
मुंबई पोलीस दलात झालेल्या भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांची विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्यात यावी अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज पोलीस महासंचालकांकडे केली.
अंबादास दानवे यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले. 7 मे रोजी मुंबईत झालेल्या पोलीस भरतीमध्ये पुढीलप्रमाणे गैरप्रकार झाल्याचे दानवे यांनी निवेदनात नमूद केले आहेत.
आंदोलनासाठी आले असता हाकलून लावले
पोलीस भरतीमधील गैरप्रकारांच्या निषेधार्थ 24 मे रोजी काही उमेदवार आझाद मैदानावर उपोषण आंदोलन करण्यासाठी गेले होते, परंतु पोलिसांनी त्यांना हाकलून लावले तर काहींना गाडीत कोंबून पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
चार गुन्हे दाखल होऊनही निकाल केला जाहीर
पोलीस भरतीमधील गैरप्रकारांबाबत चार स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानंतरही परीक्षेचा निकाल 17 मे रोजी जाहीर केला गेला. शासनाच्या धोरणाप्रमाणे टीसीएस, आयबीपीएस या संस्थांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविणे आवश्यक असतानाही त्याचे पालन केले गेले नाही. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
कमी गुण मिळवणारे उमेदवारही पात्र
गुणवत्ता यादीसाठी ठरवण्यात आलेले गुण न मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही भरतीसाठी पात्र ठरवण्यात आले. आर्थिक दुर्बल गटातील 118 गुण असणारा विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहे, तर 116 गुण असणाऱया विद्यार्थ्याला पात्र ठरवण्यात आले. शारीरिक चाचणीमध्ये गुणवत्ता यादी 36 गुणांवर लागली तरी 35 गुण असलेल्या उमेदवाराला लेखी परीक्षेस बसण्यास परवानगी दिली गेली. शारीरिक परीक्षेत पात्र असूनही अनेक उमेदवारांना लेखी परीक्षेचे हॉल तिकीट देण्यात आले नाही.
- पोलीस भरतीच्या लेखी पेपरवेळी मोठय़ा प्रमाणात हायटेक कॉफी करण्यात आली.
- परीक्षा पेंद्रावर प्रवेश करताना काही उमेदवारांची बायोमेट्रिक घेतली गेली, तर काहींची घेतली गेली नाही.
- पोलीस पर्यवेक्षकांनी काही उमेदवारांना मोबाईलमध्ये उत्तरे सर्च करून दिली.
- स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने पुराव्यासहित दहिसर पोलीस स्टेशन येथे यासंदर्भात तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही.
- मेरिटमध्ये कमी गुण असणाऱया उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांची नावे मेरिटमध्ये समाविष्ट केली गेली आणि जास्त गुण असलेल्या उमेदवारांना डावलले गेले.
- शारीरिक चाचणीमध्ये काही उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना गुण वाढवून देण्यात आले.
- पोकळ भरती करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून आर्थिक लाभ घेऊन मेरिट लिस्टमध्ये नावे समाविष्ट करण्यात आली.
- उत्तरपत्रिकेवर कोणीही नाव व नंबर लिहू नये असा नियम ठेवूनही पर्यवेक्षकांनी काही उमेदवारांना नाव व नंबर लिहायला सांगितले.