मुलाखत – चित्रकला… पाककला आणि मी!

>> सुभाष अवचट (ज्येष्ठ चित्रकार, लेखक)

या कोरोना काळात पाककलेच्या माध्यमातून मला अनेक गरजूंना मदत करता आली.

माझ्याकडे सक्तीची सुट्टी कधीही आयुष्याaत नव्हती. कारण मी आयुष्यभर सुट्टीमध्येच असतो. कोरोना आता आलाय. माझ्या वैयक्तिक आयुष्यात म्हणा किंवा सक्तीच्या सुट्टीत म्हणा चित्रकार असतील, संगीतकार असतील आम्ही याच पिरीयडमध्ये कामं करतो. काम काय केलंत म्हणायचं तर काही नाही. साधारणतः मी कधीही मिडियम वापरलं नव्हतं अशी 50-60 वॉटर कलर्स चित्र तयार केली. ज्यात कुठलाही सब्जेक्ट नव्हता. म्हणजे कोरोना वगैरे… तो माझ्यासाठी चांगला वेळ होता.

पाककला येऊ लागली
या काळात दोन गोष्टी आणखी शिकलो. तसा मी आयुष्यभर एकांतवासातच आहे. माझे अनेक मित्र येतात, जातात वगैरे. तरीही मी एक नवीन प्रकार शिकलो की, दुसऱयांच्या मित्रांच्या घरात जाऊन तिथे काहीतरी पदार्थ बनवणे, शेजाऱयापाजाऱयांना मी मदत केली, कारण मला जेवण बनवायला आवडतं. जे काही उपलब्ध असेल त्यामध्ये मी कुकिंग केलं. म्हणजे मी एकटय़ाने नाही खाल्लं. तर मी सगळ्यांना ते खाऊ घातलं. चित्रकला ही जशी मोठी कला आहे, तशीच कुकिंग हीसुद्धा एक मोठी कलाच असते. राजकारण हीदेखील एक मोठी कलाच असते. माझ्यासारखा एक सामान्य चित्रकार… मी कुकिंग काय करणार? कोशिंबीर कशी करायची तर जे काही उपलब्ध असेल… दही उपलब्ध नव्हतं. मग काकडीची कोशिंबीर कशी करू? तिला पाणी कसं सुटेल? मग त्यावर प्रयोग करून वेगळी कोशिंबीर केली होती आणि मी ती सगळ्या मित्रांना पाठवली. शेंगदाणे हा फार प्रमुख घटक आहे माझ्या आयुष्यातला. भाजणे, भिजवणे, उकडणे, शिवाय त्या काळात प्रोटिन्सची गरज होती. जे काही दाणे मिळायचे ते उकडून दाण्यांची चटणी बनवली होती. ती मला लहानपणापासून खूप आवडते. त्यावर वेगवेगळे प्रयोग करायचे. लॉकडाऊनमध्ये माणुसकी पाहायला मिळाली. एकमेकांना सहाय्य करून गरजू लहान मुलांना सॅण्डविचेस करून दिली. या काळात कुकिंगचे बरेच प्रकार केले. मी साहित्य सहवासमध्ये राहतो. जे कोण असतील त्यांना मदत केली. माझ्या घरी काम करणाऱया असतील, होत्या त्यांच्या लहान मुलांचे शिक्षण आम्ही केले. त्यातल्या एकीचा मुलगा डॉक्टर झाला. त्यामुळे इतरांना शक्य तेवढी मी मदत केलेली आहे.

‘साहित्य सहवास’ची मजा
आश्चर्य वाटेल, मी टीव्ही अजिबात बघत नाही. माझ्याकडे मोबाईल आहे. त्यावर माझे मित्र मला फोन करून माझ्या संपर्कात राहतात. खरंतर मार्च, एप्रिलचा एक काळ तसा होता जेव्हा वातावरण फार गंभीर होतं, सगळे लोक कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली जगत होते, पण त्याची भीती कधीच वाटली नाही. मी या काळातही जसे आधी काम करत होतो तसेच त्या काळातही काम केले. साहित्य सहवास ही माझी छान सोसायटी आहे. या काळात बाहेर पडता येत नसले तरी आमच्या सोसायटीत चालायला जायचो, गच्चीवर जायचो. जिने उतरायचे, चढायचो. कारण शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम हा पाहिजेच ना… दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की, मला या काळात कधीच एकटेपणा जाणवला नाही. कारण एकटय़ा माणसांना आपण काय करायचं हा प्रश्न पडतो. माझे तसे नाही ना… मी आयुष्यभर सकाळी उठतो, व्यायाम करतो आणि माझी चित्रे माझे सोबती असतात, तसेच माझे लेखनही आहे. त्यामुळे माझ्यावर या काळात काहीही फरक पडला नाही. उलट मी प्रचंड लिखाण केलं. त्या काळात मी 60-70 सुंदर चित्रे काढली आहेत. तीही सकारात्मक विषयावर. या सगळ्यात आतापर्यंत सहा महिन्यांचा काळ कसा गेला ते मला कळलंही नाही.

मित्रांकडून मदत
माझ्या मते आयुष्यात चढउतार हे येतच असतात. हे जीवन असते. या जीवनात अशा अनेक कठीण प्रसंगातून मी गेलो आहे. लहानपणापासून… भूकंप झाले, अत्यंत पूर आले, पण जग कधीच थांबत नसते. आपण सामान्य माणसं आहोत. आपण तेच करतो. माझ्या घरात कुणी कुक नाही. या काळात आम्ही भांडी घासली. आम्ही सगळ्या मित्रांनी एकमेकांना मदत केली. म्हणजे येथे मी एकटा राहतो. माझी मुलं परदेशात राहतात. मला कलानगर वगैरे सगळीकडून चपात्या यायच्या. कधी भाजी यायची. भारती आचरेकर वगैरे अनेकांकडून मला ‘काय चाललंय’ वगैरे विचारपूस व्हायची. एक काळ येतो, जेव्हा खरं कळतं की आपले खरे मित्र कोण आहेत? आपल्यासाठी सगळे मित्र एकत्र येतात. तुम्हाला मदत करतात. यापेक्षा वेगळं सुख ते काय असतं. यातून मी सगळं सकारात्मकपणे घेतलं. कारण अशा अनेक प्रसंगांतून मी गेलेलो आहे. पुण्याचा पूर असेल, माझे घर उद्ध्वस्त झाले होते. भूकंप झाले होते तेव्हा लहानपणी… आणि अनेक वैचारिक गोष्टींमध्येही आपण नाही का बरेचदा डिस्टर्ब होतो. मी रस्त्यावर काम करणारा माणूस असल्यामुळे मला एक गोष्ट छान वाटली की अनेक मित्र आणखी जोडले गेले. ही मुंबई आहे आपली… इतक्या मित्रांनी छान मदत केली… कुठून कुठून पह्न, तेही अनोळखी माणसांचे. सरदारजी असतील, मुस्लिम असतील… काही प्रॉब्लेम आहे का? पाणी पाठवू का? मुंबई ही कमाल आहे…

चित्रकला आणि पाच पुस्तकं
कोरोनाने मला आत्मविश्वास दिला. जगायचं कसं? प्रचंड आत्मविश्वास आणि दुसरं म्हणजे दुसऱयांना मदत कशी करायची? मला कोरोनाची कधीच भीती वाटली नाही. अशी अनेक संकटे येतात आणि जातात. त्यामुळे यात माणसं, जमाती, जातपात काहीही येत नाही. तुम्ही एकत्र येता. चित्रकार म्हणून माझ्यात खूप फरक पडला. मला कळलं की हे संकट काय आहे. त्यामुळे माझे यापुढचे चित्रप्रदर्शन खूपच वेगळे असेल. कारण कोरोनामुळे लाखो माणसं बेघर झालीयेत. माझे कितीतरी जवळचे लोक वारले. आजोबा, आज्या किती गेल्यात… त्यामुळे मला एक वेगळी दृष्टी मिळाली की, जीवन हे किती क्षणभंगूर असतं. तुम्ही स्वतःला काय समजता… निसर्गापुढे कोणाचे काही चालत नाही. निसर्गच सर्वश्रेष्ठ आहे हे मी शिकलो. सध्या मी चित्रकलाच करतोय, बाकी काहीही करत नाहीय. शिवाय येत्या जानेवारीत माझी पाच पुस्तकं येताहेत.

आपली प्रतिक्रिया द्या