बोंडअळीला कारणीभूत कंपन्यांची ‘एसआयटी’ मार्फत चौकशी

23

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

बी.टी. कापसाच्या बियाणांमध्ये राज्य सरकारची परवानगी न घेता तणनाशकाला सहनशील असलेले जनुकीय वापरून कापूस बियाणाची विक्री केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला फटका बसण्यास कारणीभुत ठरलेल्या तीन कंपन्याच्या तपासणीसाठी राज्य सरकारने विशेष तपास पथकाची (एसआयटी)ची स्थापना केली आहे. या तपास पथकाचे प्रमुख राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त संजय बर्वे आणि अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे हे असतील.

शेतकऱ्यांचे कापसाचे उत्पन्न वाढावे यासाठी शेतकऱ्यांनी बी.टी. कॉटन या जनुकीय परिवर्तीत बियाण्यांचा वापर सुरू केला आहे. राज्यात २००१-०२ मध्ये हे बियाणे वापरास परवानगी दिण्यात आली. राज्यात जवळपास ४२ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली. मात्र या पिकांवर अचानक शेंद्रीय बोंडअळीने हल्ला चढविल्यामुळे शेतकऱ्याचे जोमात आलेले कापसाचे पीक वाया गेले. या बोंडअळीच्या प्रादुर्भावाला हे बी. टी. बियाणे कारणीभुत असल्याने अशा बियाणे कंपन्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी करीत शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी कंपनी विरुध्द गुन्हे दाखल केले आहे.

राज्यातील बियाणे कंपनीपैकी माहिको मॉन्सेन्टो या कंपनीने २००८ ते २०१० मध्ये बीटी वाणाच्या कापूसाच्या बियाणासाठी परवानगी मागितली होती. मात्र नंतर स्वतः होऊन ही मागणी मागे घेतली होती. मात्र राज्यात बी.टी. कापसाच्या बियाणांमध्ये परवानगी नसलेले तणनाशकला सहन असणारे जनुके वापरून अनेक बियाणे उत्पादक कंपन्यांनी बियाणांचे उत्पादन करून मोठ्या प्रमाणावर विक्री केल्याची बाब नागपूर या केंद्र सरकारच्या संस्थेकडून प्राप्त झालेल्या अहवालात म्हटले आहे. त्यात जादू, एटीएम, बलभद्र, अर्जुन, कृष्णा-गोल्ड या पाच ब्रँडेड नावाच्या बी.टी. कापूस बियाणांचा समावेश आहे. तसेच माहिको मॉन्सेन्टो बायो टेक प्रा.लिं., मॉन्टो होल्डींगस प्रा.लि. मॉन्टो इंडिया लिमिटेड या कंपन्यानी केलेल्या बियाणे विक्री, साठवणूक करून पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे उल्लंघन केले आहे. त्यामुळे या कंपन्याची एसआयटी मार्फत सखोल चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहे. त्यात कागदपत्राची छाननी करून अवैधरित्या बी.टी. बियाणे विक्रीस कारणीभुत ठरलेल्या बाबी निश्चीत करून त्याबाबत प्रतिबंधात्मक शिफारशी देणे, तसेच बोंडअळी घटनेची पुनरावृत्ती घडू नये याकरिता तातडीने कारवाई बाबत शिफारशी करण्याच्या सुचना एसआयटीला देण्यात आल्या आहे. या दोन सदस्यीय समितीत विशेष पोलीस महानिरिक्षक दर्जाचे अधिकारी असलेले राज्य गुप्तवार्ता विभाग आयुक्त संजय बर्वे हे अध्यक्ष असून विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे हे सचिव आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या