जीतेगा भाई जीतेगा; अन् प्रेक्षकाची मैदानात धाव

स्टेडियममध्ये बॅग घेऊन जाण्यास मनाई असूनही अनेक प्रेक्षकांना याची कल्पना नसते. त्यामुळे अशा प्रेक्षकांची चांगलीच पंचाईत होते. त्यामुळे मोदी स्टेडियमच्या बाहेर बाईक नव्हे तर बॅग पार्ंकगचाही धंदा जोरात होता, पण त्या बॅगच्या पार्ंकगसाठी चक्क 200 रुपये आकारले जात होते. तसेच बाइक पार्ंकगसाठीही प्रेक्षकांना 200 रुपयांनाच लुटण्याचा धंदा अनेक स्थानिक करत होते.

गोटीलो… गोटीलोचा कहर
सध्या अवघ्या हिंदुस्थानात प्रत्येकाच्या तोंडावर असलेल्या गोटीलो… गोटीलो… गाण्याने मोदी स्टेडियमही दुमदुमले. पहिल्या डावाच्या मध्यावरच गायक आदित्य गढवीने गोटीलो गाणे सादर करताच अवघे स्टेडियम नाचायला लागले. गुजराती संगीत विश्वात नवनवे पराक्रम करणाऱया या गाण्यावर आज केवळ गुजरातीच नव्हे तर हिंदुस्थानी नाचले.

उन्हाने 90 प्रेक्षक अस्वस्थ
लाखोंच्या संख्येने प्रेक्षक आणि त्यात कडक ऊन असंख्य प्रेक्षकांना मानवले नाही. भरउन्हात सामना पाहताना प्रेक्षकांचा घामटा निघत होता. त्यातच हिंदुस्थानची फलंदाजीही जोरदार होत नसल्यामुळे काही प्रेक्षकांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांना तत्काळ वैद्यकीय उपचार देण्यात आले. हिंदुस्थान-पाकिस्तान हा सामना ऑक्टो हीटदरम्यान असल्यामुळे तेव्हा दीडशेच्या आसपास प्रेक्षकांना वैद्यकीय उपचार देण्यात आले होते, मात्र यावेळी तो आकडा 90 पर्यंतच होता.

…अन् प्रेक्षकाची मैदानात धाव
अंतिम सामना त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्यामुळे स्टेडियमच्या अवतीभवती कडेकोट बंदोबस्त होता. तरीही एक माथेफिरू प्रेक्षक चक्क सर्व सुरक्षा व्यवस्था भेदून सामना सुरू असताना विराट कोहलीला भेटायला क्रीझच्या दिशेने धावत गेला. त्या प्रेक्षकाला पकडण्यासाठी सुरक्षा रक्षकही धावले, पण तोपर्यंत तो विराटपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.