो मात्र भक्कम असतो. अशातलीच एक गोड स्वरांची देणगी लाभलेली मुलगी म्हणजे मधुरा दातार. तिला मी खूप लहानपणापासून ओळखतो. पुण्याला नागनाथ पाराजवळ त्यांचं घर आहे. घरासमोर माझे काका राहायचे. मी कांकाकडे जायचो तेव्हा हिची ओळख झाली. तेव्हा ती बालनाटय़ात वगैरे काम करायची. ‘ती फुलराणी’मधला भक्ती बर्वेचा प्रवेश तिचा हातखंडा होता. मध्ये मध्ये गाणेसुद्धा म्हणायची, पण आता तर मात्र ती गायिका म्हणून ओळखली जाते. मीपण मुळात गाण्याचा शौकीन. म्हणूनच यावेळी म्हटलं, मधुराबरोबर सुरेल गप्पा मारूया! ठरल्याप्रमाणे ती ‘रोटी-शोटी और कबाब’ या रेस्टॉरंटमध्ये आली. बाहेर पाऊस पडत होता आणि मग अशा वेळी काय खावं हा विचार माझ्या मनात असतानाच मधुराने सांगितले, मी बार्बेक्यूचे तीन-चार पदार्थ मागवले आहेत. त्यावरून मी तिला विचारले, ‘‘तुला भाज्या कुठल्या आवडतात?’’, तर तिने मनमोकळेपणाने कबूल केलं की, भाज्या सोडून बाकी सटरफटरच जास्त आवडतं. त्यामध्ये अख्खा मसूर, बटाटय़ांच्या काचऱयाची भाजी, तुम्ही केलेली वेफर्सची भाजी, त्याबरोबर दहीवडा, दक्षिण हिंदुस्थानी पदार्थ, बटाटेवडा, पाव-भाजी, पनीरपासून तयार केलेले काही पदार्थ मनापासून आवडतात. गोडपासून मात्र थोडी लांब, पुरणपोळी, आम्रखंड, गुलाबजाम आवडतात.

तिला म्हटलं, ‘‘ज्या माणसाला वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात अशी व्यक्ती उत्तम शेफ असते, तर तुझ्या बाबतीत काय आहे? तुला जेवण बनवायला आवडतं का?’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘रोजचा स्वयंपाक करण्याचा मला कंटाळा येतो, पण कधीतरी छोले-भटूर, दहीवडा, चायनीज पदार्थ, उपवासाची खिचडी इत्यादी पदार्थ बनवून खिलवायला आवडतं. मला बटाटेवडे आईसारखेच जमतात. एकदा हृदयनाथ मंगेशकर घरी जेवायला आले होते त्यावेळी मी केलेले बटाटेवडे त्यांना इतके आवडले की, ते जेवले कमी व बटाटेवडे जास्त खाल्ले.

मला तिखट जेवण आवडतं. अमेरिकेत शोसाठी गेलो असताना आम्ही ज्यांच्याकडे राहत होतो ते मुद्दाम माझ्यासाठी तिखट, चमचमीत स्वयंपाक करायचे आणि काही दिवसांनंतर त्यांनासुद्धा अशा जेवणाची सवय लागली. त्यानंतर ते हिंदुस्थानात आले असताना आमच्या घरी जेवायला आले व मला म्हणाले, ‘‘तुझ्याच स्टाईलने स्वयंपाक कर.’’ मी खूश झाले आणि अगदी मन लावून तिखटचा सढळहस्ते वापर करत स्वयंपाक केला. थोडा वेळ तर ते छान छान म्हणत होते, पण नंतर हळूहळू त्यांच्या लक्षात प्रकरण गंभीर आहे आणि नंतर त्यांनी तिखटाने झालेली आग कमी होण्यासाठी लिंबू, ताक, साखर, गोड असा सपाटा लावला.घरात आई आणि आजी दोघेही सुगरण. त्यामुळे आमच्या घरी खाण्याची चंगळ असते. दोघींनाही करून खाऊ घालण्याची आवड. त्यामुळे शुक्रवार, शनिवार आणि रविवार आमच्याकडे जणू खाद्य महोत्सव असतो. जास्तकरून पंजाबी, महाराष्ट्रीयन आणि साऊथ इंडियन हेच पदार्थ जास्त करतात. आईच्या हातचा रगडा पॅटिस, छोले-भटुरे जगातल्या कुठल्याही चांगल्या रेस्टॉरंट व हॉटेलमध्ये मिळणार नाही असे मधुरा अभिमानाने सांगते. मुळातच खाण्याची आवड असल्यामुळे काय बोलू आणि काय नको अशी तिची अवस्था झाली होती, पण शेवटी आवरतं घ्यायला लागलं आणि तिच्या गोड गाण्याने सांगता झाली.

भटुरे

साहित्य – 3 वाटय़ा मैदा , अर्धी वाटी रवा , अर्धा चमचा मीठ , 1 चमचा यीस्ट, अर्धी वाटी दही, 2 चमचे तेल
कृती – 3 वाटय़ा मैद्यात अर्धी वाटी रवा, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा फुलवलेले यीस्ट, अर्धी वाटी दही, 2 चमचे तेल घालून थोडे गरम पाणी घेऊन मैदा भिजवा. थोडा वेळ मुरत ठेवून परत एकदा तेलाचा हाताने मळून घ्या. नंतर याचे गोळे तयार करून 10-15 मिनिटे झाकूण ठेवा. हातावरच पसरवून गरम तेलात किंवा तुपात तळून घ्या. छोले भटुऱयांसोबत तळलेले मिरची, कांदा, लोणचं किंवा चिंचेची चटणी सर्व्ह करा.

हेल्दी पावभाजी

साहित्य – मोड आलेले मूग, मटकी, 2 वाटय़ा मटार, 1 नग उकडलेला बटाटा , 1 नग टोमॅटो, 1 चमचा आलं, 1 चमचा लसूण , 1-1 चमचा धने-जिरे पावडर, 1 नग लिंबू , हळद, तिखट, मीठ चवीनुसार, पाव वाटी कोथिंबीर, 1 चमचा कसुरी मेथी .
कृती – सर्वप्रथम मोड आलेले मूग, मटकी, मटार वाफवून घेणे. नंतर तव्यावर पावभाजाच्या स्मॅशरने स्मॅश करून शिजवून घ्या. असे करता करता त्यात थोडे टोमॅटो व उकडलेला बटाटा घालून मिश्रण एकत्र करून घेणे. दुसऱया एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घेऊन त्यात आलं, लसूण पेस्ट, तिखट, कसुरी मेथी, धने-जिरे पावडर व लिंबू घालून परतावे. नंतर तयार केलेले मिश्रण घालून चवीनुसार टाकावे. कोथिंबीर व बटर घालून पालकाच्या पावांबरोबर सर्व्ह करा.

तवा पुलाव

साहित्य – 2 वाटय़ा तांदूळ, अर्धा गाजर, अर्धी वाटी मटारदाणे, 7-8 फरसबीच्या शेंगा, 7-8 काजू, 3 लवंगा, 1 इंच दालचिनी, 2 वेलदोडे (ठेचून घ्यावे), मीठ, 1 लिंबू, 1 चमचा मोहरी, 3 चमचे साजूक तूप
कृती – गाजर, फरसबी बारीक चिरून ठेवावी. मटार सोलावेत. तांदळाचा मोकळा साधा भात करून घ्यावा. गाजर, फरसबी व मटार पाण्यात चिमूटर सोडा घालून शिजवाव्या म्हणजे रंग छान राहील. भाज्या शिजल्या की चाळणीवर निथळाव्या. भात उपसून ठेवावा. मोठय़ा पातेल्यात तुपाची फोडणी करून त्यात मोहरी, लवंग, वेलची, दालचिनी व काजू घालून 1-2 मिनिटे परतावे. भाज्या घालून परतावे. मीठ घालावे. लिंबाचा रस व भात घालून चांगले मिसळावे व खाली उतरावे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या