‘अविनाशी’ कार्य!

741

>> ज्योत्स्ना गाडगीळ

‘टॉयलेट’ ह्या अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच फेसबुकवर झळकला. प्रेमकथेतून एका सामाजिक प्रश्नाला हात घालणारा हा चित्रपट असल्याचे बघता क्षणी लक्षात आले. पण, कोणत्याही वैयक्तिक स्वार्थाशिवाय खेडोपाडी शौचायल, पाणी टंचाई, रोजगार, स्वच्छता अशा अनेक समस्यांवर उतारा ठरलेल्या एका रिअल हिरोला प्रत्यक्ष भेटण्याची, ऐकण्याची संधी मिळाली. जातीवंत समाजसेवक नसलेले, पण स्वत:चा दातांचा दवाखाना सांभाळून समाजसेवेत उतरलेले डॉ. अविनाश पोळ ह्यांना आपण दर रविवारी आमिर खानच्या ‘वॉटर कप- तुफान आलंया’ ह्या कार्यक्रमात उत्स्फुर्तपणे बोलताना बघतो. नुकताच त्यांना `युआरएल’ फाऊंडेशनचा सामाजिक गौरव पुरस्कार मिळाला आहे.

मूळचे साताऱ्याचे असलेले डॉ. अविनाश पोळ आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर शहराकडे न वळता साताऱ्याजवळील `बेबलेवाडी’ ह्या गावात गेले. अस्वच्छता आणि गटातटाचे राजकारण अशी त्या गावाची ओळख होती. ह्या गोष्टीची पूर्वकल्पना असूनही त्यांनी बेबलेवाडीत आपले बस्तान मांडले. सामाजिक कार्याची पाश्र्वभूमी नसतानाही डॉ. अविनाश ह्यांना समाजसेवेची प्रेरणा मिळाली, ती हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार ह्यांच्या भाषणातून. त्यांचे कार्य पाहून भारावलेल्या डॉ. अविनाश ह्यांनी शहरात जाऊन प्रॅक्टीस न करता, गावात दवाखाना टाकायचा आणि गावाचा विकास करायचा असा निश्चय केला. ह्या निर्णयातूनच त्यांनी बेबलेवाडी गाव दत्तक घेतले. दातांचा छोटासा दवाखाना टाकला. सुरुवातीला लोक नुसते दवाखान्यात डोकावून जात. हळू हळू तोंडओळख झाल्यावर गावकऱ्यांनी मला `दात दाखवायला’ सुरुवात केली असे डॉ. अविनाश मिश्किलपणे सांगतात.

 डॉ. अविनाश पोळ
डॉ. अविनाश पोळ

वैद्यकीय सेवा ही जरी मानवसेवा असली, तरी त्यातून सामाजिक समस्या सोडवण्याकडे डॉ. अविनाश ह्यांना मार्ग कसा मिळाला, ह्याचा रोचक किस्सा त्यांच्याकडूनच ऐकावा. तो किस्सा ते अतिशय गमतीने खुलवून सांगतात, `बेबलेवाडी’त दवाखाना टाकल्यावर सुरुवातीच्या दिवसांत रुग्ण येत नसल्याने बराच मोकळा वेळ असायचा. त्या वेळेच गावात फेरफटका मारत असताना गावातले रस्ते नीट नसल्याचे लक्षात आले. ते चांगले करून घ्यायचे, तर किती खर्च येईल, ह्याचा एका जाणकाराकडून अंदाज घेतला. खर्च लाखांच्या घरात जाईल, हे ऐकून आवाक्याबाहेरचा `तो’ प्रश्न सोडून दिला. त्यानंतर दुसरी समस्या जाणवली, ती शौचालयांची! गावातल्या माता-भगिनी संध्याकाळ होण्याची वाट बघायच्या. `त्या’ वाटेवरून कोणी पुरुष माणूस जात असला, की त्यांच्या उठाबशा सुरू होत. त्यांनी जेवढ्या उठाबशा काढल्या, तेवढ्या कोणी पेहलवानानेही काढल्या नसतील! रोगांचे मूळ असलेली ही समस्या समूळ नष्ट केली पाहिजे, म्हणून मी गावात शौचालय बांधायचे ठरवले.

`ही कल्पना थेट गावकऱ्यांसमोर मांडली असती, तर त्यांना मी नक्कीच `पेडगावचा शहाणा’ वाटलो असतो. म्हणून माझ्या व्यवसायातून माणसे जोडून ह्या समस्येवर तोडगा काढायचा असा निश्चय केला. अनेक नतद्रष्ट माणसांनी मोडता घालण्याचा प्रयत्न केला, पण तिथल्या गावकऱ्यांचे, पदाधिकाऱ्यांचे, नेत्यांचे, पोलिसांचे आणि अगदी न्यायाधिशांचे `दात माझ्या हातात’ होते, त्यामुळे `त्या’ मंडळींचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समाचार घेता आला. तरुणांना हाताशी धरून कामाला सुरुवात केली. एक बाहेरचा माणूस येऊन आपल्या गावात स्वच्छतेसाठी पुढाकार घेतो, ही आत्मीयता वाटू लागल्यावर अनेक गावकरी पुढे सरसावले आणि त्यांच्या मदतीने माझ्या समाजसेवेला सुरुवात झाली.’

गावातील पडकी घरांची जागा, दारे, खिडक्या ह्यांचा वापर करून गावकऱ्यांच्या मदतीने निरुपयोगी जागेत खड्डे खणून, गावच्या नेत्यांकडून त्या जागेवर नारळ वाढवून त्यांनी भूमिपूजन करून घेतले. ह्या कार्याला वरिष्ठांचे हातभार लागल्याने विरोधकांचे विरोध मावळले आणि कामाला गती येऊ लागली.

गावातील मुख्य वस्त्यांवरील सांडपाण्यावर त्यांनी भाजीपाल्याची बाग फुलवली. गावात ओढ्याच्या पात्रावर श्रमदानातून पूल उभा केला. शिवाय प्रत्येक स्वच्छ व टुमदार घराच्या दारावर त्या घरातील पुरुषाबरोबर गृहलक्ष्मीचेही नाव झळकले. गावात प्रथमोपचाराच्या पेट्या उपलब्ध झाल्या. लग्नाआधी तरुणांची एचआयव्ही चाचणी होऊ लागली. गावातले तरुण नोकऱ्या शोधत शहराकडे जाण्याऐवजी गावातच स्वयंरोजगाराकडे वळले. या सुधारणांचे वारे पाहून अनेक मुंबईकरही पुन्हा गावाकडे आले. ज्या गावात गटातटाचे राजकारण होते, त्या गावात प्रचंड बदल झाला. या गावाकडे जे लोक कुत्सितपणे पाहात होते, ते लोक आता आदराने पाहू लागले. गावातील तरुण शेतीत नवे प्रयोग करू लागले. अगदी फुलशेतीही करू लागले. या गावाला शासनाचे ग्रामस्वच्छता, निर्मलग्राम असे पुरस्कार मिळाले. बेबलेवाडीचे रुपडे पालटल्यावर डॉ. अविनाश ह्यांनी शिवथर, आसगाव, धावडशी, अतीत, धामणेर अशा गावांत विविध स्वरूपाचे ग्रामस्वच्छतेचे उपक्रम राबवले आणि ही गावेही निर्मल केली.

water-cup

`स्वातंत्र्याचा इतिहास लिहिताना जसा टिळक, आगरकरांचा उल्लेख होतो, तसा शौचालयांचा इतिहास लिहिताना आपल्या नावांचा उल्लेख होईल’ असे गमतीने सांगत ह्या कामापासून परावृत्त होणाऱ्या  तरुणांना डॉ. अविनाश पुन्हा पुन्हा प्रोत्साहित करत असत. एका गावात एक शौचालय बांधत असताना असंख्य अडचणी पार करून त्यांनी ४२ शौचालये बांधली. पुढे पुढे तर आपल्याला `हागणदारीचा नेता’ अशी ओळख मिळाली, असे वर्णन करत डॉ. अविनाश मार्मिक शब्दांत वस्तुस्थिती मांडतात.

त्यांच्या कार्याची दखल घेत २००५मध्ये त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला. तेव्हा तत्कालीन राष्ट्रपती डॉ.एपीजे. अब्दुल कलाम डॉ. अविनाश ह्यांना म्हणाले, `दात साफ करते करते आप गाँव कबसे साफ करने लगे? अच्छा काम कर रहे है, आगे भी शुरू रखिये।’ राष्ट्रपतींचे शब्द आपल्याला लढण्यासाठी बळ देऊन गेले, असे ते सांगतात.

डॉ. अविनाश ह्यांची १५-१६ वर्षांपासून सुरू असलेली ग्रामविकासाची चळवळ आता जिल्ह्याबाहेर गेली असून, राज्यातल्या अनेक गावांत त्यांच्या मार्गदर्शनाने कामे उभी राहू लागली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्‍यातील किनगावात त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाणलोटाचे मोठे काम उभे राहिले आहे. ग्रामस्थांनी गावामधून वाहणाऱ्या टिटवी नदीचे पात्र दहा फूट खोल व एक हजार मीटर लांब खोदून त्यावर मोठा बंधारा उभा केला आहे. लोकवर्गणी व ग्रामस्थांच्या श्रमदानातून बंधाऱ्यात कोट्यवधी लिटरचा पाणीसाठा झाला आहेच; शिवाय उन्हाळ्यात कोरड्या पडणाऱ्या परिसरातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्‍यातील जतपूरा-हिंगणवाडी हे पूर्णपणे दारिद्र रेषेखाली असणारे गावही आता निर्मलग्राम होत आहे. राज्यातल्या अनेक गावांत त्यांंच्या मार्गदर्शनाखाली कामे सुरू आहेत. ज्या ठिकाणी ते पोहोचू शकत नाहीत, तेथे मोबाईलवरून ते ग्रामसभेत सहभागी होतात. त्यांनी अनेक गावांना दिलेली विकासाची प्रेरणा व त्यासाठी आवश्‍यक असणारे पाठबळ अनेक गावांसाठी पथदर्शक ठरले आहे. ह्या परिवर्तनामुळे अनेक गावे `आदर्श’ ठरली आहेत. ती बघण्यासाठी लोक दूरदूरून येतात. प्रेरणा घेतात. त्यांच्या येण्यामुळे गावांची पर्यटनस्थळे झाली आहेत.

ह्या सर्व प्रश्नांवर काम करत असताना डॉ. अविनाश ह्यांनी पाणी प्रश्नावर काम करण्यास सुरुवात केली. ते सांगतात, `आपले सगळे अर्थकारण पाण्यावर अवलंबून आहे. पाण्यावर काम करताना पैसे ही अडचण नाहीये, तर गावामध्ये लोकांची या विषयाबद्दलची आस्था कमी आहे आणि माहितीचाही अभाव आहे. कमी खर्चात आपण पाणी अडवू शकतो, जिरवू शकतो, पण कसे हे त्यांना माहित नाही. साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर आम्ही ४० जणांची टीम नेमून ३६५ दिवस नेमाने काम करून `जलयुक्त आवार’ मोहिम राबवली. प्रसार माध्यमांतून गावागावांमध्ये त्या प्रकल्पाची माहिती दिली. `सत्यमेव जयते’ कार्यक्रमाच्या टीमने महाराष्ट्र दौरा करत असताना अजिंक्यताऱ्याचे वॉटर मॉडेल पाहिले. त्यांचे प्रमुख सत्यजित भटकळ ह्यांना पाणी प्रश्नावर तिथे तोडगा सापडल्याचे सांगितले आणि आमीर खानशी भेट घालून दिली. मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन `वॉटर कप’ ह्या राज्यव्यापी जलसंवर्धन प्रकल्पाची सुरुवात केली. ह्या कार्यात यंत्रांच्या आधी माणसे जोडली गेली आणि माणसांच्या पाठोपाठ यंत्रेही जोडली गेली आणि `जलचक्र’ वेग घेऊ लागले.’

पाणी फाऊंडेशनने जलयंत्रणा कार्यरत करण्यासाठी पैशांचा पुरवठा न करता ज्ञानाचा पुरवठा करावा, असे डॉ. अविनाश ह्यांनी सुचवले होते. साध्या सोप्या गोष्टी अंमलात आणून पाणी फाऊंडेशनने समस्त गावकऱ्यांना ह्या प्रकल्पात सहभागी केले. त्यात महिलांचा आणि तरुणांचा विशेष सहभाग दिसू लागला.

सामाजिक प्रश्न सोडवत असताना, डॉ. अविनाश ह्यांनी आपली वैद्यकीय सेवाही अविरत सुरू ठेवली. आजवर त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. केंद्र सरकारचा `निर्मलग्राम (प्रवर्तक)’, `स्वच्छतादूत पुरस्कार (महाराष्ट्र शासन)’, `डॉ. संगमनेरकर फाउंडेशनचा शतायुषी पुरस्कार’, `रमा श्रीधर स्मृती न्यास पुरस्कार’, `अनिता अवचट संघर्ष सन्मान पुरस्कार’, `धनंजयराव गाडगीळ ग्रामीण नवनिर्माण पुरस्कार’, `राजर्षी शाहू पुरस्कार (शाहू मेमोरिअल ट्रस्ट, कोल्हापूर)’, `सातारा समाजभूषण’, `लायन्स इंटरनॅशनल, पुणे यांचा समाजसेवा पुरस्कार’ अशा अनेक पुरस्कारांमधून मिळणारी रोख रक्कम त्यांनी नेहेमीच समाकार्यासाठी दिली आहे. `युआरएल’ फाऊंडेशनतर्फे मिळालेला ५०,००० रुपयांचा धनादेशही त्यांनी पाणी फाऊंडेशनच्या नावे दिला.

`समाजकार्यासाठी वेळ नाही’, `काय करावे ते नक्की सुचत नाही’, अशी सबब सांगणाऱ्यांसाठी डॉ. अविनाश ह्यांचे `अविनाशी कार्य’ कायम स्फूर्तिदायक  ठरेल.

 

आपली प्रतिक्रिया द्या