मिंध्यांचे सूडबुद्धीचे राजकारण सुरूच आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अकोल्यातील शिवसेनेचे एकनिष्ठ आमदार नितीन देशमुख यांची पुन्हा एसीबीमार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. देशमुख मुलांची फी किती भरतात याचा शोध घेण्यासाठी एसीबीने चक्क शाळेला नोटीस धाडली आहे. विरोधकांना नाहक मनस्ताप देण्यासाठी ही खालची पातळी गाठल्याने मिंधेंविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.
नितीन देशमुख हे शिवसेनेचे एकनिष्ठ आमदार आहेत. गेल्यावर्षी 17 जानेवारीला त्यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी अमरावतीच्या एसीबी कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. त्या चौकशीत एसीबीला काहीच सापडलेले नव्हते. तशा चौकशीचा मनस्ताप दिल्यानंतरही देशमुख डगमगले नव्हते. त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षावरील निष्ठा कायम ठेवली. याचदरम्यान निष्कारण चौकशीचा मनस्ताप देण्याच्या सूडाच्या राजकारणाचा मिंधेंना लोकसभा निवडणुकीत फटका बसला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देशमुख यांच्यामागे पुन्हा एसीबी चौकशीचा ससेमिरा लावला आहे. अमरावती एसीबीने नितीन देशमुख यांची मुले शिक्षण घेत असलेल्या शाळेकडे देशमुख यांनी भरलेल्या फीबद्दल माहिती मागीतली आहे. सूडाच्या राजकारणासाठी मिंधेंनी चौकशीची ही खालची पातळी गाठल्याने सरकारविरोधात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
यापूर्वी दोन चौकशीमध्ये काही हाती लागलेले नाही
नितीन देशमुख यांची यापूर्वी दोनदा चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी कुठलाही आरोप सिद्ध न झाल्यानंतर आता पुन्हा अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देशमुख कुटुंबियांची झाडाझडती सुरू केली आहे. यापूर्वी अमरावती एसीबीने आमदार देशमुखांबद्दल अकोला जिल्हा परिषदेकडे माहिती मागितली होती.
एकनिष्ठ राहिल्याने चौकशी
राज्यात खोके सरकारने शिवसेना आमदारांना खोक्यात विकत घेतल्यानंतर मी त्या ठिकाणाहून परत आलो. त्यानंतर मी शिवसेनेशी एकनिष्ठ राहिल्याने मला त्रास देण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. वेळोवेळी चौकशीत माहिती दिल्यानंतरही पुन्हा चौकशी केली जात आहे, असा आरोप नितीन देशमुख यांनी केला.
आमदार देशमुखांचा मुलगा पृथ्वी आणि मुलगी अकोल्यातील प्रभात किड्स शाळेचे विद्यार्थी आहेत. आमदार देशमुख मुलांची किती फी भरतात यासंदर्भात शाळेच्या मुख्याध्यापकांकडे ही माहिती मागितल्याचे समोर आले आहे.